नागरी सेवा परीक्षांबाबत समाधनकारक जागरूकता आपल्या राज्यात निर्माण झाली आहे. आयएएस/आयपीएसच्या परीक्षेची तयारी हा विषय आता शालेय स्तरावर चर्चिला जावा इतके आपण पुढे आलो आहोत. दरवर्षीच्या निकालात महाराष्ट्राच्या उमेदवारांचे यशाचे प्रमाणसुद्धा अभिनंदनीय स्तरावर पोचले आहे. असे असले तरी बँकींग, रेल्वे किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन सारख्या परीक्षांबाबत पूर्ण निरुत्साह दिसून येतो, ही दुसरी बाजू आहे.

करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देण्याची मानसिकता मराठी पालकांत, विद्यार्थ्यांत वाढली आहे, ही चांगली बाब आहे. पण स्पर्धा परीक्षांकडे वळण्यामागे फक्त शासकीय नोकरी, सरकारी बंगला, बत्तीची गाडी, सामाजिक प्रतिष्ठा नुसते हे आकर्षण असून चालणार नाही. आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे याबाबत स्पष्टता असणे फार आवश्यक आहे.

कारण आजही असे अनेक उमेदवार भेटतात ज्यांना आय.ए.एस./आय.पी.एस. व्हायचे असते त्यासाठी यूपीएससीचे प्रयत्न सुद्धा सुरू असतात पण केंद्रीय लोकसेवा आयोग, एसएससी, सीडीएस, एनडीए किंवा राज्य लोकसेवा अयोगाच्या विविध परीक्षांबाबत त्यांच्यामध्ये पूर्ण निरूत्साह दिसून येतो. बऱ्याच वेळा या परीक्षांबाबत नीटशी माहितीसुद्धा या उमेदवारांना नसते.

नागरी सेवा परीक्षांबाबत समाधनकारक जागरूकता आपल्या राज्यात निर्माण झाली आहे. आयएएस/आयपीएसच्या परीक्षेची तयारी हा विषय आता शालेय स्तरावर चर्चिला जावा इतके आपण पुढे आलो आहोत. दरवर्षीच्या निकालात महाराष्ट्राच्या उमेदवारांचे यशाचे प्रमाणसुद्धा अभिनंदनीय स्तरावर पोचले आहे. असे असले तरी बँकींग, रेल्वे किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन सारख्या परीक्षांबाबत पूर्ण निरुत्साह दिसून येतो, ही दुसरी बाजू आहे.

पीएसआय/एसटीआय सारख्या परीक्षांत आम्हाला इंटरेस्ट नाही, मी फक्त यूपीएससी करतो या प्राऊड फिलींगमध्ये वावरणारा एक वर्ग आहे तर एमपीएससीच्या परीक्षेतून एखादी छोटी मोठी पोस्ट मिळाली की पुरे झाले, यूपीएससीचे नंतर बघता येईल, किंवा माझं ध्येय फोजदारकी, इतर परीक्षांत मला इंटरेस्ट नाही म्हणणारे उमेदवारही आहेत. महत्त्वाकांक्षी असणे वा ध्येयवादी असणे गैर नाही पण करीअरच्या वाटेवर नेमके काय साध्य करायचे आहे या विषयीची स्पष्टता व ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची साथ असणे आवश्यक आहे.

मोठा अधिकारी होणार आणि देशासाठी, समाजासाठी सर्पित भावनेने काम करणार ही क्रांतिकारी भूमिका आयडीयली चांगली आहे, पण असा इमोशनल डिसीजन यशस्वी आणि सुरक्षित करीअर घडवेलच असे नाही. उलट अशामुळे करिअरची दिशा भरकटण्याची आणि बिघडण्याची शक्यताच जास्त. यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कांही महत्त्वाच्या बाबींचा गांभीर्याने विचार करून आपली दिशा ठरविली पाहीजे, प्राधान्यक्रम ठरविले पाहीजेत.

