हैदराबाद येथील रोहित वेमुला या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण देशातील विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाच्या मार्गाने निषेध नोंदविला. याबाबत संघटनांची बाजू सातत्याने समोर येत होती. मात्र सामान्य विद्यार्थ्यांना याबाबत काय वाटते हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
माझ्या मते, या घटनेमध्ये राजकारण आणले जात आहे. या प्रकरणात जातीचे राजकारण केले जात आहे. रोहितच्या आत्महत्येला समर्थन देऊच शकत नाही. मात्र पुरोगामी संघटनांचा विरोध व राजकीय पक्षांचा हस्तक्षेप हे चुकीचे आहे. पण सध्या या विषयाला दलित विरुद्ध दलितेतर स्वरूप दिले जात आहे. या घटनेला बऱ्याच पुरोगामी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र सध्याच्या काळात पुरोगामी म्हणवून घेणे याला सेलिब्रिटी स्टेटस् मिळाले आहे. अजूनही भारतामध्ये वैचारिक प्रगल्भता रुजलेली नाही हे दुर्दैव.
– सर्वेश जोशी, डहाणूकर महाविद्यालय, तृतीय वर्ष, बी.एम.एम.
शिक्षणाचे राजकारण नको ही माझी प्राथमिक भूमिका आहे. रोहितची आत्महत्या प्रकरण संवेदनशीलतेने हाताळणे आवश्यक आहे. रोहितच्या आत्महत्येची चौकशी संवैधानिक मार्गाने व्हावी व यासाठी जबाबदार व्यक्तीस योग्य ती शिक्षा व्हायला हवी. जर असे घडले नाही तर लोकांचा या व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही. आज रोहित आहे उद्या आणखीन कोणी असेल. शिक्षण व्यवस्थेमध्ये जातीपर वागणूक दिली जाणे हे अतिशय घातक आहे.
– अमित जाधव, मुंबई विद्यापीठ
एक पीएच.डी. करणारा सुशिक्षित व वैचारिक बांधिलकी असणाऱ्या मुलाच्या आत्महत्येवरून मुले सक्रिय होऊन काहीतरी करू पाहत आहेत ही चांगली बाब आहे. आतापर्यंत दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी राजकीय विषयांवर पुढे येणारे, आंदोलने करणारे होते, मात्र रोहितच्या प्रकरणानंतर मुंबई विद्यपीठातील विद्यार्थीदेखील राजकीयदृष्टय़ा सजग व निर्भीडपणे आपले मत नोंदवत आहेत. हा जरी एका बाजूला सकारात्मक प्रतिसाद असला, तरी दुसऱ्या बाजूला रोहितच्या आत्महत्येनंतर मात्र विद्यार्थाच्या मतांना शिक्षण क्षेत्रात जागा नसल्याचे सिद्ध झाले आहे. कारण विद्यार्थासाठी शिक्षण आहे पण आम्हाला आमचे मत नोंदविण्याची जागा नाही. जे आहे.. जसे आहे.. तसेच आम्ही स्वीकारायचे. ते जमले नाही तर आंदोलने करायची आणि त्यालाही प्रतिसाद दिला गेला नाही तर गप्प बसून राहायचे. ज्यांच्यासाठी हा पर्याय नसतो, ती रोहितसारखी मुले आत्महत्येचा पर्याय निवडतात.
– आसावरी फडके, मुंबई विद्यापीठ, राज्यशास्त्र, द्वितीय वर्ष
दलितांच्या आत्महत्या, त्यांच्यावर होणारे अत्याचार हे आजही भारतामध्ये कित्येक ठिकाणी होत आहेत हे खूप गंभीर आहे. उभा भारत रोहितच्या पाठीशी उभा आहे. यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्यांचा हक्क डावलला जातो हे नक्की. व्यवस्था सुधारण्यासाठी विद्यार्थी आंदोलने करीत आहेत. शिक्षण घेताना त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले जाते, तर त्यांनी केलेल्या तक्रारींची अंमलबजावणीही केली जात नाही. मात्र रोहितने निवडलेला मार्ग योग्य नव्हता हेही तितकेच खरे आहे. आशावाद माणसाला जिवंत ठेवतो. मात्र रोहितच्या आत्महत्येने अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे व याची उत्तरे सरकारला देणे गरजेचे आहे.
– गंधार पंडित, साठय़े महाविद्यालय, तृतीय वर्ष कला शाखा
रोहित वेमुलाच्या प्रकरणात त्याने आत्महत्या केली किंवा दबावामुळे त्याला करावी लागली, यात नक्कीच त्याला विद्यापीठात त्रास झाला असेल हे उघड आहे. कारण कुठलीही व्यक्ती तिच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेले असेल तरच आत्महत्येचा पर्याय निवडते. मात्र यावर हैदराबाद विद्यपीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा देऊन प्रश्न सुटणार आहे का? या प्रश्नावर परिणामकारक उपाय शोधणे गरजेचे आहे. या प्रकरणावर निर्णय देताना राजकीय हेतू बाजूला ठेवून प्रक्रिया आखली जाणे महत्त्वाचे आहे. मात्र दुसऱ्या बाजूला हैदराबाद विद्यपीठ पूर्णत: दोषी आहे असेही मला वाटत नाही. या एका प्रकरणावरून संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच निकामी आहे असे नाही. मी ज्या महाविद्यालयात शिकते तेथे माझ्यावर कधीच दबाव आणला नाही. त्यामुळे हाताची पाचही बोटे समान नसतात, त्याप्रमाणे सर्व शिक्षण व्यवस्था चुकीची ठरत नाही. मात्र ज्या ठिकाणी असमानतेची वागणूक दिली जात असेल त्या व्यक्तींना शासन होणे हे गरजेचे आहे.
– प्रांजली कुलकर्णी, रुपारेल महाविद्यालय, द्वितीय वर्ष कला शाखा