डॉ. श्रीराम गीत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर, माझे वय २१ वर्षे आहे. मी मुंबई विद्यापीठातून बी.कॉम.ची पदवी घेतली आहे. मला दहावीत, बारावीत, पदवीला ८० टक्के गुण आहेत. माझा कल हा पहिल्यापासूनच शासकीय सेवेत जाण्याचा होता. त्यासाठी पदवीच्या पहिल्याच वर्षांपासून संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवेसाठी इंग्रजी माध्यमातून अभ्यास सुरू केला. पण अचानक उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीमुळेसामान्य अध्ययनासाठी लावलेला खासगी शिकवणी वर्ग मध्येच सोडावा लागला. उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून काळजावर दगड ठेवून मी नागरी सेवा न देण्याचा निर्णय घेतला आहे. पदवीच्या दरम्यान संपूर्ण लक्ष नागरी सेवेच्या अभ्यासावर केंद्रीत केल्यामुळे कोणतेही कौशल्य आत्मसात केले नाही. तरी आता माझाकडे भविष्यात करिअर करण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत? सी.ई.टी कायद्याची की एम.बी.ए ची या दोघांपैकी कशाची निवड करायला पाहिजे? या बद्दल मनात द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. तसेच आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती बेताची असल्यामुळे पुढील शिक्षण घेताना त्याचा खर्च कसा निभावून न्यायचा हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. कृपया मार्गदर्शन करावे.

अक्षय वाघमारे

काय घडले काय करत होतो त्यापेक्षा यानंतर काय करायचे याचा विचार तुला करणे सगळय़ात गरजेचे आहे. हे वाक्य अशा करता लिहित आहे की यूपीएससी देण्याचे स्वप्न तुला पूर्ण करण्यासाठी वय वर्ष २५ ते ३२ असे सात वर्षे नक्की हाताशी आहेत. दहावी, बारावी, बी.कॉम. व सरासरी सीजीपी हा उत्तम असल्यामुळे हे वाक्य मी मुद्दाम सुरुवातीला लिहीत आहे. कोणतीही कौशल्य मी आत्मसात केली नाहीत. हे वाक्य बाजूला ठेवून अकाउंट ऑफिस ऑटोमेशन सर्व सामान्य प्रशासन विक्री व विपणन या क्षेत्रात तुझ्यासारखा नुसार तुला नक्की नोकरी मिळू शकते. त्यासाठीचा शोध घेणे ही पहिली गरज राहील. काम शिकण्याची तयारी दाखवली तर तुझे गुणपत्रक पाहून नक्की काम मिळेल याची मला खात्री आहे. शैक्षणिक संस्था किंवा विविध स्वरूपाच्या मार्केटिंग कंपन्या इथे शोध घेणे गरजेचे राहील. हाती पगार यायला लागला की आत्मविश्वास वाढेल. वय २५ पूर्ण होईपर्यंत दर रविवारी यूपीएससीचा अभ्यास चालू ठेवावा. द्यायची झाली तर त्याचा उपयोगच होईल. कायद्याचा रस्ता खूप लांबचा आहे तो नक्की नको. एमबीए प्रवेश परीक्षा देऊन मिळाली तरी खार्चिक आहे. दोन वर्षे शिकताना किमान पाच लाखाचा खर्च करावा लागेल. त्यामुळे त्यावरही विचार करावास. मिळेल ती नोकरी घेऊन बँकांच्या परीक्षांना बसायला कोणतीही अडचण नाही. समजा त्यातून नोकरी मिळाली तर तो रस्ता सुरू करून मग पुन्हा यूपीएससीचा विचार करू शकतोस.

नमस्कार, माझे वय २३ वर्षे असून माझे शिक्षण कॉमर्समध्ये पूर्ण झाले आहे. आता मी एमबीएच्या दुसऱ्या वर्षांला आहे. माझ लग्न झालेले असून मला २ मुले आहेत. माझ्या घरच्यांची इच्छा आहे की मी सरकारी नोकरी करावी. मलाही वाटते की चांगला अकौंटिंग क्षेत्रात जॉब मिळावा पण अभ्यासाला वेळ मिळत नाही. मग मी काय केले पाहिजे? एमपीएससी परीक्षा देत राहू की नको? मला योग्य मार्ग सांगावा. म्हणजे जेणेकरून काय करू याचा गोंधळ होणार नाही. आणि माझे इंग्लिश पण कच्चे आहे. मला बँकिंगच्या परीक्षा द्याव्या वाटत आहेत. पण स्व-अभ्यास करून त्यात यश मिळवू शकते का.

पूनम गर्जे. पूनमताई, आपल्या प्रश्नाची काही उत्तरे आपल्यालाच शोधायची आहेत. त्याला अन्य कोणीही मदत करू शकेल असे मला वाटत नाही. खूपच लवकर विवाह झाला दोन मुले आहेत त्यांचे शिक्षण, संसाराची जबाबदारी यामध्ये आपण बऱ्यापैकी अडकल्या आहात. चिकाटीने शिक्षण पूर्ण करून पदवी घेऊन एमबीएचे दुसरे वर्ष चालू आहे ही त्याच्यातील सोनेरी किनार. आत्ता भविष्याचा जास्त विचार न करता एमबीए उत्तम पद्धतीने पूर्ण करा. लेखी इंग्रजी वाढवा. एवढय़ा दोनच गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. एमबीएच्या स्पेशलायजेशनचा विषयाचा आपण उल्लेख केलेला नाही. त्या संदर्भातील अवांतर वाचन मराठीतून केले तरी चालेल, पण ते अत्यंत गरजेचे आहे. एमबीएनंतर कॅम्पसमधून किंवा अन्य पद्धतीत मिळेल ते काम स्वीकारावेत. अजून तीन वर्षे तरी एमपीएससीचा कोणताही विचार नको. तो अभ्यास आपण घेतलेल्या शिक्षणापेक्षा पूर्णपणे वेगळा व तीव्र स्पर्धेचा, अनिश्चित निर्णयाकडे नेणारा आहे. मात्र बँकांच्या परीक्षा देण्यास कोणताही प्रत्यवाय नाही. त्यासाठी जमतील तेवढे प्रयत्न जरूर करावे. मात्र नोकरी चालू ठेवूनच. नंतर मिळेल ती नोकरी चालू ठेवून किंवा मिळाल्यास बँकेची नोकरी करत आपण एमपीएससीच्या परीक्षा देण्यासाठी किमान सहा-सात वर्षे आपल्याला नक्की मिळणार आहेत. यंदाचे वर्षी काय करायचे, पुढच्या वर्षी काय करायचे, असा टप्प्याटप्प्याने विचार सुरू करावा. मन शांत होईल व अभ्यासात आणि संसारात नीट लक्ष लागेल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career guidance and counselling for students career tips for students zws