भारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानने ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम सुरू केला. स्वातंत्र्यपूर्व काळात सयाजीराव गायकवाड यांनी इ.स. १९११मध्ये डब्ल्यू. सी. बॉर्डन या अमेरिकन तज्ज्ञाला संस्थानात नवीन ग्रंथालये स्थापण्यासाठी बोलावून घेतले. इ.स. १९१३ मध्ये ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम नागरी ग्रंथपालांसाठी सुरू केला. पूर्वीपासून लोकांना काम, शिक्षण आणि आनंदासाठी कोणती पुस्तके वाचावीत याचा सल्ला देण्याची भूमिका ग्रंथपाल पार पाडत असतो. इंटरनेटमुळे माहितीच्या स्रोतांमध्ये बदल झाले आहेत, पण आजही माहितीचा सर्वात मोठा स्रोत म्हणून ग्रंथांकडेच पाहिले जाते. ग्रंथालयात लाखो पुस्तके असतात. या पुस्तकांमधून वाचकांना नेमके हवे असणारे पुस्तक शोधण्याचे काम ग्रंथपाल करतो. ग्रंथालयात नोकरीसाठी ग्रंथालय व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास असणे, गरजेचे असते. ग्रंथालयशास्त्र (लायब्ररी सायन्स) आणि माहितीशास्त्र या विषयाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. पुस्तके खरेदी करण्यासाठी
त्यांची यादी तयार करणे, आदी कामे ग्रंथपाल करतो. आजच्या डिजिटल युगात ग्रंथपालालाही तंत्रप्रवीण असावे लागते. पुस्तकवेडय़ा व्यक्तींसाठी हा उत्तम अभ्यासक्रम आहे.
अभ्यासक्रम आणि विद्यापीठे
अन्नमलाई, इग्नू, मणिपाल विद्यापीठ आणि हिंदू बनारस विद्यापीठ या ठिकाणी ग्रंथालय आणि माहिती शास्त्र पदवीचे अभ्यासक्रम घेतले जातात.
अभ्यासक्रम पदविका, पदवी, एम. फिल. आणि पीएच. डी. याप्रमाणे असतात. अगदी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाचा ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रम आणि ग्रंथालय प्रमाणपत्र परीक्षा आहे.
सर्टिफिकेट इन लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेश सायन्स (सी.एल.आय.एस्सी.)– हा एकूण सहा महिन्यांचा अभ्यासक्रम आहे.
पात्रता : दहावीनंतर
सर्टिफिकेट इन लायब्ररी सायन्स : दहावी, बारावीनंतर
बी.एल.एस्सी. : बारावीनंतर : तीन वर्षांचा अभ्यासक्रम
बॅचलर ऑफ लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन सायन्स (बी.एल.आय.एस्सी.) : पदवीनंतर कुठल्याही शाखेची पदवी पूर्ण करून बॅचलर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स (बी. लिब.) हा एक वर्षांचा पदवी अभ्यासक्रम करावा लागतो. त्यानंतर मास्टर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स (एम.लिब.) हा एक वर्षांचा अभ्यासक्रम आहे. पुढे एम.फिल. आणि पीएच.डी. करता येते.
डॉक्टर्स ऑफ लिटरेचर (डी.लिट.) : पीएच.डी.नंतर ग्रंथालयशास्त्रातून ‘सेट’ किंवा ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ग्रंथालयशास्त्राचा प्राध्यापक होण्याची संधी मिळते.
ग्रंथपाल बनण्यासाठी लागणारे गुण
लोकांशी संवाद साधण्याची कला, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि विशेष ग्रंथालये यांच्या गरजांनुसार हवी ती माहिती पुरविण्याची क्षमता.
संस्था
युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, जयकर लायब्ररी (पुणे)
मुंबई युनिव्हर्सिटी, सांताक्रूझ (मुंबई)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, (औरंगाबाद)
अमरावती युनिव्हर्सिटी, तपोवन (अमरावती)
काही नवीन अभ्यासक्रम
ग्रंथालय व माहितीशास्त्र
माहिती व मनोरंजनाच्या या क्षेत्रात आज अनेक साधनांची भर पडत आहे. त्यामुळेच ग्रंथालय व माहितीशास्त्र या ज्ञानशाखेकडे आज तरुण वर्ग आकर्षित होत आहेत. संगणकाचे जाळे आज जसे सर्वत्र पसरले आहे तसेच ग्रंथालयीन सेवेत, कामकाजात संगणकाचा वापर होत आहे. ग्रंथालयातील पारंपरिक सेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड लाभली आहे. त्यामुळे ग्रंथालयीन सेवा या गतिमान झाल्या आहेत. म्हणूनच वाचकांना आधुनिक सेवा देणाऱ्या सक्षम मनुष्यबळाची आज कमतरता भासत आहे. अनेक संस्था आधुनिक ग्रंथपालाच्या प्रतीक्षेत आहेत.
ग्रंथालय व माहितीशास्त्रात सक्षम, तज्ज्ञ व प्रशिक्षित ग्रंथपाल, ग्रंथालयीन कर्मचारी घडवण्यासाठी आणि ग्रंथालयीन सेवेचा जास्तीतजास्त लाभ वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ग्रंथालय व माहितीशास्त्र संकुल, नांदेड यांनी दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांला तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक, अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्रशिक्षण काळात ग्रंथालयात देण्यात येणाऱ्या सेवांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येतो. या अभ्याक्रमांतर्गत उमेदवाराला प्रत्याक्ष कामात समाविष्ट करून उपभोक्त्यांच्या गरजा व त्यांचे वर्तन निरीक्षणाची संधी प्राप्त होते. याचा फायदा प्रत्यक्ष नोकरीत होतो.
* ग्रंथपालांतर्गत पदे * लायब्ररी असिस्टंट * डेप्युटी लायब्ररियन * लायब्ररियन
नोकरीच्या संधी
महाविद्यालये, शाळा, सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल, सहायक ग्रंथपालासारखी पदे उपलब्ध असतात. विद्यापीठातील ग्रंथालयात वरिष्ठ ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, उपग्रंथपाल. त्याचप्रमाणे शासकीय ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये या ठिकाणीदेखील नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक किंवा सरकारी ग्रंथालय, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठ, बँका, सार्वजनिक संस्था, कायदे संस्था, वृत्तपत्र प्रकाशन संस्था, खासगी संस्था, कंपन्या इत्यादी क्षेत्रांमध्ये वाव मिळतो. तसेच सरकारी संस्था, संघटना, संग्रहालये, कंपन्या, विधि सल्लागार कंपन्या, वैद्यकीय केंद्रे, धार्मिक संघटना, संशोधन प्रयोगशाळा आणि रुग्णालये आदी ठिकाणी.
प्रा. योगेश हांडगे
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2016 रोजी प्रकाशित
ग्रंथपाल बना
महाविद्यालये, शाळा, सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल, सहायक ग्रंथपालासारखी पदे उपलब्ध असतात.
Written by लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-08-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Librarian career