सोने गुंतवणुकीतील सुरक्षित मानला जाणारा पर्याय ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)’मध्ये सरलेल्या ऑगस्ट महिन्यात १ हजार २८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ओघ दिसून आला. मागील १६ महिन्यांतील ही उच्चांकी गुंतवणूक ठरली आहे. अमेरिकेत संभाव्य व्याजदरात वाढ आणि त्या परिणामी आधीच मंदावलेल्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरात आणखी घसरणीच्या शक्यतेने चिरंतन मूल्य सुरक्षितता म्हणून सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘ॲम्फी’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये झालेल्या ४५६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या तुलनेत, ऑगस्टमधील नक्त गुंतवणूक वाढून १,०२८ कोटींवर गेली आहे. ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये केवळ गुंतवणुकीचा ओघच नव्हे तर गुंतवणूकदारांची संख्याही वाढली आहे.

एप्रिल ते जून या कालावधीत गोल्ड ईटीएफमध्ये २९८ कोटी रुपयांची नक्त गुंतवणूक झाली होती. त्याआधीच्या सलग तीन तिमाहींमध्ये गुंतवणुकीपेक्षा निर्गुंतवणुकीचे प्रमाण अधिक होते. मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत १ हजार २४३ कोटी रुपये गोल्ड ईटीएफमधून काढून घेण्यात आले होते. त्याआधी मागील वर्षी डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ३२० कोटी रुपये आणि मागील वर्षी सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत १६५ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते.

मागील वर्षी एप्रिलपासून उतरती कळा

सरलेल्या ऑगस्टमध्ये ‘गोल्ड ईटीएफ’मधील गुंतवणुकीने एप्रिल २०२२ नंतरची उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यावेळी रशिया-युक्रेन युद्ध भडक्याच्या पार्श्वभूमीवर, १ हजार १०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. मात्र, नंतर अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ सुरू झाल्यानंतर गोल्ड ईटीएफमधील निर्गुंतवणुकीचे प्रमाण वाढले होते.

अमेरिकेत व्याजदरात संभाव्य वाढ आणि त्या परिणामी मंदीची शक्यता, मध्यवर्ती बँकेकडून सोन्याची खरेदी आणि दीर्घकाळ सुरू राहिलेला भूराजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वळला आहे. सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला पसंती दिली जात आहे.- गझल जैन, व्यवस्थापक, क्वांटम म्युच्युअल फंड

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With the possibility of a recession in us inflows in gold etf hit 16 month high print eco news asj