sports journalist Nitin Mujumdar share his memory with actor vikram gokhale | Loksatta

आठवणीत राहिलेली भेट

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

आठवणीत राहिलेली भेट
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

विक्रम गोखलेंना आयुष्यात भेटलो इन मिन तीन – चार वेळा. मात्र, प्रत्येकवेळी त्यांच्या अदा मनात ठसठशीत उमटल्या. मला भेटलेले पहिले सुपरस्टार व्यक्तिमत्व म्हणजे विक्रम गोखले. सर्वप्रथम त्यांना भेटलो नाशिकच्या कालिदास कला मंदिरात, स्वाती चिटणीस यांच्याबरोबर ते मुख्य भूमिकेत असलेलं ते नाटक होतं. कोणीही प्रसिद्ध व्यक्ती मनात भरली की सरळ भिडून ओळख करून घेण्याचा माझा प्रयत्न असे.

हेही वाचा- प्रश्नवेध यूपीएससी : पर्यावरणविषयक प्रश्न

तदनुसार मी विक्रम गोखलेंना नाशिकच्या कालिदास कला मंदिराच्या बॅक स्टेजवर भेटलो. ओळख करवून घेतली, सांगितले की, “मी स्वतः मुक्त क्रीडा पत्रकार आहे, पण तुमचा फॅन देखील आहे” आणि त्यांना पहिल्याच भेटीत घरी पाहुणचाराचे आमंत्रण देखील दिले. ते म्हणाले, ‘पुढच्या वेळी’. मी म्हंटलं ‘ठीक आहे’. पुढच्या वेळी नाशिकमध्ये त्याच नाटकाचा प्रयोग लागला. अस्मादिक विक्रमजींसमोर जाऊन उभे! आणि ते चक्क तयारही झाले! मी बिनधास्त त्यांना विचारले खरे ,पण त्यांना घरी न्यायचे कसे हा गहन प्रश्न होता. कारण ही सारी मंडळी दौऱ्यावर बसमध्ये असतात, आणि माझ्याकडे स्वतःची चारचाकी नव्हती! माझा सहजीवन कॉलनीतील मित्र सुनील जोशी कामास आला. म्हणाला,”माझ्याकडे १९४० ची ऑस्टिन आहे. चालेल का?. मी तोच प्रश्न विक्रमजींना विचारला. तर विक्रमजी म्हणाले, का नाही, नक्की चालेल, मी आजोबांच्या काळात अशा गाड्या बघितल्या आहेत. झालं, आमची वरात ‘ओपन रुफ’ च्या ऑस्टिनमधून नाशिकच्या त्रिंबक रोडवरून घरी निघाली. विक्रम गोखले गाडीत आहेत हे बघून काही उत्साही सायकल/ मोटर सायकल / स्कुटरवीर काही अंतर आमच्याबरोबर आल्याचेही स्मरते. विक्रमजीसुद्धा त्यांच्या अभिवादनाचा हसतमुखाने स्वीकार करीत होते.

हेही वाचा- विद्यापीठ विश्व : संशोधन आणि खेळाची सांगड

घरी मी आणि बाबा होतो. तेव्हा अस्मादिक बॅचलर होते. ही गोष्ट ३० वर्षांपूर्वीची, १९९२ साल होते ते. विक्रमजी साधारण तासभर घरी होते. अतिशय रिलॅक्सड् होते. कुठेही मी एका मोठया स्टारशी बोलतो आहे असे त्यांनी मला जाणवू दिले नाही. खूपच जमिनीवर असलेली त्यांची देहबोली माझ्या नीट स्मरणात राहिली आहे. फारशी ओळख नसताना त्यांचे माझ्या साध्या मध्यमवर्गीय घरात येणे मला खूपच भावून गेले. त्यांचे वागणे बोलणे अगदी इनफॉर्मल होते. फोटोग्राफर मकरंदला देखील त्याचा कॅमेरा स्वतः हाताळून काही प्रश्न विक्रमजींनी विचारले! घरी तेव्हा पुरुषांचाच कारभार असल्यामुळे माझे आदरातिथ्य यथातथाच होते पण त्यांनी गोड मानून घेतले.माझा त्यावेळी ‘इंडियन एक्सप्रेस’ च्या मुंबई आवृत्ती मध्ये ‘एक्सप्रेस वीकएंड’ या रंगीत पुरवणीत मध्ये ‘मलाना’ नावाच्या हिमाचल प्रदेशमधील एका आगळ्या खेडेगावावर आलेला ‘Mysterious Malana’ हा लेखदेखील त्यांनी एकाग्र चित्ताने वाचला. खेळांवर मी लिहिलेले इतरही लेख बघितले. मी कुठे कुठे नियमित लिहितो हेही विचारले. लिहित रहा आणि आयुष्यात हा लेखनाचा छंद सोडू नकोस. असेही मला आवर्जून सांगितले. माझ्या बाबांशीदेखील ते मोकळेपणाने बोलले. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून ते खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये रस असणारे प्रगल्भ व्यक्तिमत्व असल्याचे सहजच जाणवले. घराच्या अवतीभवती असलेल्या छोट्याश्या बागेत देखील त्यांनी स्वतःहून फेरफटका मारला. माझ्या प्रामुख्याने खेळांवरील पुस्तकांचा समावेश असलेल्या संपूर्ण पुस्तकसंग्रहाचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. शेल्फमधील काही निवडक पुस्तके काढून चाळली देखील. अगदी अलीकडे म्हणजे साधारण तीन वर्षांपूर्वी कुसुमाग्रज स्मारकात मला विक्रमजींचे काही क्लोजअप्स टिपण्याची संधी सुद्धा मिळाली होती.

हेही वाचा- ‘प्रयोग’  शाळा : भूगोल झाला सोप्पा!

मला वैयक्तिकरित्या सर्वात आवडलेली विक्रमजींची भूमिका ‘अग्निपथ’ मधील अर्थातच बच्चन समोरील. विक्रमजींनी हिंदीत मोजके रोल केले पण बहुतेक सारे त्यांच्यातील अभिनेत्याला वाव देणारे होते. विक्रमजींच्या जाण्यामुळे एका अतिशय प्रतिभाशाली अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. त्यावेळी माझ्यासारख्या नवख्या, वयाने व अनुभवानेच नव्हे तर सर्वार्थाने लहान असलेल्या मध्यमवर्गीय मुलाच्या घरी एवढ्या मोठ्या अभिनेत्याने येऊन तासभर वेळ देणे ही गोष्ट खूप मोठी होती आणि असेल. विक्रमजींबरोबरची ती भेट माझ्यासाठी कायमच आठवणींचा एक अनमोल ठेवा असेल. विक्रमजींना भावपूर्ण श्रद्धांजली.

मराठीतील सर्व लेख ( Careervrutant-lekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 21:22 IST