पुढच्या उमेदवारासाठी हाक आली आणि नरेश आत शिरला. तिथल्या चकचकीत वातावरणात नरेश अगदी भांबावून गेल्यासारखा दिसत होता. त्याची बेतास बात परिस्थिती त्याचे कपडे आणि एकंदर देहबोलीतून कळून येत होती. या बँकेने खूप काळानंतर पदवीधर तरुणांसाठी नोकरीची दारं खुली केली होती. कॉमर्सची पदवी आणि चांगलं इंग्लिश येणं आवश्यक, असं जाहिरातीत स्पष्ट केलं होतं.
नरेशचं इंग्लिश बेताचं आहे हे पहिल्या पाच मिनिटांतच स्पष्ट झालं होतं. पुढच्या अनेक प्रश्नांची उत्तरं नरेशनं दिली ती थोडय़ा अडखळत्या इंग्लिशमध्ये, चाचरतच. पण त्याच्या बोलण्यामध्ये एक प्रामाणिकपणा होता. तो ज्या वातावरणातून आला होता, ते लपवायचा त्याने कुठेच प्रयत्न केला नाही. आपली शाळा, आई वडिलांचं शिक्षण, व्यवसाय याबाबत त्यानं मोकळेपणे सांगितलं. काही वेळानं एका अधिकाऱ्याने त्याला हिंदीतच पुढचे प्रश्न विचारले आणि एकंदरच वातावरणातला अदृश्य ताण थोडा सैल झाला. नरेशच्या बोलण्यात आणखी मोकळेपणा आला. मुलाखत संपली तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मितहास्य तर होतंच, पण त्यामागे एक अबोल सामंजस्यही होतं. ‘याला संधी देऊन पाहू या,’ असं तिथल्या सगळ्यांनाच वाटत होतं. नरेशचा सच्चेपणा सगळ्यांपर्यंतच पोहोचला होता.
नरेश एका झोपडपट्टीत वाढला होता. त्याच्या समवयस्क मुलांपैकी बरीचशी पोरं टवाळच होती. शाळेत गटांगळ्या खात कशीबशी नववी किंवा फारफार तर दहावी पासपर्यंत मजल गेलेली. नंतर कुणी क्लीनर, हेल्पर, कुणी मॉलमध्ये तर कुणी छोटय़ा-मोठय़ा दवाखान्यांमध्ये अडली नडली कामं करायला, कलाकार असेल तर बँजो पार्टीत वाजवणारा, ड्रम बडवणारा, तर अनेक जण ड्रायव्हर.. अशी काहीशी जवळजवळ प्रत्येकाची कथा. तीसुध्दा सरळ मार्गानं काही करू पाहणाऱ्यांची. इतरांचं तर काय बघायलाच नको.
अशा सगळ्या माहोलात नरेशचा मित्र सचिन हा त्याचा मोठा आधार होता. सचिनलाही नरेशसारखी अभ्यासात गती होती. दोघांनाही शिकण्याची कुठून प्रेरणा मिळाली आणि ते कसे शिकत गेले त्यांचं त्यांनाही कळलं नाही. दोघांच्या घरची परिस्थितीही अगदीच बेताची. पण मुलं शिकत आहेत म्हटल्यावर दोन्ही कुटुंबांनीही त्यांच्या अनेक इतर गरजांवर पाणी सोडून मुलांच्या शिक्षणावर असले-नसलेले सगळे पैसे खर्च केले. महापालिकेच्या शाळेतले काही शिक्षक दोघांच्या मागे उभे राहिले. या शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसाठी त्यांच्या ओळखीतल्या दुसऱ्या शिक्षकांकडे या मुलांना पाठवलं. त्या शिक्षकांनी मुलांना विनामूल्य शिकवलं. दर टप्प्याला चांगली माणसं मिळत गेली. शिवाय दोघांच्या कष्टाळू स्वभावामुळं दोघांनीही पदवीपर्यंतंचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या वसाहतीत ही मोठ्ठीच गोष्ट झाली! त्या गणेशेत्सवात दोघांचा थाटात सत्कारही झाला.
