या लेखमालेत २९ ऑगस्टच्या लेखात कृषी पर्यटन या कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण विषयांची आपण माहिती घेतली. वाचकांनी या विषयातील अजून सविस्तर माहिती मिळावी म्हणून मेलद्वारे व फोन द्वारे संपर्क केला, म्हणून आपण या लेखात कृषी पर्यटन या विषयावर अधिक माहिती घेऊया.

कृषी पर्यटन हे उद्याोगाभिमुख करत असताना खालील बाबींचा विचार करावा.

● पर्यटकांना स्व-अनुभव घेता आला पाहिजे.

● पर्यटकांना ग्रामीण संस्कृती व नाविन्यपूर्ण उपक्रम दिसावेत.

● पर्यटकांना खेड्याच्या किंवा पर्यटन क्षेत्राच्या परिसरातील शेतीमाल खरेदी करता आला पाहिजे.

सातारा जिल्ह्यातील एका पर्यटन केंद्रामध्ये बैलाने ओढली जाणारी पाण्याची मोट (जुन्या काळी याद्वारे शेतीला पाणी दिले जायचे) पर्यटकांना दाखवली जाते व त्यांचा स्व-अनुभव दिला जातो. म्हणजे पर्यटक ज्याकाळी मोटार इंजिन उपलब्ध नव्हते त्या काळातील शेती अनुभव घेतो. एका परदेशी पर्यटकाने त्याचा अनुभव सांगितला की, कृषी पर्यटन पाहून त्यातील ग्रामीण गोष्टी पाहून त्याला त्याचा इटलीतील आजी-आजोबांच्या गावाची आठवण झाली.

मी लहान असताना आजोबांच्या गावाला गेल्यावर आम्ही नदीत पोहायचो व पोहून झाल्यावर आजी आम्हाला कच्च्या पपई खायला द्यायची. मोठी झाल्यावर लक्षात आले की, कच्च्या पपईमध्ये पॉपिन नावाचे द्रव्य असते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. अर्थात ते किती प्रमाणात घ्यावे याचे शास्त्रीय ज्ञान आजीला होते. म्हणजे अशा प्रकारचा शास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा पर्यटनामध्ये वापरायला हवा.

कृषी पर्यटन म्हणजे डीजे डान्स व पोहणे, मजा करणे इथपर्यंत मर्यादित न ठेवता त्यामध्ये नावीन्यपूर्ण शास्त्रीय ग्रामीण शैलीची ओळख करून देणे हा आहे.

कृषी पर्यटनाचे फायदे

● शेतीतील नफा वाढवणे

शेतीतील नफा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी पर्यटन क्षेत्राचा विस्तार करून अतिरिक्त उत्पन्न वाढवले पाहिजे.

● शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न

कृषी पर्यटन हा कमी खर्चाचा जास्त उत्पन्न देणारा कृषी उपक्रम आहे. शेतकऱ्यांना त्याचे स्थानिक उत्पादने जसे की, हस्तकला आणि कुंभारकाम थेट पर्यटकांना विकण्याची उपलब्धता करून दिली तर यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न घेता येईल.

● एकूण उद्योजक व कृषी उद्योजक यांना संधी

तरुण पिढी पारंपरिक शेती करण्यास कमी प्रेरित आहे. कृषी पर्यटनामुळे तरुण शेतकऱ्यांना कृषी व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देऊन कृषी उद्याोजक बनण्यास प्रेरित केले जाऊ शकते. यामुळे शहरी भागातील तरुणांचे स्थलांतर देखील थांबू शकते.

● शाश्वत ग्रामीण विकास प्रदान करणे

कृषी पर्यटनामुळे ग्रामीण भागात शाश्वत उपजीविका निर्माण होण्यास मदत होईल. आणि दीर्घकाळ जास्त नफा आणि चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी मिळेल. शिवाय ग्रामीण भागातील लोक आता नोकरी शोधणारे राहणार नाहीत उलट ते रोजगार निर्माण करणारे बनतील.

कृषी पर्यटनाची भविष्यातील वाटचाल

भारतातील तसेच महाराष्ट्रातील कृषी पर्यटन ही नवीन संकल्पना आहे. परंतु ती दरवर्षी २०-२५ टक्के दराने वाढत आहे. महाराष्ट्राचे पूर्वेकडील राज्य राजस्थानमध्ये कृषी पर्यटन वेगाने वाढत आहे.

महाराष्ट्रातील कृषी पर्यटनातील उपक्रमाचे प्रकार

● थेट विपणन

● अतिथ्य आणि शेतात राहणे

● शेती दौरे

● मनोरंजन उपक्रम

● डेमो व स्व-अनुभव

● शेती शिक्षण व संशोधन माहिती

● कार्यक्रम व उत्सव

अनेक शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि संशोधक संबंधित क्षेत्रातील व्यवहारिक ज्ञान मिळवण्यासाठी कृषी पर्यटन स्थळांना भेट देतात.

आईपर्यटन धोरण

सध्या महाराष्ट्र शासनाने व पर्यटन मंत्रालय कृषी पर्यटनाला अतिशय जास्त महत्त्व दिले असून, गड किल्ले पर्यटन, आरोग्य पर्यटन, तीर्थक्षेत्र पर्यटन याबरोबर कृषी पर्यटनासाठी व यातील खास महिलांसाठी पर्यटन क्षेत्रात उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याचा हेतूने पर्यटन विभागामार्गात महिलांसाठी ‘आई’ पर्यटन धोरण जाहीर केले आहे.

भारतातील महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असेल जेथे महिलांसाठी कृषी पर्यटन धोरण जाहीर केले. यामध्ये महिलांनी पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणीकरिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यवसायाकरिता १५ लाख मर्यादेचे कर्ज मंजूर केले जाते. त्याचा व्याज परतावा शासनामार्फत दिला जातो. मातीतील करिअर म्हणून कृषी पर्यटन हे क्षेत्र भविष्यामध्ये अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना देणारे आहे. त्यामुळे कृषी उद्योजकांनी याकडे नाविन्यपूर्ण उद्योग म्हणून नक्की पहावे.

sachinhort.shinde@gmail.com