सूज्ञतेने शेअर गुंतवणूक करणाऱ्यांना अंबरीश बालिगा, शार्दूल जानी ही नावे सुपरिचितच. गेली काही वर्ष नव्हे तर दशकांपासून त्यांनी केलेल्या शिफारसीनुरूप गुंतवणूक निर्णय घेतलेल्यांनी चांगला फायदा कमावला असण्याची शक्यताही मोठीच. तथापि गुंतवणूक सल्लागार ही त्यांची लोकप्रिय ओळखच आज बालिगा यांच्यावर उलटली आहे.

बालिगा हा दूरचित्रवाणी माध्यमांतील ओळख असलेला चेहरा म्हणून त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग सर्वांसमक्ष तरी आला. परंतु अंदाज असा की, आज सुमारे ४५ टक्के भारतीय ग्राहक ओळखीच्या चोरीचे (Identity Theft) सावज बनले आहेत. हा अंदाजही तसा ढोबळच म्हणावा. कारण अन्य विकसित देशांप्रमाणे अशा गुन्ह्यांचा माग घेणारी अथवा देखरेख ठेवणारी सरकारी नाहीच, पण बिगर सरकारी संस्था-संघटना आपल्याकडे अस्तित्वात नाही.

लोकांची व्यक्तिगत माहिती, जसे की नाव, गाव, जन्मतारीख, त्यांचे पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, गमावलेले-गहाळ झालेले सिम कार्ड इतकेच काय, तर समाज माध्यमांवरील त्यांचा वावर आणि पदचिन्हे वगैरे सारे काही त्यांच्या परवानगीशिवाय चोरले गेले आणि त्याचा गैरवापर केला गेला असा हा गुन्हेगारी प्रकार आहे. आर्थिक नुकसानीचा संभव त्यातून आहेच. प्रसंगी ही बाब नाहक कायदेशीर अडचणीत लोटणारी, बरोबरीने सामाजिक प्रतिष्ठा, इभ्रतीलाही बट्टा लावणारी ठरली, असे संकट अनेकांच्या वाट्याला आलेही आहे.

अधिक दुःख याचेही की धोक्याची जाणीव आणि सजगता ना लोकांमध्ये आहे, ना तपासाचा जिम्मा उचललेल्या यंत्रणामध्ये आहे. बालिगांनी त्यांच्या प्रकरणांत हेच अनुभवले. त्यांचा कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाद्वारे निर्मित आवाज आणि चेहरा असलेल्या व्हिडिओंचा समावेश करून, लोकांना गंडा घातला जात असल्याची त्यांची तक्रार नवी मुंबई पोलिसांच्या दृष्टीने बेदखल ठरली. अगदी पोलिस आयुक्तांपर्यंत पोहचून या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला.

दुष्ट सायबर छल-कपट आणि ठकीच्याच अनेक ज्ञात प्रकारात ओळखीची चोरी आणि त्यातून होणारी फसवणूकही येते. अशा फसवणुकांचे प्रमाण वाढतही आहे. हे घडते कसे? ओळखीची चोरी अनेक प्रकारे केली जात असते. त्याच्या प्राथमिक लक्षणांबाबत आपण मात्र दक्ष असायला हवे. तुमच्या क्रेडिट कार्ड, बँक खाते विवरणांत अनपेक्षित आणि ठाव लावता न येणाऱ्या खर्च अथवा पैसे काढले गेल्याच्या नोंदी, न घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी अनाहूतपणे येणारे कॉल्स, एकापेक्षा अधिक प्राप्तिकर विवरणपत्र भरले गेल्याचे प्राप्त झालेले नोटिफिकेशन अशा व तत्सम गोष्टींची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. हे केले नाही पत, वित्त आणि प्रतिष्ठेचे मोठे नुकसान करून बसण्याचा धोका अटळ ठरेल.

नुकतेच म्हणजे जूनच्या सुरुवातीला याच्याशीच निगडित उघडकीस आलेला आणखी एक प्रकार तर मोठाच धक्कादायक आहे. राजस्थानातील कोटा येथील एका अग्रेसर खासगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत एका महिलेने रचलेल्या बनावाने ओळख चोरीचा एका भयानक पैलूलाच पुढे आणले आहे. या महिलेलाच मुळात शेअर बाजारातून अल्पावधीत रग्गड फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या टोळक्याने भुलविले होते. मग तिने तिचे इप्सित साध्य करण्यासाठी बँकेतील ४१ हून अधिक ग्राहकांच्या वेगवेगळ्या ११० मुदत ठेव (एफडी) खात्यातील पैशांचा वापर सुरू केला.

बहुतांश ज्येष्ठांच्या खात्याचीच तिने यासाठी निवड केली. गंभीर गोष्ट अशी की हा फसवणुकीचा मामला दोन वर्षे बिनबोभाट सुरू राहिला. एक ज्येष्ठ नागरिक अकल्पितपणे त्याच्या मुदत ठेव खात्याबाबत चौकशी करायला बँकेत आला असता याचा भांडाफोड झाला. या महिलेने खात्याशी संलग्न ग्राहकांचे मोबाईल क्रमांकही बदलून गेले होते. जेणेकरून खात्यात तिने केलेल्या उलाढाली त्यांच्यापर्यंत पोहचूच शकल्या नाहीत. या बाई स्वतः खोट्या आमिषाला भुलल्या आणि पण नुकसान मात्र बँकांमध्ये विश्वासाने आयुष्याची पूंजी राखणाऱ्या ज्येष्ठांच्या वाट्याला आले.

डिजिटल व्यवहारांचा स्वीकार वायूवेगाने देशात वाढत, फेलावत चालला आहे. यूपीआयच्या माध्यमांतून महिनागणिक व्यवहारांची कोट्यवधीने वाढत असलेली संख्या आणि अब्जावधीच्या मूल्याचे आकडे हे उत्साहदायी निश्चितच. सरकारने आणि यामागे कार्यरत उपक्रमांनी त्याचा सार्थ अभिमान जरूर बाळगावा. पण ही विश्वासार्हता टिकवून ठेवली जाईल, हेही याच उपक्रमांचे आणि सरकारचेही कर्तव्य ठरते. अन्यथा देशाच्या डिजिटल परिसंस्थेसंबंधानेच नव्हे, तर कोट्यातील बँकेतील महिलेचे प्रताप लक्षात घेता संपूर्ण वित्तीय व्यवस्थेबाबत लोकांमध्ये अविश्वासाची भावना वाढत जाईल.

(समाप्त)