वसाहतीत वाढताना दोघांचीही खूपच कुचंबणा व्हायची. वसाहतीतल्या मुलांशी फार फटकूनही चालायचं नाही आणि त्यांची फार संगतही चालायची नाही – अशी तारेवरची कसरत असे. परीक्षांचा काळ तर फारच कठीण असे. एका खोलीच्या घरात शांतपणे अभ्यास करायची सोय नसे, देवळात पहाटे उठून जायचं, नाही तर शाळेच्या पटांगणात जाऊन बसायचं.. सणासुदीला मात्र वसाहतीतल्या इतर मुलांमध्ये मिसळण्यावाचून पर्याय नसे. अनेक मवाली मुलांची टिंगल टवाळीही अधेमधे सहन करावी लागे. मात्र या दोघांना एकमेकांचा खूपच आधार वाटे. कालांतरानं चाळीतल्या अनेकांना सचिन, नरेश वेगळी पोरं आहेत पण चांगली आहेत असं जाणवू लागलं. तेव्हापासून त्यांनी त्यांना त्रास देणं सोडून दिलं.
सचिन आणि नरेश दहावीनंतर एकाच कॉलेजमध्ये गेले. तुकडय़ा मात्र वेगळ्या पडल्या. कॉलेजमध्ये सुरुवातीला इंग्लिशची फारच पंचाईत झाली. शिकवलेलं थोडंबहुत कळायचं, बोलायची सगळीच बोंब. त्यात वर्गात बरीचशी मुलं बऱ्या आर्थिक स्तरातली होती. त्यांच्याबरोबर वावरणं, ऊठबस करणं कठीण गेलं. या मुलांचे चर्चेचे विषय, राहणीमान, खर्च.. सगळंच या दोघांपेक्षा वेगळं होतं. दोघांच्याही वर्गात काही समजूतदार मुलं होती ज्यांनी मात्र त्यांना अभ्यासात व इतर प्रकारे मदत केली. सचिन, नरेश दोघंही काही प्रमाणात न्यूनगंड घेऊन जगले, शिकले. बाहेरच्या सुशिक्षित जगाचा त्यांना इतर पोरांपेक्षा जास्त अंदाज होता आणि आपण कमी पडतो हे त्यांना नीट माहीत होतं.
शाळेत दहावीपर्यंत सचिन आणि नरेश अनेकांना सारख्या स्वभावाचे भाऊ च वाटायचे. अगदी जुळ्या भावांसारखे. कॉलेजपासून दोघांच्या वाटा थोडय़ा वेगळ्या होत गेल्या. नरेशचं आधी होतं तसंच सरळ नाकासमोरचं आयुष्य चालू राहिलं. अभ्यास, अतोनात कष्ट, विषयांची खोलवरची माहिती मिळवायची तळमळ आणि आपल्या सामाजिक आणि आर्थिक स्तराला साजेसं असं आयुष्य जगणं. जेवढी ऐपत तेवढाच खर्च. सचिनही तसाच कष्टाळू आणि अभ्यासू राहिला. शिक्षणाची किंमत त्यालाही कायमच कळून चुकली होती. मात्र सचिनचं थोडं वेगळंच होत गेलं, फार विचारपूर्वक असं नाही. सचिन थोडय़ा त्याच्या स्तराबाहेरच्या गोष्टी करू लागला. तो त्याच्या ऐपतीपेक्षा थोडे महागडे कपडे घालू लागला. त्यासाठी मग तो इतर कशावर तरी पाणी सोडत असे. पण कपडे कडक पाहिजेत हे त्यानं मनावरच घेतलं. त्यानं आपल्या दिसण्याकडंही खूप लक्ष दिलं. फाड फाड इंग्लिश बोलता आलं पाहिजे असं त्यानं ठरवलं. त्यासाठी मग संध्याकाळचा इंग्लिशचा वर्ग लावला. या सगळ्या खर्चासाठी त्यानं शिकवण्या केल्या. पडेल ती कामं केली. थोडं इंग्लिश शिकून आल्यावर सचिनचा सगळीकडं इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्नही सुरू झाला. शक्यतो चटपटीत चकचकीत जगात जास्तीत जास्त वावरायचे प्रयत्न त्यानं सुरू केले. त्यात नरेशबरोबर फारसं न वावरणंही मग आलंच.
छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या तर अगदी कॉलेजपासून दोघं करतच होते. पण पदवी मिळताच कायम स्थिर नोकरीसाठी दोघांनी जोरदार खटपटी सुरू केल्या. अशा त्यांच्या प्रयत्नाला नरेशला ही बँकेतली नोकरी मिळून गेली. सचिननं अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही त्याला अजून यश मिळालेलं नाही. कशामुळे असेल असं?
