प्रतिशब्द : leveraged trading – लाभकारी ट्रेडिंग

एआर, व्हीआर ही आजच्या पिढीची कौतुकस्थाने आहेत. ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) यांचे वेगळेपण म्हणजे एआरमध्ये वापरकर्त्याला त्याचे काही इनपुट देण्याची संधी असते. या इंटरॲक्शनच्या सोयीमुळे ते अनेकांना भावते. मोबाईल फोनचा कॅमेरा आणि सेन्सर्सचा वापर करून भोवतालच्या अस्सल जगतातील प्रतिमा आणि चित्रांना वास्तवापेक्षा मोठे आणि मनोहारी रूप देण्याची खुबी म्हणजे ऑगमेंटेड रिॲलिटी. हे ऑगमेंटेशन म्हणजेच गोष्टी अधिक भर घालून वाढविल्या, चढविल्या जाणे ही जगाची रीतच आहे. नफा-नुकसान हेच सारसर्वस्व असलेल्या शेअर बाजारातही या ऑगमेंटेशनला अलीकडे भारी महत्त्व आहे. गुंतविलेल्या शेअर्सच्या किमती अवास्तव फुगत जाव्यात आणि फायदा पदरी पडावा, असे कुणालाही वाटणे स्वाभाविकच. हे शक्य करणारे रीतसर मार्गही उपलब्ध आहेत, त्याचाच आज ‘प्रतिशब्द’मधून वेध घेऊ.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एआर आणि व्हीआर या दोन्ही आजच्या डिजिटल जगताच्या किमया आहेत. नवीन तंत्रज्ञान साधने वापरून शेअर व्यवहारही वेगवान आणि वाढीव फायद्याचा बनत चालला आहे. बाजारातील बदलते प्रवाह (ट्रेंड्स) समजून घेण्यासाठी वापरले जाणारे चार्टिंग टूल्स आणि इंडिकेटर; पूर्वनियोजित सूचनांनुसार आपोआप व्यवहार करणारे अल्गोरिदमिक ट्रेडिंग (अल्गो-ट्रेडिंग) तसेच क्वांट ट्रेडिंग, स्क्रीनर हे सध्या मदतीला आहेत. समजुतीने वापरावयाची ही तंत्र आणि साधने असून, त्यांच्या जागी त्यांना महत्त्व आहेच. परंतु, त्याआधी आलेले नव्या जमान्याचे ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, डिस्काऊंट ब्रोकर्स आणि त्याही पुढे शून्य अथवा अत्यल्प दलाली असलेल्या ट्रेडिंग ॲप यांनी शेअर बाजाराला सर्वतोमुखी करण्यात मोठी भूमिका निभावली आहे. याच मंडळींकडून एक लोकप्रिय बनलेले साधन म्हणजे मार्जिन ट्रेडिंग फंडिंग (MTF – एमटीएफ) सुविधा होय.

ग्राहक बाजारपेठेत आता बोलबाला असलेल्या ‘बाय नाऊ, पे लेटर (BNPL)’ सारखीच शेअर बाजारात एमटीएफ सुविधा कार्य करते. काहीसे वेगळेपण असे की, हिचे स्वरूप ‘पे लेस, बाय बिग’ असे म्हणजेच कमी किमतीत वाढीव खरेदी करा असे आहे. अर्थात ऑगमेंटेड खरेदी आणि ऑगमेंटेड लाभ देणारी ही लीव्हरेज्ड ट्रेडिंगची (leveraged trading) पद्धती आहे. समजा, १०० रुपये मूल्याचे शेअर तुम्हाला खरेदी करायचे असतील, तर तुमच्याकडे असलेल्या २० रुपयांतही तुम्हाला ते शक्य आहे. उरलेले ८० रुपये तुमचे डिमॅट खाते ज्या ट्रेडिंग ॲपवर आहे ती दलाली पेढी तुम्हाला व्याजी उधारीवर देईल. पैसा नाही म्हणून शेअर खरेदी करता आला नाही, अशी खंत त्यामुळे मनी राहत नाही. जाहिरातच अशी लोभस की, ‘तुमच्याकडे असलेल्या पैशाच्या चार-पाच पटीने अधिक बिनधास्त बाजी लावा, वरच्या पैशाची फिकीरच नको, रग्गड कमवा!’

