प्रवीण चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व परीक्षेच्या लेखमालेतील या लेखामध्ये आपण राज्यव्यवस्था आणि कारभार प्रक्रिया या घटकाची सविस्तर चर्चा करणार आहोत. आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये भारताचे संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण आणि हक्कासंबंधी मुद्दे इत्यादी घटकांचा समावेश भारतीय राज्यव्यवस्था आणि कारभार प्रक्रिया यामध्ये होतो. पूर्व परीक्षेच्या तयारीमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. पूर्व परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर यामध्ये या घटकांचा अभ्यास वगळून चालणार नाही. गेल्या दहा ते बारा वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता या घटकांवरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या ही इतर घटकांच्या सरासरीपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.

२०२३ च्या पूर्व परीक्षेमध्ये या घटकांवर साधारणत: १३ प्रश्न तर २०२२ च्या पूर्व परीक्षेमध्ये या घटकावर १२ प्रश्न विचारले गेले होते. २०१७ पासून आजपर्यंत विचारलेल्या प्रश्नांची एकूण संख्या पुढील तक्त्यामध्ये दिली आहे. या प्रश्न संख्येवरून हा घटक पूर्व परीक्षेमध्ये किती महत्त्वाचा आहे, याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. शिवाय त्या अनुषंगाने आपल्या तयारीची दिशा निश्चित करता येते.

परीक्षेचे वर्ष प्रश्नांची संख्या

२०२३ १३

२०२२ १२

२०२१ १६

२०२० १४

२०१९ १२

२०१८ १०

२०१७ २२

वरील तक्त्यावरून आपल्याला या घटकांवर साधारणत: दहा पेक्षा जास्त प्रश्न विचारलेले दिसून येतात. पूर्व परीक्षेच्या कोणत्याही घटकाचा अभ्यास करताना त्यामध्ये प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे हा महत्त्वाचा घटक असतो. या विश्लेषणामध्ये त्यावर विचारलेल्या प्रश्नांची संख्या तसेच प्रश्नांचा नेमका प्रकार, विशिष्ट घटकांना दिलेले प्राधान्य किंवा विशिष्ट पद्धतीने विचारला जाणारा प्रश्न या सर्वांकडे लक्ष देणे गरजेचे असते. यामुळे पूर्व परीक्षेच्या तयारीची आखणी करणे सोपे जाते. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर पुढील उपघटकांवर प्रश्न विचारलेले दिसून येतात.

यामध्ये काही मूलभूत संकल्पना, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेचे भाग, राज्यघटनेची १२ परिशिष्टे, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे, तसेच कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था इत्यादी उपघटकांवर प्रश्न विचारलेले दिसून येतात. या लेखामध्ये आपण मूलभूत संकल्पना, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेचे भाग आणि राज्यघटनेची परिशिष्टे यावर विचारलेल्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत.

हेही वाचा >>> नोकरीची संधी : ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’मधील संधी

दरवर्षीच्या पूर्व परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न मूलभूत संकल्पनांवर विचारले दिसून येतात. उदाहरणार्थ २०२३ च्या पूर्व परीक्षांमध्ये due process of law म्हणजे काय असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नांचा आधार घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने अशा संभाव्य संकल्पनांची यादी करावी व या संकल्पनांची चांगली तयारी करावी जेणेकरून पूर्व परीक्षांमध्ये यातील कोणत्याही संकल्पनेवरती प्रश्न विचारला असेल तर तो प्रश्न बरोबर येऊ शकेल. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, कायद्याचे राज्य, प्रशासकीय कायदा, सार्वभौमत्व, लोकशाही विकेंद्रीकरण, राज्यसंस्था, राष्ट्र-राज्य, सत्तेचे विलगीकरण, सत्तेचे विभाजन, न्यायालयीन पुनरावलोकन इत्यादी संकल्पना महत्त्वाच्या आहेत. संसदीय लोकशाही या संकल्पनेवर जवळपास प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे संसदीय लोकशाही ही संकल्पना अतिशय चांगली तयार करावी. आवश्यकता वाटल्यास त्याच्या शॉर्ट नोट्स तयार कराव्यात. पूर्व परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने या संकल्पनांचा अभ्यास करणे अभिप्रेत आहे. यासाठी एनसीआरटीचे राजकीय सिद्धांत हे इयत्ता अकरावीचे पुस्तक (याचे भाषांतर द युनिक प्रकाशनाने केले आहे) वाचावे. यातील काही संकल्पना ‘भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया खंड एक’ या संदर्भ पुस्तकातून देखील तयार करता येतील.

याचबरोबर पूर्व परीक्षेमध्ये भारतीय राज्यघटनेची परिशिष्टे यावर देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. राज्यघटनेमध्ये एकूण बारा परिशिष्टे आहेत. त्यापैकी क्रमांक १,९, व १० या परिशिष्टांवरती वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत. कोणते परिशिष्ट कोणत्या घटकाशी संबंधित आहे तसेच त्याच्याशी संबंधित घटना दुरुस्ती किंवा ते कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये समाविष्ट केले गेले, अशा आशयाचे प्रश्न परिशिष्टांवरती विचारले गेलेले आहेत. उदाहरणार्थ २०१९ च्या पूर्व परीक्षेमध्ये नववे परिशिष्ट हे कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले गेले असा प्रश्न विचारला होता.

हेही वाचा >>> UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

२०२३ च्या पूर्व परीक्षेमध्ये राज्यघटनेच्या पाचव्या परिशिष्टावर प्रश्न विचारला गेला होता. राज्यघटनेच्या एकूण परिशिष्टांची संख्या बाराच असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व परिशिष्टांची सखोल तयारी करावी. या तयारीची नेमकी दिशा कोणती असायला पाहिजे, हे तुम्हाला पूर्वीच्या प्रश्नांच्या आधारे लक्षात येऊ शकेल. परिशिष्टांसोबत राज्यघटनेचे एकूण २२ भाग आहेत ते देखील विद्यार्थ्यांनी पाठ करावेत. या भागांवरती आतापर्यंत थेट प्रश्न विचारलेला नसला तरी काही प्रश्न सोडवण्यासाठी याची मदत होते. राज्यघटनेचा सरनामा हा देखील एक महत्त्वाचा भाग असून सरनाम्यामध्ये नमूद केलेल्या अनेक मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे सरनाम्याची तयारी करताना त्यातील प्रत्येक शब्दाचा नेमका अर्थ समजून घ्यावा. सरनाम्यामध्ये झालेल्या घटनादुरुस्त्या देखील लक्षात घ्याव्यात. सरनाम्यातील स्वातंत्र्य या संज्ञेवरती २०१९ मध्ये स्वातंत्र्य या शब्दाची नेमकी व्याख्या काय आहे, अशा आशयाचा प्रश्न विचारला होता. तर त्याआधीच्या पूर्व परीक्षांमध्ये कायदा आणि स्वातंत्र्य यामध्ये नेमका कोणता परस्पर संबंध आहे, अशा आशयाचा प्रश्न विचारला गेला होता. म्हणजेच सरनाम्यातील प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा आहे. त्याचा नेमका अर्थ विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा, त्यामुळे सरनामा या घटकावर विचारलेले प्रश्न चुकणार नाहीत. या पुढच्या लेखामध्ये आपण मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर उपघटकांवर विचारलेल्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi zws 70
First published on: 28-03-2024 at 17:24 IST