म्युच्युअल फंडामध्ये मी नियमितपणे गुंतवणूक करतो. दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसुद्धा करतो. यावर्षी सोन्याचे खूपच वाढलेले दर पाहता सोन्यात गुंतवणूक करावी का? ती फंडाच्या माध्यमातून कशी करता येईल?

उत्तर : तुम्ही प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहात म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंड ही संकल्पना माहिती आहे, असे गृहीत धरून पुढचे विवेचन सुरू करूया. भारतीय गुंतवणूकदारांचा सोने या कमॉडिटीवरील विश्वास अनेक शतकांपासून आहे. ज्यावेळी शेअर बाजार, म्युच्युअल फंड हे पर्याय उपलब्ध नव्हते आणि बँकांचे जाळे पसरले नव्हते त्यावेळी जसे जमेल तसे सोने विकत घेऊन गुंतवणूक स्वरूपात ते साठवणे हाच पर्याय सर्व भारतीय अवलंबत होते.

सोन्याच्या दरात किती वाढ होते किंवा दरवर्षी सोने किती दराने वाढते याचा अभ्यास न करता निव्वळ एक सुरक्षित गुंतवणूक म्हणूनच सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपली गुंतवणूक कशी असावी? या प्रश्नाचे सोपे उत्तर महागाई दराला मागे टाकून तुम्हाला पैसे मिळवून देतील असे गुंतवणुकीचे स्वरूप असावे, हे आहे. सोन्याचा मागच्या पन्नास वर्षांच्या दराचा आढावा घेतल्यास सोन्यातील भाव वाढ एकाच स्थिर दराने होते असे म्हणता येत नाही.

गेल्या पाच वर्षांतील सोन्याच्या दरवाढीचा अभ्यास केल्यास त्यामध्ये दोन प्रमुख घटक दिसून येतात. ज्यावेळी शेअर बाजार आणि अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक अधिक जोखमीची असते किंवा त्यामध्ये अनिश्चितता असते त्यावेळी जगभरातून सोने-चांदी या धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढते.

पाच वर्षांपूर्वी आलेल्या जागतिक करोना महामारीच्या वेळी आपण हे अनुभवले होते. जागतिक राजकीय तसेच अर्थकारणात ज्यावेळी अनिश्चितता निर्माण होते त्यावेळी शेअर बाजाराप्रमाणेच गुंतवणूकदार सोन्याकडे मोर्चा वळवतात. गेल्या वर्षभरापासून अमेरिकी सरकारप्रणीत व्यापार युद्ध सुरू झाले आहे, त्यामुळे सर्व देशांमध्ये अनिश्चिततेचे सावट आहे.

यातील आणखी एक नवीन पैलू गुंतवणूकदार म्हणून आपण समजून घेऊया. प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक सोन्यात गुंतवणूक करत असते. गेल्या वर्षभरापासून जगभरातील प्रमुख विकसनशील देशातील मध्यवर्ती बँकांनी सोने विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. अक्षरशः कित्येक टन सोने विकत घेतले गेले आहे. त्यामुळे अर्थातच सोन्याची मागणी अचानक वाढून तेवढा पुरवठा नसल्यामुळे भाव वाढ झालेली दिसत आहे.

मुहूर्तावर डिजिटल सोने घ्या!

आता मुद्दा गुंतवणूक निर्णय घेण्याचा. आपण गुंतवणूकदार म्हणून सोन्याचे महत्त्व कधीही दुर्लक्षित करून चालणार नाही. भारतातील कुटुंबांमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी सर्वच महत्त्वाच्या दिवशी थोडे का होईना, सोने खरेदी करण्याची परंपरा जपली जाते, तिलाच डिजिटल रूप देण्याची वेळ आता आली आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गोल्ड फंड योजना उपलब्ध करून दिल्या जातात. त्या माध्यमातून आपण आपल्याकडे असलेल्या रकमेइतके सोने घेऊ शकतो.

उदाहरण – एखाद्या व्यक्तीकडे अवघे वीस हजार रुपये असतील तर तो दुकानात जाऊन किती कमी प्रमाणात सोने विकत घेईल? पण गोल्ड फंडामध्ये पैसे ठेवल्यास तेवढ्या मूल्याचे सोने त्याला विकत मिळेल. हे डिजिटल पद्धतीने विकत घेतलेले सोने असल्यामुळे यात सांभाळून ठेवण्याची जोखीमसुद्धा नाही.

जर तुमच्याकडे डिमॅट खाते असेल तर गोल्ड ईटीएफ या माध्यमातून तुम्ही सोने विकत घेऊ शकता. गोल्ड फंड आणि गोल्ड ईटीएफ हे दोन्ही पर्याय जवळपास सारखेच आहेत.

पोर्टफोलिओत सोने किती असावे?

एकूण गुंतवणुकीपैकी पाच ते दहा टक्के गुंतवणूक गोल्ड फंडात करायला हरकत नाही. हळूहळू जगात डॉलरचे महत्त्व कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वी मध्यवर्ती बँका हमखास परतावा मिळण्यासाठी डॉलरमध्ये गुंतवणूक करत असत, आता हळूहळू डॉलरवरील विश्वास कमी होत चालल्याने म्हणा किंवा भविष्यातील ‘ट्रेंड’ म्हणूया सोन्यातील गुंतवणुकीत वाढ होत आहे.

जोपर्यंत सोने दागिन्यांसाठी आणि गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे आहे, तोपर्यंत सोन्याची मागणी जास्त आणि पुरवठा कमी हे सूत्र कायमच राहणार आहे. म्हणून पोर्टफोलिओचा अगदी छोटासा हिस्सा सोन्यातील गुंतवणूक म्हणून असला पाहिजे.

अर्थात दरवर्षी एका ठरलेल्या दराने सोने वाढेल, ही अपेक्षा मात्र ठेवणे योग्य नाही. सध्या सुरू असलेले जागतिक अस्थिरतेचे वातावरण शांत झाले तर कदाचित सोन्याच्या दरात घसरण येऊन काही काळ तेजीच्या ऐवजी मंदीचे वातावरणसुद्धा येऊ शकते, पण दीर्घकाळात पोर्टफोलिओला कवच म्हणून सोने हा पर्याय दुर्लक्षित करून चालणार नाही.

गुंतवणुकीचे शास्त्र तेच आहे, मार्ग बदलायची गरज आहे. या दिवाळीला डिजिटल माध्यमातून सोने विकत घेऊन एक नवीन सुरुवात करूया!