केंद्रीय नागरी सेवा परीक्षा मुख्य परीक्षेच्या धर्तीवर होणाऱ्या राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या नव्या पॅटर्ननुसार इंग्रजी भाषा पेपरची तयारी कशी करावी त्याची चर्चा या लेखापासून करण्यात येत आहे.

एकूण ३०० गुणांसाठीच्या इंग्रजी भाषा प्रश्नपत्रिकेमध्ये गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे असेलः

· १०० गुणांसाठी ६०० शब्दांत निबंध,

· एकूण ७५ गुणांसाठी उतारा आकलनाचे प्रश्न,

· साधारणपणे ८००-८५० शब्दांच्या परिच्छेदाचे एक तृतीयांश सारांश लेखन ७५ गुणांसाठी,

· व्याकरण आणि शब्दसंग्रहासाठी २५-२५ गुणांचे २ प्रश्न.

आयोगाने घोषित केलेल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका प्रारुपामध्ये कोणत्याच प्रश्नासाठीची शब्दमर्यादा दिलेली नाही. पण केंद्रीय नागरी सेवा परीक्षा मुख्य परीक्षेच्या पेपरचे विश्लेषण केले तर निबंधासाठी ६०० शब्दांची शब्दमर्यादा दिलेली आहे. बाकीच्या प्रश्नांमध्ये जवळपास २७५ शब्दांचे सारांशलेखन, परिच्छेदावरील प्रश्नांची १५ गुणांसाठी किमान १५० ते २०० शब्दांची पाच उत्तरे, आणि इतर प्रश्नांची किमान २०० शद्बांतील उत्तरे अशी शब्दमर्यादा गृहीत धरावी लागेल. म्हणजे एकूण तीन तासांमध्ये जवळपास २००० शब्दांची उत्तरे लिहायची आहेत.

केंद्रीय नागरी सेवा परीक्षेच्या पेपरमध्ये उतारा आकलनाच्या प्रश्नात एकाच परिच्छेदावर १५-१५ गुणांचे ५ प्रश्न बाबत विचारण्यात येतात. आणि उताऱ्याची लांबीही जास्त असते. पण त्याऐवजी कमी लांबीचे एकापेक्षा जास्त उतारे आणि कमी गुणांसाठी जास्त प्रश्न अशी वेगळी रचना राज्य सेवा मुख्य परिक्षेमध्ये असू शकते. म्हणजे ५-५ गुणांचे पाचप्रश्नअसलेले ३ परिच्छेद किंवा ३-३ गुणांचे पाच प्रश्न असलेले ५ परिच्छेद अशाही प्रकारेप्रश्नपत्रिकाअसूशकते. मुख्य परीक्षेचा पहिला पेपर झाल्यावरच नेमकी रचना लक्षात येईल. त्यामुळे सध्या ५०/१००/१५० शब्दांत उत्तरे लिहिण्याच्या दृष्टीने तयारीकरणेयोग्यराहील.

इंग्रजी भाषा पेपरमध्ये usage and vocabulary या घटकावर २५-२५ गुणांचे दोन उपप्रश्न असणार आहेत. केंद्रीय नागरी सेवा परीक्षेच्या पेपरची रचना पाहता या प्रश्नांमध्ये शब्दसंग्रहाबरोबर व्याकरणाचे प्रश्नही समाविष्ट असतील असे गृहीत धरून तयारी करायला हवी. यामध्ये वाक्य रुपांतरण, क्रियापदाचे योग्य रुप वापरणे अशा प्रकारचे व्याकरणावरील प्रश्न २५ गुणांसाठी विचारलेले दिसतात. तर समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, योग्य शब्दांचा वापर, अर्थानुसार वाक्य रुपांतरण, दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करु शकेल अशा प्रकारे त्याचा वाक्यात वापर, म्हणी व वाक्प्रचारांचा वाक्यात वापर अशा प्रकारचे शब्द संग्रहावर आधारीत प्रश्न २५ गुणांसाठी विचारलेले आहेत.

व्याकरण हा पैकीच्या पैकी गुण देणारा घटक आहे. त्याची योग्य पद्धतीने तयारी केली तर २५ गुणांची सहजपणे तयारी होते. पण केवळ व्याकरणाचे नियम पाठ करून काम भागणार नाही. वाक्याचा अर्थ न बदलता वाक्य व्याकरण नियमांनुसार पुन्हा लिहिणे प्रत्येक ठिकाणी अपेक्षित आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यानुसार वाक्याचा अर्थ नीट समजून घेऊन व्याकरणाचे प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

मुख्य परीक्षेतील भाषा पेपर हे अर्हताकारी आहेत. एकूण ३०० पैकी ७५ गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचे पुढचे पेपर तपासले जाणार आहेत. इंग्रजी प्रश्नपत्रिकेची रचना बघता मराठीच्या तुलनेत प्रश्नसंख्या कमी आहे त्यामुळे कमी शब्दांत उत्तरे लिहून किमान गुण मिळवणे फारसे अवघड नाही असे वाटू शकते. पण ज्या उमेदवारांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेले असेल, अशा उमेदवारांना या पेपरच्या तयारीमध्ये जास्तीची मेहनत घेणे गरजेचे असेल. शिवाय व्यावसायिक पदवी शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांचे पण सर्वसाधारण/ साहित्यिक इंग्रजीचे वाचन फारसे होत नाही. त्यामुळे त्यांनाही या पेपरच्या तयारीमध्ये गांभीर्य ठेवावे लागेल. इंग्रजी पेपरमध्ये भाषांतराचे प्रश्न समाविष्ट नाहीत. पण इंग्रजीच्या आकलन आणि अभिव्यक्ती तपासण्यासाठी परिपाठ आणि शब्दसंग्रह – usage and vocabulary च्या प्रश्नांची काठिण्य पातळी आणि स्वरूप रचण्यात येणार हे लक्षात घेऊन तयारी करायला हवी.

भाषा पेपर हे आकलन, शब्दसंग्रह आणि लेखन म्हणजे अभिव्यक्तीची चाचणी आहेत हे समजून घेऊन त्यादृष्टीने तयारी करावी लागणार आहे. मुख्य परीक्षेचे तुमचे भाषा माध्यम कोणतेही असो, इंग्रजी भाषेच्या तयारीमुळे तुम्हाला चांगले संदर्भ साहित्य हाताळणे पर्यायाने इतर विषयांची चांगली तयारी करणे सोपे होणार आहे, हे लक्षात घेऊन या पेपरची तयारी करायला हवी. नेमकी तयारी कशी करावी ते पुढील लेखामध्ये पाहू.