मुंबई : मध्यवर्ती बँकेकडून व्याज दरवाढीच्या धसक्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तू, धातू आणि वाहन निर्मात्या कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या घसरणीमुळे  भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये मंगळवारी घसरण झाली. रिझव्‍‌र्ह बँक ८ फेब्रुवारीला पतधोरण जाहीर करणार असून तज्ज्ञांच्या मते बँकेकडून रेपो दरात ०.२५ ते ०.३५ टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २२०.८६ अंशांनी घसरून ६०,२८६.०४ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी  २२ कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. संमिश्र जागतिक कलामुळे निर्देशांक दिवसभरात ६०,६५५.१४ ते ६०,०६३.४९ या मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होता.

दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४३.१० अंशांची घसरण झाली आणि तो १७,७२१.५० पातळीवर स्थिरावला. त्यातील आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी ३१ कंपन्यांचे समभाग नकारात्मक पातळीवर बंद झाले. सत्रादरम्यान निर्देशांकाने १७,८११.१५ अंशांची उच्चांकी, तर  १७,६५२.५५ अंशांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

अमेरिकेतील मजबूत रोजगारवाढीच्या आकडेवारीनंतर बाजारावर मंदीवाल्यांनी ताबा घेतला, त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले. जागतिक पातळीवर मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमुळे आणि अधिक व्याज दरवाढीच्या अपेक्षेने रोख्यांवरील परतावा दर वाढला आहे. अमेरिकी गुंतवणूकदारांचे जेरोम पॉवेल यांच्या भाषणाकडे लक्ष लागले आहे. परिणामी अमेरिकी बाजारात दिवसाच्या दुसऱ्या सत्रात वायदा बाजारात वाढ झाली, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये टाटा स्टीलच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तिसऱ्या तिमाहीत टाटा स्टीलच्या महसुलात घट आणि खर्चात वाढ झाल्यामुळे डिसेंबर तिमाहीत कंपनीला २,२२४ कोटींचा तोटा झाला. परिणामी तो ५ टक्क्यांहून अधिक घसरला.

त्यापाठोपाठ आयटीसी, सन फार्मा, मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, एचयूएल, भारती एअरटेल आणि रिलायन्सचे समभाग घसरणीसह बंद झाले. तर कोटक बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसव्‍‌र्ह, लार्सन अँड टुब्रो, स्टेट बँक, टीसीएस आणि एचडीएफसी बँकेचे समभाग तेजीसह स्थिरावले.

अदानी एंटरप्रायझेसमध्ये १५ टक्के तेजी

अदानी एंटरप्रायझेसने घसरणीचा कल मोडत मंगळवारच्या सत्रात १५ टक्के वधारून १९६२ या सत्रातील उच्चांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेर तो १४.६३ टक्क्यांनी म्हणजेच २३०.२५ रुपयांनी वधारून १८०२.९५ रुपयांवर स्थिरावला. तर अदानी पोर्टला डिसेंबर तिमाहीत तोटा होऊनदेखील तो १.३३ टक्के तेजीत होता. त्यापाठोपाठ अदानी विल्मरचा समभाग देखील ४.९९ टक्के म्हणजेच १८.९५ रुपयांनी वधारून ३९८.९० रुपयांवर बंद झाला.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex plunges 220 degrees caution on rbi policy ysh