नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धारेवर धरून, आपल्या आयातीवर दंडात्मक ५० टक्के टॅरिफ लागू केले असले, तरी तेथील उद्योगजगत आणि गुंतवणूकदारांची भारताला पसंती असल्याचे बुधवारी सायंकाळी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले.
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांदरम्यान भारतातील थेट परकीय गुंतवणूक १५ टक्क्यांनी वाढून १८.६२ अब्ज डॉलरवर गेली आहे. उल्लेखनीय म्हणजे आयात करात दंडात्मक वाढ करणाऱ्या अमेरिकेतून आलेला गुंतवणुकीचा प्रवाह या काळात जवळपास तिप्पट होऊन ५.६१ अब्ज डॉलर झाला आहे.
मागील आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीमध्ये थेट परकीय गुंतवणूक १६.१७ अब्ज डॉलर होती. तर या आधीच्या म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीत ती वार्षिक तुलनेत २४.५ टक्क्यांनी घटून ९.३४ अब्ज डॉलरवर मर्यादित होती. भांडवली बाजारातील गुंतवणूक प्रवाह, उत्पन्नाची पुनर्गुंतवणूक आणि इतर भांडवल जमेस धरल्यास, एकूण थेट परकीय गुंतवणूक ही सरलेल्या तिमाहीत २५.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
या तिमाहीत ५.६१ अब्ज डॉलरसह अमेरिका हा भारतासाठी सर्वात मोठा थेट परकीय गुंतवणुकीचा स्रोत राहिला आहे. गतवर्षी एप्रिल ते जून २०२४ मध्ये त्या देशांतून याचा तिसरा हिस्सा म्हणजे १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक आली होती. अमेरिकेनंतर सिंगापूर (४.५९ अब्ज डॉलर), मॉरिशस (२.०८ अब्ज डॉलर), सायप्रस (१.१ अब्ज डॉलर), संयुक्त अरब अमिरात (१ अब्ज डॉलर), केमन बेटे (६७.६ कोटी डॉलर), नेदरलँड्स (६६.७ कोटी डॉलर), जपान (५५.१ कोटी डॉलर) आणि जर्मनी (१९.१ कोटी डॉलर) या राष्ट्रांचा क्रम लागतो.
एप्रिल २००० ते जून २०२५ या सव्वा पाच वर्षांच्या कालावधीत, ७६.२६ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह अमेरिका हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. याच कालावधीत मॉरिशस १८२.२ अब्ज डॉलर आणि सिंगापूर १७९.४८ अब्ज डॉलरसह देशातील गुंतवणुकीचे प्रमुख स्रोत आहेत. ही गुंतवणूक संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, सेवा व व्यापार क्षेत्रात, दूरसंचार, वाहने, बांधकाम विकास, अपारंपारिक ऊर्जा आणि रसायने या प्रमुख क्षेत्रांत झाली आहे. गेल्या २०२४-२५ या संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण ८०.६ अब्ज डॉलर इतकी थेट विदेशी गुंतवणूक भारतात आली, त्यापैकी भांडवली बाजारातील गुंतवणूक ही ५०.०१ अब्ज डॉलरची होती.
महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
सरकारकडून प्रसृत आकडेवारीवरून, एप्रिल ते जून तिमाहीत कर्नाटकात सर्वाधिक ५.६९ अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात अग्रेसर असलेला महाराष्ट्र या तिमाहीत दुसऱ्या क्रमांकावर असून, राज्याने ५.३६ अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळविली. तामिळनाडू (२.६७ अब्ज डॉलर), हरियाणा (१.०३ अब्ज डॉलर), गुजरात (१.२ अब्ज डॉलर), दिल्ली (१ अब्ज डॉलर) आणि तेलंगणा (३९.५ कोटी डॉलर) असा अन्य राज्यांची क्रमवारी आहे.