Foxconn Chinese Staff : आयफोनचं पुढचं मॉडेल ‘आयफोन १७’ चं उत्पादन भारतात होणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून आहे. मात्र, असं असतानाच फॉक्सकॉन कंपनीच्या एका निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आयफोनची निर्मिती फॉक्सकॉन कंपनीकडून केली जाते. तमिळनाडूमध्ये फॉक्सकॉनचे आयफोन उत्पादनासाठी एक युनिट आहे. तसेच भारतात आणखी काही कारखाने काढण्याचा फॉक्सकॉन आणि ॲपलचा मानस असल्याचं बोललं जात आहे.
पण काही दिवसांपूर्वी या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फॉक्सकॉनच्या कारखान्यातून शेकडो चिनी कर्मचाऱ्यांची गच्छंती करण्यात आली होती. त्यानंतर आता फॉक्सकॉनने भारतातील अॅपल कारखान्यात काम करणाऱ्या आणखी ३०० चिनी अभियंत्यांना परत बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे. आयफोन १७ लाँच होण्यापूर्वी फॉक्सकॉनने हे पाऊल उचलल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
दरम्यान, २०२६ च्या अखेरीस अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक फोन भारतात तयार केले जाणार होते. मात्र, भारतात अधिक आयफोन बनवण्याच्या प्रयत्नांना मागील काही महिन्यांत अनेक अडचणी येत असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.
वृत्तानुसार, अॅपल बनवणाऱ्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपने तामिळनाडूतील एका कारखान्यामधून तब्बल ३०० चिनी अभियंत्यांना परत बोलावलं आहे. मागच्या काही महिन्यांतील कंपनीचं अशा प्रकारच्या निर्णयाचं हे दुसरे पाऊल आहे. त्यामुळे आता भारतातील अॅपलच्या विस्ताराच्या गतीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, या ३०० चिनी अभियंत्यांना परत का बोलावलं? याबाबत अद्याप कोणतंही कारण स्पष्ट झालेलं नाही.
फॉक्सकॉनचा तैवानी तंत्रज्ञानावर असणार भर
ब्लुमबर्गच्या माहितीनुसार, चिनी कर्मचारी मायदेशी परतल्यामुळे उत्पादनाचा वेग आणि भारतीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया मंदावणार आहे. मात्र चीनकडून तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ बाहेरच्या देशात जाऊ नये, असा प्रयत्न होत आहे. काही महिन्यांपूर्वी चीनच्या सरकारने याबद्दल प्रयत्न केले होते. यामुळे मुळची तैवानची कंपनी असलेल्या फॉक्सकॉनने तैवानी तंत्रज्ञान आणि तैवानी अभियंते आणि तंत्रज्ञ यांना भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच भारताली कर्मचाऱ्यांना तैवानी कर्मचारी यापुढे प्रशिक्षण देणार आहेत.