Share Market Today: भारत-पाकिस्तान तणाव निवळल्यानंतर शेअर बाजारात पुन्हा एकदा जुना उत्साह दिसत आहे. आज दिवसअखेर निफ्टी ५० ने पुन्हा एकदा सात महिन्यानंतर २५,००० टप्पा गाठला. मागच्या वेळी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी निफ्टीने हा टप्पा ओलांडला होता. निफ्टीमध्ये आज ३९५ अंकाची वाढ झाली आणि निर्देशांक २५,०६२ वर बंद झाला. तर बीएसई सेन्सेक्समध्ये १,२०० अंकाची वाढ होऊन तो ८२,५३०.७४ वर बंद झाला.

निफ्टी ५० आणि सेन्सेक्ससह इतर निर्देशांकात वाढ झाल्याचे आज दिसून आले. निफ्टी बँक निर्देशांकात ५५४ अंकांची वाढ होऊन तो ५५,३५५.६० वर बंद झाला. स्मॉल आणि मिडकॅप समभागातही वाढ पाहायला मिळाली. बीएसई स्मॉलकॅपमध्ये ४७१.५२ अंकाची वाढ होऊन तो ५०,४५०.४७ वर बंद झाला तर बीएसई मिडकॅप २९८.२७ ने वाढून ४४,६२५.५५ वर बंद झाला.

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे संशोधक प्रमुख विनोद नायर म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबरच्या संभाव्य व्यापार कराराबद्दल दिलेल्या संकेताचे बाजारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाईल्स सारख्या क्षेत्राततही चांगली गती पाहायला मिळाली.

बाजारातील तेजीचे पाच महत्त्वाचे मुद्दे

१) निफ्टी ५० आणि सेन्सेक्समध्ये तेजी आलेली असताना इंट्राडे ट्रेडिंगमध्येही उत्साह दिसून आला. निफ्टी ५० मध्ये १.७ टक्क्यांची वाढ झाली. तर ३० स्टॉक इंडेक्स, सेन्सेक्स मध्ये १.७ टक्क्यांची वाढ झाली.

२) सर्वाधिक नफा – निफ्टी ५० मध्ये हिरो मोटोकॉर्पने सर्वाधिक नफा मिळविला. ६.१७ टक्क्यांची वाढ या समभागात पाहायला मिळाली. त्यानंतर जेएसडब्लू स्टील, टाटा मोटर्स, ट्रेंट आणि श्रीराम फायनान्स यांचाही समावेश आहे.

३) सर्वाधिक तोटा – आज इंडसलँड बँकेच्या समभागात तोटा पाहायला मिळाला.

४) क्षेत्रीय निर्देशांक – निफ्टी ऑटो आणि रिअल्टी या क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक चांगली कामगिरी दिसून आली. या निर्देशांकात १.९२ टक्क्यांची वाढ झाली. तर त्यानंतर निफ्टी मेटलमध्ये १.७४ टक्के वाढ पाहायला मिळाली. स्मॉल आणि मिडकॅपमध्येही उसळी पाहायला मिळाली.

५) बाजार आज बुल्सच्या बाजूने राहिला – शेअर बाजारात एकूणच आज तेजीचा दिवस होता. २,९४२ समभागांपैकी १,९८० मध्ये तेजी दिसून आली तर ८९० समभागांमध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. तर ७२ समभागात काही बदल दिसला नाही. आज ५९ समभागांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर ११ समभागांनी ५२ आठवड्यांचा तळ गाठला.