एखाद्या यशस्वी उमेदवाराला पाहून, ऐकून किंवा त्याच्याबद्दल वाचून नुसतेच प्रोत्साहीत होवून करीअरचे निर्णय घेणे, कधीही योग्य नसते. रक्ताचे डाग बघून चक्कर येणाऱ्याने सिंघम किंवा सरफरोश सारखे चित्रपट बघून आयपीएस व्हायचे ठरवावे किंवा गणिताशी पक्की दुश्मनी असणाऱ्याने एसएससी / बँकिंगच्या परीक्षांचे ध्येय ठेवणे हे रीझल्ट देणारे निर्णय होऊ शकत नाहीत. असले निर्णय निकालात काढणारे नक्कीच निष्पन्न होतात. एखादा क्लास करायला दिल्लीला जा असा सल्ला दिला की उमेदवारांचा रीप्लाय येतो, सर मी महाराष्ट्राबाहेर जाऊ शकत नाही, राहू शकत नाही, मला जमत नाही, जे करायचे ते पुणे/मुंबई वा इतरत्र पण आपल्याच राज्यात, मला घराबाहेर रहायची सवय नाही, मम्मी पप्पा दिल्लीला पाठवायला तयार नाहीत. अरे मग उद्या यूपीएससी उत्तीर्ण होऊन, आयएएस झालास आणि तुला केरळ, तामिळनाडू, आसाम, ओरिसा असे कुठे आऊट ऑफ केडरची पोस्टींग मिळाली तर काय करणार, या प्रश्नाचे त्यांच्याकडे काहीही उत्तर नसते. कारण परीक्षा प्रक्रिया, निवड प्रक्रिया, सेवा, त्या सेवांची जबाबदारी या विषयी कसलीही माहिती नसते.

विविध सेवाविषयीचे आकर्षण, सामाजिक वलय, प्रतिष्ठा, पदाची महत्वाकांक्षा अशा फॅशनेबल गोष्टींच्या पॅशनमधून आंधळेपणाने स्पर्धा परीक्षा नव्हे तर कोणत्याच क्षेत्रात करिअरची दिशा ठरवली जाऊ नये. आपले ध्येय निश्चित करताना स्वत:च्या क्षमता, अभिरुचीचा कल, तपासून योग्य समुपदेशना नंतर निर्णयाप्रत आले पाहिजे.

स्पर्धा परीक्षांत यश प्राप्त करणे साधे-सोपे नसतेच, पण म्हणून ते फार अवघडच असते, असामान्य बुद्धिमत्तेचे उमेदवारच स्पर्धेत टिकू शकतात, सर्वसामान्य उमेदवारांना न जमणारे ह्यरॉकेट सायन्सह्ण असते, असे सुद्धा मुळीच नाही. कला, वाणिज्य, विज्ञान, अशा सर्व शाखांतील आपल्या अॅकेडेमिक करिअर मध्ये सर्वसाधारण असणारे, ६०/७० टक्क्यांची वेस ओलांडता आलेली नाही असे आणि अगदी दहावी बारावी नापास असलेल्या उमेदवारांनी सुद्धा योग्य प्रयत्न करुन यशस्वी झालेली अनेक उदाहरणे आहेत. पण या चर्चेतला महत्त्वाचा शब्द आहे योग्य प्रयत्न.

आपल्याला काय साध्य करायचे आहे, याची स्पष्टता असणे, त्यासाठी नेमके काय करावे लागणार आहे याची माहिती असणे, आपल्या क्षमता, आवड निवड, रस असणारे विषय, जमणारे, समजणारे आवडीचे किंवा न जमणारे, न रूचणारे विषय, आपल्या जवळचा उपलब्ध वेळ, काय आणि किती मेहनत करावी लागेल याची समज, त्यासाठीची मानसिक तयारी, स्पर्धेची जाणीव, मनापासून प्रयत्न करण्याची तयारी या सगळ्या बाबींचा ताळमेळ साधून आपल्याजवळ स्पष्ट आणि नेमका प्लान असला पाहिजे. असा प्लान हा तुमच्या पॅशनला मूर्त रुप देऊ शकतो.

steelframe.india@gmail.com