Anil Ambani : अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत कारण ईडीने त्यांच्या विरोधात कावराई करत ३ हजार कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या मालमत्तांमध्ये ऑफिसेस, आलिशान फ्लॅट्स आणि जमिनींचा समावेश आहेत. या मालमत्ता दिल्ली, मुंबई, नोएडासह इतर शहरांमध्ये आहेत. विशेष बाब म्हणजे अनिल अंबानी यांच्या पाली हिल येथील बंगल्यावरही जप्तीची कारवाई ईडीने केली आहे. या प्रकरणी अद्याप अनिल अंबानींतर्फे कुठलीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
कुठल्या मालमत्तांवर ईडीची कारवाई?
१) मुंबईतल्या वांद्रे भागात असलेल्या पाली हिल या ठिकाणी असलेला अनिल अंबानी यांचा बंगला
२) दिल्लीमधील रिलायन्स सेंटर
३) पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई येथील ऑफिसेस आणि जागा
४) या मालमत्तांची किंमत तीन हजार कोटींच्या घरात आहे.
२० हजार कोटींचा गैरवापर केल्याचा ठपका
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने २० हजार कोटींहून अधिक बँकेच्या फंड्सचा गैरवापर केला. चुकीच्या पद्धतीने आणि नियम वळवून कर्जं देण्यात आली. चुकीच्या पद्धतीने व्यवहार करण्यात आले. या सगळ्या प्रकरणात ईडीची चौकशी सुरु आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच कारवाईचं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
२०१७ ते २०१९ या काळात येस बँकेकडून रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपच्या कंपन्यांना वेगवेगळ्या प्रमाणात एकूण ३ हजार कोटींची कर्जे वितरीत करण्यात आली. पण या सगळ्या व्यवहारात बेकायदेशीर बाबी घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी सध्या ईडीकडून करण्यात येत आहे. ही कर्जाची रक्कम वळती करण्यासाठी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना, प्रमोटर्सला लाच दिली गेल्याचाही संशय ईडीला असून त्याअनुषंगानेदेखील तपास करण्यात येतो आहे. याच कारवाईचा भाग म्हणून आता मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना कर्जाची रक्कम वळती करण्यासाठी बँकेकडून नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करण्यात आल्याचं ईडीच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं होतं. आता अनिल अंबानी यांच्या तीन हजार कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये त्यांच्या पाली हिल येथील बंगल्याचाही समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
५ ऑगस्टला अनिल अंबानी यांची ईडी कार्यालयात चौकशी
ईडीने जुलै महिन्यातही अनिल अंबानी त्यांचे सहकारी आणि ग्रुप कंपन्यांवर छापे टाकले आहेत. ५ ऑगस्ट रोजी अनिल अंबानी यांना दिल्ली येथील ईडी मुख्यालयात बोलवण्यात आलं होतं आणि त्यांची चौकशीही करण्यात आली होती. ईडीचा हा तपास प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टचया अंतर्गत सुरु आहे. अनिल अंबानी यांच्यावर देश सोडून जाण्याचीही बंदी घालण्यात आली आहे.
