Rekha Jhunjhunwala accused of Insider Trading: ऑनलाइन गेमिंग नियंत्रित करण्यासाठी कायदा मंजूर झाल्यापासून, नजारा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. ५ दिवसांत शेअर १९ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. परंतु दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आणि स्वतः एक मोठ्या गुंतवणूकदार असलेल्या रेखा झुनझुनवाला, त्यांच्या एका निर्णयामुळे या शेअरमधील होणाऱ्या नुकसानीपासून वाचल्या आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी जून २०२५ मध्येच नजारा टेकमधील त्यांचा संपूर्ण हिस्सा विकला होता.

दरम्यान, रेखा झुनझुनवाला यांनी सरकारने ऑनलाइन गेमिंगवर नवीन विधेयक आणण्यापूर्वीच हा निर्णय घेतला होता. त्यांनी नजारा टेकमधील हा हिस्सा तीन वेळा विकला. पहिल्यांदा त्यांनी २-६ जून दरम्यान आणि दुसऱ्यांदा ९-१० जून रोजी या कंपनीचे शेअर्स विकले. त्यानंतर, १३ जूनपर्यंत, त्यांनी संपूर्ण हिस्सा विकला, ज्यामुळे भारतातील आघाडीच्या सूचीबद्ध गेमिंग कंपनीशी असलेले त्यांचे संबंध संपुष्टात आले. यामुळे, रेखा झुनझुनवाला यांनी स्वतःचे ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान टाळले आहे. कारण ऑनलाइन गेमिंग नियंत्रित करणारा कायदा मंजूर झाल्यापासून, नजारा टेकचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत.

सोशल मीडियावर इनसायडर ट्रेडिंगची चर्चा

जरी रेखा झुनझुनवाला यांनी हा कायदा मंजूर होण्यापूर्वी नजाराचे शेअर्स विकले असले तरी, यामुळे आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर बरेच लोक याला इनसायडर ट्रेडिंग म्हणत आहेत. याचबरोबर अनेकजण दावा करत आहेत की, रेखा झुनझुनवाला यांला ऑनलाइन गेमिंगवर एक नवीन विधेयक येणार आहे हे आधीच माहित असावे.

सोशल मीडियावर अनेकांनी लिहिले आहे की, मोठ्या गुंतवणूकदारांना आधीच आतील गोष्ट माहित असतात का? प्रत्येकाकडे अशी माहिती नसते, म्हणूनच काही श्रीमंत गुंतवणूकदार नफ्यात राहतात. पण, काही लोक याला मोठ्या गुंतवणूकदारांची दूरदृष्टी म्हणत आहेत. ते म्हणतात की, हे विधेयक आधीच अपेक्षित होते, म्हणून त्यातून बाहेर पडणे सामान्य ज्ञान आहे. सध्या या व्यवहारात इनसायडर ट्रेडिंगचा कोणताही पुरावा नाही.

महुआ मोइत्रा यांचे आरोप

रेखा झुनझुनवालांच्या निर्णयानंतर टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्याला इनसायडर ट्रेडिंग म्हटले आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “अगदी स्पष्टपणे हे इनसाइडर ट्रेडिंग आहे. अमेरिकेत असे घडले असते, तर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने संपूर्ण चौकशी केली असती साक्ष, फोन व डिजिटल नोंदी तपासल्या गेल्या असत्या. पण भारतात, भक्त टाळ्या वाजवतात आणि सेबी झोपलेली असते.”

इनसायडर ट्रेडिंग काय आहे?

हा विषय भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या किंवा सूचिबद्ध होऊ घातलेल्या कंपन्या आणि त्यांच्या संबंधित लोकांना लागू होतो. सूचिबद्ध कंपनी व्यवहार करत असताना अनेक गोपनीय व्यवहारांवर काम करत असते. ते गोपनीय व्यवहार पूर्णत्वास गेल्यावर किंवा त्यासंबंधी काही महत्वाची घडामोड झाल्यावर त्याबद्दलची माहिती भांडवली बाजाराला कळवत असते. ही माहिती भांडवली बाजारामार्फत सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचल्यानंतर सूचिबद्ध शेअरच्या बाजारभावात फरक पडणे अपेक्षित असते. त्या काळात या गोपनीय व्यवहाराबद्दल माहिती असणाऱ्यांनी त्या शेअरमध्ये व्यवहार करणे याला इन्साईडर ट्रेडिंग असे म्हणतात. कायद्यानुसार अशी गोपनीय माहिती कोणालाही सांगणे अथवा त्या माहितीच्या जोरावर शेअर्समध्ये व्यवहार करणे हे निषिद्ध आहे आणि तसे झालेले आढळल्यास कठोर दंड ठोठावला जातो.