या स्तंभातील २६ मेच्या ‘ही वाट दूर जाते’ या शीर्षकाच्या लेखात निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन आलेखन केेले होते. लेखातील वाक्य होते – आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाला २४,४५० चा भरभक्कम आधार आहे. तेजीच्या वाटचालीत निफ्टीचे प्रथम वरचे लक्ष्य २५,००० ते २५,२००, तर द्वितीय वरचे लक्ष्य २५,५०० ते २५,८०० असेल. या स्तरावरून एक घसरण अपेक्षित असून तिचे प्रथम खालचे लक्ष्य २४,५०० ते २४,००० असेल. या घसरणीत निफ्टी निर्देशांकावरील ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ असलेला २४,००० चा स्तर राखणे नितांत गरजेच आहे.”

काळाच्या कसोटीवर वरील वाक्य तपासता, निफ्टी निर्देशांकावरील तेजीच्या वाटचालीतील प्रथम वरचे लक्ष्य २५,००० हे २६ मेला २५,०७९ चा उच्चांक मारत त्याने साध्य केले. या स्तरावरून २४,५०२ पर्यंतची ५०० अंशांची घसरण ही ३ जूनपर्यंत पूर्ण करत, सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील सुखद निर्णय ज्यात कर्जावरील व्याज हे अर्ध्या टक्क्यांनी स्वस्त झाल तसेच बँकांसाठी रोख राखीव प्रमाण (सीआरआर) हा एक टक्क्यांनी कमी केल्याने बँकाकडे अडीच लाख कोटींची वाढीव रोकड तरलता निर्माण होईल. या निर्णयांनी निफ्टीच्या तेजीच्या वाटचालीला रसद मिळाली.

इलियट वेव संकल्पना, गॅन कालमापन पद्धतीचा आधार घेता, २६ मेच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे ९ ते १३ जून या कालावधीत २५,००० ते २५,२०० या पहिल्या आणि २५,५०० ते २५,८०० या द्वितीय वरच्या लक्ष्याच्या दिशेने निफ्टी निर्देशांक झेपावण्याची शक्यता आहे. उपरोक्त स्तरावर निफ्टी निर्देशांक उच्चांक नोंदवत घसरणीला सुरुवात होईल, अशी शक्यताही आलेखावर दिसत आहे. या अनुषंगाने अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा (गुंतवणूक कालावधी तीन महिने) असलेल्या गुंतवणूकदारांनी सावध होऊन नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर. निफ्टी निर्देशांकावरील उच्चांकाच्या लक्ष्यपूर्तीनंतर निफ्टी निर्देशांकावर १,००० ते १,५०० अंशांची घसरण संभवते.

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेची

या स्तंभातील १९ मेच्या लेखात ‘डीएलएफ लिमिटेड’ समभागाचे निकालपूर्व विश्लेषण केलेले होते. त्या समयी शुक्रवार १६ मेचा बंद भाव ७१६ रुपये होता, तर वित्तीय निकालानंतरचा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ हा ७१० रुपये होता. समभागाचा निकाल उत्कृष्ट असल्यास, डीएलएफ लिमिटेड ७१० रुपयांचा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखत ७७० रुपयांचे वरचे लक्ष्य साध्य करेल असे नमूद केलेले होते. निकालापश्चात डीएलएफ लिमिटेडने ७१० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत, २६ मेला ७९० रुपयांचा उच्चांक नोंदविला आणि लेखात नमूद केलेले ७७० रुपयांचे वरचे लक्ष्य साध्य केले. ही सर्व किमया अवघ्या ६ रुपयांच्या ‘स्टॉप लॉस’ संकल्पनेवर (१६ मेचा बंद भाव ७१६ तर ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ हा ७१० रुपये) घडून आली आहे.

या सर्व प्रक्रियेत अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत ७.५ टक्क्यांचा परतावा मिळाला. हे झाले अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसंदर्भात. आता दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसंदर्भात पाहू. निकालापश्चात समभाग ७१० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत असल्याने, दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी आपला समभाग निश्चिंतपणे राखून ठेवावा. रिझर्व्ह बँकेच्या अनुकूल पतधोरणातील सर्वात मोठे लाभार्थी क्षेत्र हे ‘घरबांधणी क्षेत्र’ असून, त्यात डीएलएफ लिमिटेड ही या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. गृहकर्ज स्वस्त झाल्याने भविष्यात घरांची मागणी वाढणार हे ध्यानात घेऊन, रिझर्व्ह बँकेचा कपात निर्णय आल्यावर तेजीची जी आतिषबाजी झाली त्यात डीएलएफ लिमिटेडने दिवसांतर्गत ८८४ चा उच्चांक नोंदवला आणि शुक्रवार ६ जूनचा त्याचा बंद भाव ८८० रुपये आहे. आज महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ही संकल्पना ही अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांना ७.५ टक्क्यांचा परतावा तर दीर्घमुदतीच्या गुंतवणूकदारांना २२ टक्क्यांचा परतावा (७१६ रुपये ते ८८० रुपये) देणारी ठरली. हा सर्व परतावा फक्त ६ रुपयांच्या ‘स्टॉप लॉस’ संकल्पनेवर दिला गेला, हे विशेष.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाने सर्व गुंतवणूकदारांसाठी ‘पंचपक्वान्नाची मेजवानीच, की हो!’ असं म्हणायला हरकत नाही.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणी ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक.