डॉ. श्रीराम गीत

नमस्कार सर मी बीए द्वितीय वर्षांत शिकत आहे. मला १० वी मध्ये ८३.८० गुण असून १२ वी लॉकडाऊन मध्ये झाली आहे. ग्रामीण भागात मला दुसरा काही पर्याय न दिसल्यामुळे मी १० वी मध्ये असतानाच यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला होता. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे मला थोडी इंग्रजी भाषेची भीती वाटत आहे आणि त्या साठी ठउएफळ ची पुस्तके सखोल वाचून त्याचे आकलन महत्त्वाचे असते. तर मी शालेय अभ्यासक्रमातील पुस्तके वाचत आहे आणि एक मराठी वर्तमानपत्र देखील वाचत आहे. याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करावे तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रम कितपत महत्त्वाचा आहे या विषयीसुद्धा. – अनिल जाधव

बीएचा अभ्यासक्रम सगळय़ात महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेव. त्या अभ्यासातील विषयांचा सखोल अभ्यास तुला स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. इंग्रजीची भीती वाटणे व सवय नसणे हे अनेकांचे बाबतीत घडते. तुझे आजवरचे सगळे मार्क जरी उत्तम असले तरीसुद्धा एकच सूचना तुला करत आहे त्यावर विचार करावास. योग्य वाटल्यास अंमलात आणावीस. एमए ला प्रवेश घे. एमए करत असताना प्रथम एमपीएससीची परीक्षा द्यावीस. त्याचे दोन प्रयत्नातून काही मिळाले तर ते घेऊन नंतर यूपीएससीचा अभ्यास करणे जास्त श्रेयसकर व आर्थिक दृष्टय़ा फायद्याचे ठरेल. शालेय विषयांची पुस्तके वाचत असताना मुख्यत: दहावी अकरावी बारावीचे शास्त्र व पर्यावरण यावर नीट लक्ष देऊन वाचन करावे. करियर वृत्तांत मधील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती रोज वाचत रहा. ती खूप महत्त्वाची असते. यथावकाश यश मिळेल.

मी नुकताच पदवीधर झालो आहे. सुरवातीपासून मी आयएएस अधिकारी बनण्यासाठी अभ्यास करत आहे. माझा एक मित्र होता तो काही दिवस माझ्याबरोबर अभ्यास करत होता. मध्येच त्याने अभ्यास सोडून दिला. माझे मन सतत त्याचा विचार करत राहते. मी बऱ्याच वेळा त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण तो स्पष्टपणे काही सांगत नाही. माझे मन अभ्यासाचा कमी आणि बाह्य घटनांचाच जास्त विचार करत राहते. मला माहीत आहे की आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर स्वत:चा भूतकाळ विसरणे खूप गरजेचे असते. पण माझे मन अभ्यासाच्या वेळी नेमकं भूतकाळातील गोष्टीचा विचार करत राहते. मग माझे अभ्यासात सातत्य राहत नाही आणि त्यामुळे माझी खूप चिडचिड होते. त्यातच अलीकडील देशभरातील राजकीय स्थिती पाहता व वारंवार येणाऱ्या प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या बातम्या पाहता मन विचलित होते. मला योग्य सल्ला देण्यासाठी माझ्याजवळ कोणीही नाही. मला या गोंधळातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करावे. – ऋषिकेष गोडसे.

ऋषिकेश तुझ्या मनातील गोंधळाच्या बद्दल मी पहिल्यांदा सविस्तर लिहीत आहे. कारण ते इतर अनेकांना मार्गदर्शनपर ठरू शकेल. मी पहिल्यापासून म्हणजे पदवी घ्यायला सुरुवात केल्यापासून यूपीएससी करायचे ठरवले होते असे सांगणारे अनेक जण असतात. त्यांच्यापैकी ९९ टक्के जणांना यूपीएससी म्हणजे काय असते, ती तीव्र स्पर्धा कशी असते, त्यातून काय मिळते याबद्दल कसलीही कल्पना नसते. त्यामुळे आज जे तू भाबडेपणाने लिहीत आहेस तसे अनेक जण बोलत असतात. मला राष्ट्रसेवा करायचीय, समाजसेवा करायचीय, समाज सुधारायचा आहे, भ्रष्टाचार निपटायचाय वगैरे वगैरे.. यूपीएससी केलेला कोणीही तसे काहीही करायला जात नाही. अत्यंत इमाने ईतबारे फक्त नेमून दिलेले काम शंभर टक्के पूर्ण करणे ते करत असतात. संविधानाला धरून काम करत राहणे, लोकशाही पद्धतीने काम करणे व लोकांच्या उपयोगी पडणे यासाठी आपल्या सेवेचा उपयोग करायचा असतो. त्यासाठीच विविध पदे निर्माण केली आहेत. येथे अत्यंत तीव्र स्पर्धा असते. तुझे ग्रॅज्युएशन कशात झाले आहे? त्याची टक्केवारी काय? याचा कसलाही उल्लेख तू केलेला नाहीस. मी माझा भूतकाळ व मित्राने का सोडून दिले याच्याबद्दलचा विचार ज्या मिनिटाला तू बाजूला ठेवशील तेव्हा उद्या काय करायचे याबद्दल तुला स्पष्टपणा येईल. तसा विचार करता येत नसेल तर सध्या पूर्णपणे ब्रेक घे. मिळेल ती नोकरी करायला सुरुवात कर किंवा पदव्युत्तरचा अभ्यास सुरू कर. वयाच्या पंचवीशीमध्ये जरी तू यूपीएससीचा पुन्हा अभ्यास सुरू केलास तरी काहीही बिघडणार नाहीये. किंबहुना द्विधा मनस्थितीमध्ये असताना अभ्यास करत राहण्याऐवजी आता मला काय मिळवायचे आहे? ते कसे मिळवायचे आहे? त्याचा आवाका काय? हे नीट समजल्यावर त्यातील यशाची तुझी शक्यता वाढेल. या सर्वावर शांतपणे किमान महिनाभर तरी विचार करणे गरजेचे आहे. तो तू करशील याची मला खात्री आहे. त्यासाठी शुभेच्छा.