Tata Motors Shares : देशातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सच्या शेअरचा भाव आज एका तासात ३८ टक्क्यांनी गडगडला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एकच गोंधळ उडाला. टाटा मोटर्सचे शेअर्स का घसरले? याबाबत अनेक गुंतवणूकदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, टाटा मोटर्सच्या शेअरचा भाव घसरला असला तरी गुंतवणूकदारांनी घाबरण्याचं कारण नाही.
टाटा मोटर्सच्या शेअर्सचा भाव आज सकाळी व्यवहार सुरू झाल्याच्या पहिल्या एका तासात झपाट्याने घसरला. ९४० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून शेअरची किंमत झपाट्याने घसरून सुमारे ३७६ रुपयांवर पोहोचली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ आणि चिंता निर्माण झाली. मात्र, ही घसरण बाजारपेठेतील भीती किंवा कोणत्याही मूलभूत कारणामुळे नसल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.
टाटा मोटर्सचे शेअर्स का घसरले?
टाटा मोटर्सच्या शेअरची ही घसरण टाटा मोटर्सच्या बहुप्रतिक्षित विलगीकरणाशी जोडलेली एक तांत्रिक बाब असल्याचं सांगितलं जात आहे. टाटा मोटर्सच्या शेअर्सच्या सकाळच्या व्यवहारात घसरण झाल्यानंतर दुपारच्या व्यवहारात काही प्रमाणात वाढ झाली. कंपनीचा व्यावसायिक वाहन (सीव्ही) व्यवसाय अधिकृतपणे त्यांच्या मुख्य घटकापासून वेगळा होत असल्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं कारण सांगितलं जात आहे.
दरम्यान, हे विभाजन १४ ऑक्टोबरपासून लागू होत आहे. जेव्हा जेव्हा शेअरहोल्डर्स नवीन युनिट टीएमएल कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेडमध्ये (टीएमएलसीव्ही) शेअर्स मिळवण्यास पात्र ठरतील. खरं तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास टाटा मोटर्स आता दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागली गेली आहे.
गुंतवणूकदारांनी काळजी का करू नये?
टाटा मोटर्सचे शेअर्स आज का घसरले आहेत? गुंतवणूकदारांनी काळजी का करू नये? तसेच तांत्रिक विलगीकरणाच्या कारणामुळे टाटा मोटर्सचे शेअर्स ३८ घसरले असले तरी त्याचा तुमच्या गुंतवणुकीसाठी काय अर्थ होतो? याबाबत आता काही सवाल विचारले जात आहे. दरम्यान, विलगीकरणानंतर एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किमतीत चढ-उतार होण्याची ही पहिली वेळ नाही. अशा प्रकारची घसरण याआधाही पाहायला मिळालेली आहे. कारण मूळ कंपनी आणि नवीन सूचीबद्ध कंपनीमध्ये मूल्य पुनर्वितरण केलं जातं. टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डर्सकडे अजूनही त्यांचं गुंतवणूक मूल्य आहे. ते आता फक्त दोन व्यवसायांमध्ये विभागलं गेलं आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये TMLCV शेअर्स BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा असून त्यामुळे होल्डर्सचे पूर्ण मूल्य पुनर्संचयित होईल.
व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांचे युनिट वेगळे राहणार?
गेल्यावर्षी ४ मार्च २०२४ मध्ये टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाने कंपनीचे दोन स्वतंत्र सूचिबद्ध कंपन्यांमध्ये विलगीकरण करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे कंपनीचा वाणिज्य वाहन व्यवसाय टीएमएल कमर्शियल व्हेईकल्स लिमिटेडमध्ये विलग केला जाईल, तर त्यांचा विद्यमान प्रवासी वाहन व्यवसाय टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये विलीन केला जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्या माहितीनुसार, या विभाजनाअंतर्गत ते आपला व्यवसाय दोन स्वतंत्र सूचीबद्ध कंपन्यांमध्ये विभाजित करतील.
एका युनिटमध्ये व्यावसायिक वाहनं (CV) व्यवसाय आणि त्याच्याशी संबंधित गुंतवणूक असेल, तर दुसऱ्या युनिटमध्ये वैयक्तिक, प्रवासी वाहनं (PV), इलेक्ट्रिक वाहन (EV), JLR आणि त्यांच्याशी संबंधित गुंतवणूक यांचा समावेश असेल. स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं होतं की, टाटा मोटर्सचे विभाजन एनसीएलटी व्यवस्थेतील योजनेद्वारे लागू केले जाणार आहे. दोन्ही विभाग वेगवेगळे केल्यानं टाटा मोटर्ससाठी फायद्याचे ठरू शकते.