काही क्षेत्रांतल्या नोकऱ्यांना एक विशिष्ट आर्थिक आणि सामाजिक स्तर चिकटलेला असतो. अख्खी यंत्रणाच तशी बनून गेलेली असते. समाजातल्या विशिष्ट स्तरांतली मुलं, विशिष्ट शाळा-कॉलेजात जातात, त्यांची भाषा, राहणी, विचारसरणी, घरच्यांचा आर्थिक स्तर, त्यांचे खर्च, त्यांचे जगण्यासंबंधीचे विचार, सुखाची कल्पना.. सगळ्याची एक वीण पक्की असते. आणि यातलाच एक धागा असतो तो नोकरी करिअरचा. ज्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये, कंपन्यांमध्ये ही मुलं नोकऱ्या करतात, त्याचीही एक वीण पक्की असते. या सगळ्यात अचानक एक गाठ येते ती या स्तरापेक्षा खालच्या स्तरातल्या मुलांमुळे, नरेश-सचिनसारख्या मुलांमुळे. ही मुलं त्या सामाजिक आर्थिक स्तरातली नसतात, आणि त्यामुळे या विणीत येऊ पाहतात तेव्हा अनेक धाग्यांपेक्षा वेगळी दिसून येतात. हे जगही त्यांना स्वीकारायला बऱ्याचदा मग थोडा वेळ घेतं.
आज एका विशिष्ट स्तरातली व्यक्ती जेव्हा हात-पाय मारून त्या स्तराच्या वर डोकं काढू पाहते, तेव्हा आधीच तिची खूपशी शक्ती डोकं वर काढण्यातच खपलेली असते. अनेक आघाडय़ांवर अनेक प्रकारच्या छोटय़ा-मोठय़ा लढाया तिने केलेल्या असतात, त्यात ती झिजलेली असते. पण शिखर गाठायला आणि आणखीन थोडे हात-पाय मारायला हवेत हेही कळत असतं, तिथं जाता आलं की खूप गोष्टी सुरळीत होतील, असं मनापासून वाटत असतं, आणि इथेच सचिनसारख्या काही जणांना घाई होते. त्यांना वाटतं आपण खूप कष्ट केले, आपण लायक आहोत. (आणि जे खोटं नसतं) पण केवळ एका विशिष्ट स्तरातले असल्यामुळे आपली संधी हुकणार आहे, असं समजून ही मुलं ‘शॉर्टकट’ घेऊ पाहतात. तत्सम वरच्या स्तराच्या काही बाह्य़स्वरूपाच्या गोष्टी त्यांनी त्यांच्या परीनं त्यांच्या चष्म्यातून पाहिलेल्या असतात. ही मुलं मग अशा गोष्टी पटदिशी करायला जातात. हे केल्यानं त्यांना वाटतं- झालं, आता सगळं मिळालं. आता होऊन जाईल आपलं काम. आपल्याला आता एक चांगली नोकरी मिळेल आणि ‘लाइफ बनून जाईल’. या उलट असतात नरेशसारखी मुलं जी स्वत:च्या स्तरापासून फटकूनही राहत नाहीत, आणि त्याच्यातून निघण्याचा प्रयत्नही सोडत नाहीत.
सचिनसारख्या मुलांना हे कळतच नाही की, बाह्य़स्वरूपी वरवरचे फेरफार केले, जसं की झकपक कपडे, इंग्लिश बोलणं – तरी असल्या गोष्टी शेवटी वरवरच्याच ठरतात. तथाकथित वरच्या स्तरातलं जग या सगळ्याकडं मग कसं पाहतं? त्यांना ते दिखाऊ -भंपक वाटू शकतं. अशा व्यक्ती लोकांना विश्वासू वाटत नाहीत. या उलट नरेशसारखे लोक समोर आले तर ते स्वत:च्या स्तरातून वर यायला ‘लायक’ वाटतात, त्यांचा सच्चा प्रयत्न भावतो, त्यांना संधी द्यायची इच्छा होते, त्यांच्यासाठी जागा बनवण्याची इच्छा होते, आणि ते केल्यानं वरच्या स्तरातल्या लोकांनाही छान वाटतं. सचिनसारख्या लोकांनी हेही शिकणं गरजेचं असतं.
मिलिंद पळसुले – palsule.milind@gmail.com
