Petrol Rates May Drop In India: मजबूत पुरवठा आणि जागतिक मागणीत घट झाल्यामुळे वर्षाच्या अखेरीस खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल ६० डॉलर्सच्या खाली येण्याची अपेक्षा आहे, असे एस अँड पी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सचे कार्यकारी संचालक प्रेमाशिष दास यांनी मनीकंट्रोलशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, जर खनिज तेलाची किंमत प्रति पिंप ६० डॉलर्सच्या खाली आली तर देशातील पेट्रोलच्या दरातही कपात होण्याची शक्यता आहे.

३ जुलै रोजी एस अँड पीच्या कमोडिटी मार्केट इनसाइट्स फोरमच्या पार्श्वभूमीवर बोलताना दास म्हणाले की, वर्षाच्या अखेरीस खनिज तेलाच्या किमती घसरतील आणि ५५ ते ६० डॉलर्सच्या मध्ये राहतील. सध्या खनिज तेलाचा प्रति पिंप दर ७० डॉलर्सच्या आसपास आहे.

“आम्हाला वाटते की वर्षाच्या अखेरीस खनिज तेलाची किंमत प्रति पिंप ६० डॉलर्सच्या खाली जाऊ शकते, कारण खनिज तेलाचा सध्या पुरवठा जास्त असून मागणी घटली आहे. प्राथमिक अंदाज असा आहे की, ओपेक+ सध्या कोणतेही पाऊल उचलणार नाही. याचा अर्थ ते उत्पादन कमी करणार नाहीत किंवा कोणत्याही ठराविक किंमतीची मागणी करणार नाहीत,” असे दास यांनी पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेक आणि रशियासारख्या त्यांच्या सहयोगी देशांबद्दल सांगितले.

ओपेक+ कडून होत असलेला जास्त पुरवठा आणि जागतिक मागणीत झालेली घट यामुळे तेल बाजारपेठेत चांगला पुरवठा आहे. एप्रिलपासून ओपेकने दरमहा टप्प्याटप्प्याने २.२ दशलक्ष बॅरल उत्पादन कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बातम्यांनुसार खनिज तेलाचे दर ६० डॉलर्सपर्यंत घसरले आणि नंतर ते ७० डॉलर्सपर्यंत परतले आहेत.

दुसरीकडे, जगातील सर्वात मोठा तेल आयातदार असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे जागतिक तेलाची मागणी मंदावली आहे. मात्र, दास यांनी यावेळी इराण-इज्रायल संघर्षासह संभाव्य भू-राजकीय धोक्यांबाबतही इशारा दिला, तसेच ओपेककडून पुन्हा पुरवठा कपात लागू केल्यास त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत खनिज तेलाचे दर प्रति पिंप ७० ते ८० डॉलर्स दरम्यान जाऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

दास म्हणाले की, वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत भारताची खनिज तेलाची मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत देशाच्या तेल मागणीत दररोज ११० ते १२० हजार पिंप वाढ होण्याची अपेक्षा आहे.