या लेखापासून नवा पॅटर्न, नवा अभ्यासक्रम, नवी प्रश्नपद्धती विचारात घेऊन तयारी कशी करता येईल ते पाहू. या लेखामध्ये लेखी परीक्षेचे नेमके स्वरूप समजावून घेऊ.

केंद्रीय लोकसेवा आयोग – नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजनेप्रमाणे राज्य सेवा मुख्य परीक्षा घेण्याबाबतचा आयोगाचा २०२२ मधला निर्णय सन २०२५ च्या राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्ये लागू झाला आहे. या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नपद्धती, गुणांकन या सर्व बाबतीत आयोगाने यूपीएससीला फॉलो केले आहे. या सगळ्याचा उमेदवारांना कसा आणि किती फायदा होणार आहे याबाबत मागील लेखांमध्ये चर्चा करण्यात आली. या लेखापासून नवा पॅटर्न, नवा अभ्यासक्रम, नवी प्रश्नपद्धती विचारात घेऊन तयारी कशी करता येईल ते पाहू. या लेखामध्ये लेखी परीक्षेचे नेमके स्वरूप समजावून घेऊ.

मुख्य परीक्षा ही लेखी परीक्षा (एकूण गुण १७५०) आणि मुलाखत (एकूण गुण २७५) अशा दोन टप्प्यांमध्ये होणार आहे.

पारंपरिक आणि वर्णनात्मक पद्धतीचे प्रत्येकी तीन तास कालावधीचे एकूण ९ पेपर हे थोडक्यात लेखी परीक्षेचे ढोबळ स्वरुप आहे. यामध्ये काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात:

● नऊ पेपर पैकी भाषा विषयाचे दोन पेपर्स हे अर्हताकारी स्वरुपाचे आहेत. अंतिम १७५० गुणांमध्ये या पेपर्सचे गुण मोजण्यात येणार नाहीत. म्हणजे प्रत्यक्ष स्पर्धा एकूण १७५० गुणांसाठीच्या सात पेपर्समध्ये आहे पण तरी एकूण ६०० गुणांचे दोन जास्तीचे भाषा विषयांचे पेपरही लिहायचे आहेत आणि त्यामध्ये किमान २५ टक्के गुण मिळतील यासाठी तयारी करायची आहे. या दोन्ही पेपर्समध्ये प्रत्येकी किमान ७५ मार्क मिळाले नाहीत तर पुढचे पेपर कितीही चांगले लिहिलेले असले तरी ते तपासलेच जाणार नाहीत. त्यामुळे भाषा विषयांची चांगली तयारी करणे क्रमप्राप्त आहे.

● केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षांचे वेळापत्रक पाहिले तर एका दिवशी तीन तीन तासांच्या दोन सत्रांमध्ये दोन पेपर लिहायचे असतात. केवळ निबंधाचा पेपर झाल्यावर दुपारचे सत्र नसते. राज्य सेवा मुख्य परीक्षेकरताही अशाच प्रकारचे वेळापत्रक असण्याची शक्यता गृहीत धरुन तयारी करणे आवश्यक आहे.

● निबंध आणि सामान्य अध्ययन पेपर एक ते चार या पाच पेपर्सचे उत्तर लेखनाचे माध्यम मराठी असेल की इंग्रजी हे उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करतानाच नमूद करायचे आहे. आणि त्याच भाषा माध्यमातून पाचही पेपर्सची उत्तरे लिहिणे आवश्यक आहे. नाही तर पेपर तपासला जाणार नाही. त्यामुळे आपली तयारी, वापरलेले संदर्भ साहित्य, प्रभावी उत्तर लेखनासाठी सोपी ठरणारी भाषा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन याबाबत ठरवावे लागेल. विशेषत: माध्यमिक शिक्षणापर्यंत मराठी आणि पदवी/व्यावसायिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलेल्या उमेदवारांनी याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतला पाहीजे. काही प्रश्नांची दोन्ही भाषांमध्ये प्रत्यक्ष उत्तरे लिहून ती तपासून घ्यावी आणि त्या आधारे मार्गदर्शकाच्या सल्ल्याने याबाबत निर्णय घ्यायला हवा.

● वैकल्पिक विषयासाठी वेगळे भाषा माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य उमेदवारांना असणार आहे. म्हणजे वरचे पाच पेपर मराठीतून लिहिणाऱ्या उमेदवाराला वैकल्पिक विषयाचे पेपर इंग्रजीमधून लिहायची मुभा असेल. किंवा हे पाच पेपर इंग्रजीतून लिहीले आणि वैकल्पिक विषय मराठीतून लिहायचा असेल तर त्याची परवानगी असेल. मानवशास्त्र, वाणिज्य, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, कायदा, व्यवस्थापनशास्त्र, तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, लोक प्रशासन आणि समाजशास्त्र या विषयांचे पेपर लिहिण्यासाठी मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणतेही एक माध्यम निवडता येईल असे आयोगाने घोषित केले आहे. मराठी साहित्य वगळता बाकीचे वैकल्पिक विषय हे इंग्रजीतून लिहायचे आहेत. त्यासाठी ही तरतूद.

लेखी परीक्षेचे हे स्वरूप आणि प्रश्नपत्रिकांची मांडणी मनामध्ये भिनली पाहिजे. तर तयारीमध्ये योग्य अप्रोच ठेवणे शक्य होते. steelframe.india@gmail.com