मुंबई : द वेल्थ अॅसेट मॅनेजमेंटने एकाच वेळी चार सक्रिय म्युच्युअल फंडांची (एनएफओ) घोषणा केली. गुंतवणुकीला वाढ, स्थिरता आणि तरलता देण्याच्या उद्देशासह फ्लेक्सी कॅप फंड, आर्बिट्राज फंड, एथिकल थीमॅटिक फंड आणि लिक्विड फंड सादर केले असून ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) मंचावर पदार्पण करणारा पहिला एनएफओ ठरला आहे.
यापैकी द वेल्थ कंपनी एथिकल फंड हा नैतिकतेच्या संकल्पनेवर आधारित ओपन एन्डेड इक्विटी योजना आहे. हा फंड शुद्धता, करुणा आणि अहिंसा या कालातीत सात्विक तत्त्वज्ञानावर उभारलेला आहे. या तत्त्वांनुसार हा फंड दारू, तंबाखू, जुगार, मादक द्रव्ये, चामडे, मांस व पोल्ट्री, कीटकनाशके तसेच प्राण्यांवरील क्रूरतेशी संबंधित उद्योगांमध्ये गुंतवणूक करणार नाही. हा फंड म्हणजे नैतिक मूल्ये आणि संपत्ती यांचा संतुलन साधणारा सात्विक गुंतवणुकीचे मूलतत्त्व जपणारा आहे, असे द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडच्या संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधु लुनावत म्हणाल्या. या योजना २४ सप्टेंबर पासून खुल्या झाल्या असून त्यामध्ये ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे. गुंतवणूकदारांना किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येणार असून सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून २५० रुपयांपासून गुंतवणूक शक्य आहे.
मधु लुनावत म्हणाल्या, स्पष्टता आणि ठाम विश्वासावर आधारलेला असा नवा आयाम म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी आणत आहोत. प्रवर्तकीय जोखीम चौकटी आणि संस्थात्मक दर्जाची काटेकोरता यांचा संगम साधून गुंतवणूकदारांना त्यांच्या जीवन आणि संपत्तीच्या ध्येयांशी सुसंगत धोरण निवडण्यासाठी सक्षम करत आहोत. मग ते दीर्घकालीन वाढ, भांडवलाची स्थिरता, नीतिमूल्यांवर आधारित गुंतवणूक किंवा तरलतेवरील लक्ष असो. प्रत्येक गुंतवणूक उद्देश्यपूर्ण, पारदर्शक आणि वाढीसाठी सक्षम बनवणे ही संपत्ती निर्मितीची पुनर्व्याख्या आहे. ही योजनांची मालिका आमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर (MFD) भागीदारांसाठी एक शक्तिशाली टूलकिट आहे. जोखीम टाळणाऱ्या निवृत्त गुंतवणूकदारापासून ते नीतिमूल्य शोधणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत प्रत्येक फंड एका विशिष्ट गरजेसाठी तयार केला आहे.
पारंपारिक म्युच्युअल फंड धोरणे केवळ ताळेबंद विश्लेषण यावर थांबतात पण द वेल्थ कंपनी प्रायव्हेट इक्विटी स्टाईल डीलीगन्स वापरते. त्यात सुरुवातीलाच जोखीम कळण्यासाठी फॉरेन्सिक आणि कायदेशीर पडताळणी केली जाते. तसेच शक्तिशाली डॅशबोर्डद्वारे सतत निरीक्षण करून योग्य वेळी हस्तक्षेप करणे आणि नुकसान टाळणे शक्य होते. या पद्धतीमुळे गुंतवणूकदारांना प्रतिबंधात्मक दृष्टीकोन, तीव्र जोखीम व्यवस्थापन आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीबाबत अधिक विश्वास मिळतो.