CET Exam for IIM after Graduation: भारतामध्ये पदवीनंतर व्यवस्थापन शास्त्रातील सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या सरकारी संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात आयआयएम. आजघडीला देशात अहमदाबाद, अमृतसर, बेंगळुरू, बोधगया, कोलकाता, इंदोर, जम्मू, काशीपूर, कोझीकोडे, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, रोहतक, संबलपूर, शिलॉंग, सिरमॉर, तिरुचिरापल्ली, उदयपूर आणि विशाखापट्टण अशा एकवीस ठिकाणी आयआयएम संस्था आहेत. बीए, बीकॉमपासून बीई, बीटेकपर्यंत सर्वच क्षेत्रात पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयएममधून एमबीए करण्याची महत्त्वाकांक्षा असते. या प्रवेशासाठी आयआयएम एक ‘कॅट’ नावाची सीईटी घेते. या कॅट च्या मार्कांवर एस. पी. जैन, वेलिंगकर, सोमय्या, बिट्स पिलानी सह शंभर संस्था एमबीएसाठी प्रवेश देतात. या वर्षी ही परीक्षा रविवार २४ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा देशातील १७० शहरांमध्ये घेतली जाईल. कोणत्याही शाखेतून किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येईल. यंदा पदवीच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा ही परीक्षा देता येईल. विद्यार्थ्यांना www. iimcat. ac. in या संकेतस्थळावरून विद्यार्थी १३ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

परीक्षा दोन तासांची असून त्यात तीन सेक्शन असतात. प्रत्येक सेक्शनसाठी चाळीस मिनिटांचा वेळ असतो. पहिल्या सेक्शनमध्ये व्हर्बल अॅबिलिटी आणि कॉम्प्रिहेन्शनवर प्रश्न असतात, तर दुसऱ्या सेक्शनमध्ये लॉजिकल रिझनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशनवर प्रश्न असतात. तिसऱ्या सेक्शनमध्ये गणितावर आधारित प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला तीन मार्क असतील आणि चुकीच्या उत्तरासाठी एक मार्क कापला जाईल. ‘कॅट’च्या संकेतस्थळावर सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे.

हेही वाचा : माझी स्पर्धा परीक्षा : पदवी अभ्यासक्रम संपताना  स्पर्धा परीक्षेची तयारी करणे योग्य

कॅट परीक्षेतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढे तीन निवड पायऱ्यांमधून निवडले जाते. यात लेखन क्षमता, ग्रूप डिस्कशन आणि व्यक्तिगत मुलाखत यांचा समावेश आहे. आयआयएम व्यतिरिक्त ज्या संस्था कॅटच्या मार्कांवर प्रवेश देतात, त्या त्या संस्थांच्या प्रवेशाच्या जाहीरातींप्रमाणे विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागतील आणि त्या त्या संस्था पुढे विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन आणि व्यक्तिगत मुलाखत या आधारे प्रवेश देतात.