वृत्तसंस्था, सिंगापूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यापार युद्धाच्या भडक्यामुळे अमेरिकेत मंदीची शक्यता केवळ आठवडाभराच्या काळात ३५ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढविणारे ताजे अनुमान ‘गोल्डमन सॅक्स’ने सोमवारी वर्तविले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नियोजित करवाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसेल या भीतीने गोल्डमनने गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकी मंदीबाबत आपला अंदाज २० टक्क्यांवरून ३५ टक्के असा वाढवला आहे. प्रत्यक्षात ट्रम्प यांनी २ एप्रिलला अपेक्षेपेक्षा जास्त कर लादण्याची घोषणा केली. तेव्हापासून कमीत कमी सात प्रमुख जागतिक दलाली पेढ्यांनी मंदीच्या जोखमीचा अंदाज वाढवला आहे. ज्यामध्ये जे.पी. मॉर्गन यांनी अमेरिका आणि जागतिक मंदीची शक्यता ६० टक्क्यांवर नेऊन ठेवली आहे. करवाढीमुळे केवळ अमेरिकेत महागाई वाढेल असे नाही तर इतर देशांकडूनही प्रत्युत्तरदाखल उपाय सुरू होतील, अशी भीती आहे.

गोल्डमन सॅक्सने रविवारी २०२५ साठीचा अमेरिकेचा अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज १.५ टक्क्यांवरून १.३ टक्क्यांपर्यंत कमी केला. तथापि, तो वेल्स फार्गो इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूटच्या १ टक्का वाढीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे, तर जे.पी. मॉर्गनने तिमाही आधारावर अमेरिकी अर्थव्यवस्था ०.३  टक्क्यांनी आक्रसण्याचा अंदाज वर्तवला आहे. फेडरल रिझर्व्ह सलग तीन बैठकांमध्ये प्रत्येकी पाव टक्क्यांनी व्याजदर कमी करेल. तथापि, यापैकी पहिली कपात जुलैमध्ये नव्हे तर जूनमध्ये होईल अशी अपेक्षा आहे. जे.पी. मॉर्गनने २०२५ मधील ‘फेड’च्या उर्वरित पाच बैठकांपैकी प्रत्येकी पाव टक्क्यांची दर कपातीची अपेक्षा व्यक्त केली आहे. जे.पी. मॉर्गनने यापूर्वी दोनदा दर कमी करण्याची अपेक्षा केली होती. वेल्स फार्गोनेही आता या वर्षी एकाऐवजी तीन वेळा दर कपातीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मंदीची शक्यता

दलाली पेढ्या  – करवाढीनंतर  – करवाढीपूर्वी
जे.पी. मॉर्गन  – ६०%   – ४०%
गोल्डमन सॅक्स – ४५%  – ३५%
एस ॲण्ड पी ग्लोबल – ३५%  – ३०%
एचएसबीसी – ४०%   – २५%

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The probability of the us going into recession has increased to 45 percent the second increase from goldman sachs in a week print eco news ssb