वर दिलेल्या उदाहरणातील २० टक्के हे गुंतवणूकदाराचे मार्जिन झाले. परंतु २०/८० असे हे प्रमाण ठोस नाही आणि ते तुम्ही कोणत्या शेअरची खरेदी करता यानुसार बदलत असते. या ठिकाणी तुम्ही उधारीवर खरेदी करणारे शेअर्सच हेच या उसनवारीच्या व्यवहारातील तारण असते. त्यामुळे त्या शेअरचा पैसा किती हे पाहून ब्रोकर / दलाली पेढी त्यावर किती पैसा लावावा आणि तुमचे मार्जिन किती असावे हे ठरवितो. प्रत्येक दलाली पेढीची स्वतःच्या विशिष्ट अटी-शर्ती, लीव्हरेज/ मार्जिन मर्यादा आणि व्याजदर हे ठरलेले असतात. व्यवहार करताना त्याचा एकवार गुंतवणूकदारांनी पडताळा करायलाच हवा. वार्षिक ६.९९ टक्के (म्हणजेच दिवसाला ०.०१९२ टक्के) येथपासून ते वार्षिक १४.९५ टक्के (म्हणजेच दिवसाला ०.०४१ टक्के) इतक्या व्याजदराने एमटीएफ सुविधा पुरविणाऱ्या दलाली पेढ्या आणि ट्रेडिंग ॲप्स सध्या आहेत. म्हणजेच १००० रुपयाच्या उधारीवर सुरू केलेल्या शेअर व्यवहारावर दिवसाला १९.२ पैसे ते ४१ पैसे या दरम्यान व्याज पडेल.

गेल्या काही वर्षात अशा अल्पकालीन उसनवारीतून शेअर व्यवहाराचा प्रघात गुंतवणूकदारांमध्ये वाढला आहे. तुम्ही डिमॅट खाते उघडले, म्हणजे तुम्हाला एमटीएफची सोयही आहे, इतके त्याला सार्वत्रिक रूप आले आहे. सरलेल्या ऑगस्टमध्ये एमटीएफची मात्रा ९६,०५७ कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेल्याची बाजारप्रणालीने नोंद केली आहे. त्या आधी जुलैअखेर त्याचे प्रमाण ९५,७३८ कोटी रुपयांवर होते. ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ धमक्यांनी बेजार शेअर बाजारात मोठे चढ-उतार सुरू असताना, सामान्य वैयक्तिक गुंतवणूकदारांमध्ये हे उसने धाडस दिसून आले. शून्य अथवा अत्यल्प दलाली असणाऱ्या ग्रो, झिरोधा, ५ पैसा, एंजलवन वगैरेंचे भागते कसा, असा कोणाला प्रश्न पडला असेल, तर त्याचे हे उत्तर आहे. आयपीओद्वारे गुंतवणूकदारांपुढे आलेल्या ग्रोचा (बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेन्चर्स) गत वर्षीच्या पहिल्या तिमाहीतील महसुलात एमटीएफचा हिस्सा अवघा ०.१ टक्के होता. जून २०२५ अखेर तिमाहीत तो ३.१ टक्क्यांवर गेला आहे. तब्बल ३० पटीने वाढीचा हा वार्षिक दर एमटीएफचे गुंतवणूकदारांतील आकर्षण स्पष्ट करतो.

बाजार विश्लेषकांच्या मते, बाजारात चढ-उतार सुरू असतानाच एमटीएफचा गुंतवणूकदारांना अनावर मोह जडत असतो. एफ अँड ओ ट्रेडिंगच्या तुलनेत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एमटीएफ समजणे सोपे आहे आणि तुलनेने कमी धोकादायकही आहे, असेही काही जाणकार सांगतात.

मुळातच शेअर व्यवहार हा उच्च-जोखमीचा, त्याला उधार पैशासह अतिरिक्त जोखमीची जोड देणे तुम्हाला पेलेल, परवडेल काय, हे पाहणे या ठिकाणी महत्त्वाचे. हे ‘लीव्हरेज्ड ट्रेडिंग’ लाभाची शक्यता सुचविणारे आणि ज्यामुळे संभाव्य नफ्याचा गुणाकार शक्यही आहे. परंतु या उसन्या धाडसात, गुंतवणुकीचे मूल्य कमी झाल्यास नुकसानीची शक्यताही मोठीच आहे. ही अल्पकालीन कर्ज रक्कम असून, त्यावर व्याज आकारले जाते आणि त्याची परतफेड करावी लागते, याचा विसर हे धाडस करताना होऊ नये. जे लोभस आहे ते नेहमीच लाभदायी असतेच असे नाही.

ई-मेलः sachin.rohekar@expressindia.com