करिअरविषयक नव्या संधी उलगडून दाखवणारी लोकसत्ता मार्ग यशाचा ही कार्यशाळा नुकतीच ठाणे आणि दादर येथे पार पडली. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सारांश.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना पुढील तीन ते सहा वर्षांनंतर संबंधित क्षेत्रात नेमकी काय परिस्थिती असेल, याचा अंदाज घेणे आवश्यक आहे. आपली आवड आणि क्षमता लक्षात घेऊन क्षेत्र निवडावे. मात्र, कोणतेही क्षेत्र निवडले तरी कष्टाला पर्याय नाही. परीक्षेत मिळालेल्या टक्क्यांनुसार कला, विज्ञान किंवा वाणिज्य या शाखा निवडण्याची चूक आजही केली जाते. विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंत शिकलेल्या विषयांची यादी तयार करून खूप आवडलेले, जमलेले आणि नावडलेले विषय असे वर्गीकरण करा. या यादीतील आपल्याला खूप आवडलेल्या विषयांशी संबंधित कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करू शकतो, कोणत्या शाखेतून शिक्षण घेणे आपली जमेची बाजू ठरेल, या गोष्टींचा विचार करून प्रवेशासंबंधित निर्णय घेणे योग्य ठरेल.

दहावी-बारावीनंतर विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढे पाच वर्ष वकिलीचे शिक्षण घेता येते. तसेच सध्या हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील मनुष्यबळाची गरजही वाढती आहे, त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाची निवड करणेही फायदेशीर ठरेल. अर्थशास्त्र, विधि, डिझायिनग, अ‍ॅनिमेशन, परदेशी भाषांचे शिक्षण या काही क्षेत्रांत चांगल्या मनुष्यबळाची गरज नेहमीच असते. त्यामुळे या अभ्यासक्रमांची निवडही विद्यार्थी करू शकतात. प्रचंड मेहनत असलेल्या या क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. संज्ञापन क्षेत्रातील पारंपरिक संधीबरोबरच ‘समाज माध्यम व्यवस्थापन’ असे नवे क्षेत्र तयार झाले आहे, त्यातही मनुष्यबळाची गरज वाढणार आहे.

स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर प्राधान्याने कला किंवा वाणिज्य शाखेची निवड करणे योग्य. संरक्षण सेवेत कायम वेगवेगळय़ा पातळीवर संधी आहेत. त्यासाठी प्रवेश परीक्षा असते. मात्र, संरक्षण सेवेच्या प्रवेश परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाखेत गणित विषय निवडावा. संरक्षण, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय या क्षेत्रांतही चांगली संधी आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी अकरावी, बारावी विज्ञान शाखेतील शिक्षण घेऊन नंतर प्रवेश परीक्षा देऊन पदवीला प्रवेश घेता येतो. तसाच अभियांत्रिकी पदविकेचाही मार्ग आहे. दहावीनंतर तीन वर्षे पदविका आणि त्यानंतर अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्षांला थेट प्रवेश घेऊन पुढे तीन वर्षे पदवीचे शिक्षण घेता येते. यापैकी कोणता मार्ग निवडायचा? याबाबत अनेकांचा गोंधळ होतो. या दोन्हींचे फायदे-तोटे आहेत. पदविकेला प्रवेश घेतल्यास बारावीनंतरच्या प्रवेश परीक्षा, त्याच्या शिकवण्या हे टाळता येऊ शकते. पदविका प्रवेशाचे तोटेही आहेत. दहावीनंतरच पदविकेसाठी शाखा निवडावी लागते. त्यात गोंधळ होण्याची शक्यता असते. बारावीनंतर पदवीला प्रवेश घेताना उपलब्ध जागांची संख्या अधिक असते. मात्र, पदविकेनंतर द्वितीय वर्षांसाठी प्रवेश घेताना जागा कमी असतात. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी चुरस रंगते.

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान त्या महाविद्यालयातून प्लेसमेंट होतात का? या मुद्दय़ाकडे विशेष लक्ष देऊन महाविद्यालयाची निवड करावी. तसेच आपण निवडलेल्या महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट द्या आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षकांशी चर्चा करा.  विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि नावड तसेच करिअरच्या संधींचा भविष्यवेध घेऊन अभ्यासक्रमाची निवड करावी.

मुख्य प्रायोजक :  आकाश एज्युकेशनल सव्‍‌र्हिसेस लिमिटेड

’सहप्रायोजक : सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन अकॅडमी, संकल्प आय ए एस फोरम, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिटय़ूट्स

’बँकिंग पार्टनर :

युनियन बँक ऑफ इंडिया

’पॉवर्ड बाय : ज्ञानदीप

अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, आदित्य स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट