Mumbai Diamond Market Will Be Hit By Donald Trump Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५% टॅरिफ लादल्यामुळे सूरतमधील हिऱ्यांच्या कंपन्यांना अमेरिकन ग्राहकांकडून ख्रिसमससाठी मिळालेल्या ऑर्डर्स आता थांबवाव्या लागत आहेत. दरम्यान सुरतमधील हिऱ्यांच्या कंपन्यांना यामुळे मोठा फटका बसणार आहे. कारण ख्रिसमस अवघ्या पाच महिन्यांवर आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ख्रिसमसच्या काळातील विक्री ही एकूण वार्षिक विक्रीपैकी जवळपास निम्मी असते.

तज्ञांचा असा अंदाज आहे की, दागदागिने किंवा गुंतवणूकीसाठी योग्य असलेल्या हिऱ्यांच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीला अतिरिक्त टॅरिफमुळे मोठा फटका बसेल. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये अमेरिकेच्या एकूण हिऱ्यांच्या आयातीपैकी ६८% वाटा भारताचा होता आणि ४२% (५.७९ अब्ज डॉलर) वाटा मूल्याच्या दृष्टीने होता.

अमेरिकेत हिरे आयातीमध्ये दुसऱ्या स्थानी इस्रायल होता. त्यांनी गेल्या वर्षी मूल्याच्या दृषीने अमेरिकला २८% हिरे निर्यात केली आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलवर केवळ १९% टॅरिफ लादला आहे.

सुरतच्या ७ हजार कोटींची उलाढाल असलेल्या धारणन डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक हितेश पटेल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, गेल्या काही वर्षांत अमेरिकेला होणारी हिरे निर्यात २५ टक्क्यांनी घसरली आहे. याचबरोबर उत्पादनही ३० ते ३५ टक्क्यांनी घसरले आहे. अशात आता नवीन टॅरिफ लादल्यामुळे निर्यातीला आणखी मोठा फटका बसेल.

मुंबई आणि सुरतला बसणार सर्वाधिक फटका

जीजेईपीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरीट भन्साळी म्हणाले की, उच्च टॅरिफमुळे भारतीय हिरे व दागिन्यांच्या क्षेत्रातील निर्यातीत लक्षणीय घट होणार असून, मुंबई आणि सुरत या दोन शहरांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

कटिंग व पॉलिश केलेल्या हिऱ्यांची अमेरिकेला होणारी निर्यात २०२१-२२ मध्ये ९.८६ अब्ज अमेरिकी डॉलरवरून २०२४-२५ मध्ये ४.८१ अब्ज डॉलरपर्यंत घसरली आहे. अमेरिका हा भारताच्या हिरे आणि दागिने निर्यातीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ असून, एकूण वार्षिक निर्यातीपैकी जवळपास एक तृतीयांश वाटा अमेरिकेचा आहे.

१,२५,००० नोकर्‍या जाण्याची शक्यता

“अमेरिकेने लादलेल्या ५०% टॅरिफमुळे येत्या चार ते पाच महिन्यांत सुमारे १,२५,००० नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे. याचा गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांना सर्वाधिक फटका बसेल. या नोकर्‍या गेल्यामुळे हिऱ्यांचे कटिंग आणि पॉलिशिंग, सोनं-चांदीचे दागिने, तसेच रंगीबेरंगी मौल्यवान रत्ने यांसारख्या अनेक क्षेत्रांवर परिणाम होईल. निर्यात घटल्यामुळे आणि नोकर्‍या गेल्यामुळे अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल”, असे भानसाळी यांनी सांगितले.