मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे(Mumbai-Pune Expressway)वरून मुंबई ते पुण्याच्या दिशेने तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून एक्स्प्रेस वेवरून जाणाऱ्या वाहन चालकांना अधिक टोल टॅक्स भरावा लागणार आहे. म्हणजेच पुढील महिन्यापासून टोलचे दर १८ टक्क्यांनी वाढणार आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा खर्च वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या मते, एक्स्प्रेस वेवरील टोल दरवर्षी ६% ने वाढतो, परंतु दर तीन वर्षांनी तो एकदाच लागू होतो. यापूर्वी १ एप्रिल २०२० रोजी टोलमध्ये वाढ करण्यात आली होती. दर तीन वर्षांनी टोलवाढीबाबत अधिसूचना जारी केली जाते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एमएसआरडीसी दरवर्षी ई-वेवरील टोलमध्ये ६ टक्क्यांनी वाढ करते, परंतु ती वाढ तीन वर्षांनी एकाच वेळी लागू केली जाते. गणनेनुसार १ एप्रिलपासून टोलमध्ये १८ टक्के वाढ होणार आहे. त्यानुसार टोलमध्ये वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अहवालानुसार बस, कार आणि ट्रकचा टोल टॅक्स वाढणार आहे.
जाणून घ्या खिशाला किती कात्री लागणार?
१ एप्रिलपासून खासगी वाहन चालकांना ९५ किमी लांबीच्या द्रुतगती मार्गावर एकेरी टोल म्हणून ३२० रुपये द्यावे लागतील. तो सध्या २७० रुपये आहे. पुणे ते मुंबईच्या फोर्ट परिसरात जाण्यासाठी कार चालकांना ३६० रुपये (एक्स्प्रेस वेवर ३२० रुपये आणि वाशीजवळ ४० रुपये) मोजावे लागतील. टेम्पो टोल ४२० वरून ४९५ पर्यंत वाढेल. ट्रकसाठी ५८० ऐवजी ६८५ रुपये बसला आता ७९७ रुपयांऐवजी ९४० रुपये टोल भरावा लागणार आहे. टोल टॅक्स वाढल्याने मुंबई आणि पुण्याच्या मार्गावरील टॅक्सी आणि बसचे भाडेही वाढू शकते. वाढीव टोल टॅक्सचा बोजा बस आणि टॅक्सी चालकांवर पडण्याची शक्यता आहे.
टोल टॅक्स ५ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला
विशेष म्हणजे देशातील अनेक राज्यांमध्ये टोल टॅक्सचे दर वाढवण्यात आले आहेत. यामध्ये हरियाणाचाही समावेश आहे. हरियाणामध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने लागू केलेले नवीन टोल दर १ एप्रिलपासून म्हणजेच आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून टोल प्लाझावर लागू होतील. टोल टॅक्स ५ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला आहे. ज्या रस्त्यांवरील टोल टॅक्स वाढवण्यात आला आहे, त्यात कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्ग (KMP एक्सप्रेसवे) समाविष्ट आहे. विशेष बाब म्हणजे दिल्ली-जयपूर महामार्गावरील गुरुग्रामच्या खेरकी दौला येथे असलेल्या टोल प्लाझावर खासगी वाहनांच्या टोल दरात वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, व्यावसायिक वाहनांना या टोलनाक्यावर ५ टक्के अधिक टोल भरावा लागणार आहे.
रोडवेज बसमधून प्रवास करणाऱ्यांनाही वाढीव टोलचा भार
टोल टॅक्स वाढल्याने प्रवास महाग होणार आहे. केवळ खासगी वाहनचालकच नव्हे तर रोडवेज बसमधून प्रवास करणाऱ्यांनाही वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. टोल दर वाढवल्यानंतर हरियाणा रोडवेजही भाडे वाढवणार आहे. हरियाणातील कुंडली ते पलवल मार्गे मानेसर या KMP एक्सप्रेस वेवर टोल टॅक्स ७ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. केएमपी एक्स्प्रेस वेवर प्रति किलोमीटरच्या स्वरूपात टोल टॅक्स भरावा लागतो. एक्सप्रेसवेवर कार आणि जीपला १ एप्रिलपासून प्रति किलोमीटर १.६१ रुपयांऐवजी १.७३ रुपये प्रति किलोमीटर मोजावे लागणार आहेत.