गट क सेवा मुख्य परीक्षेमध्ये पेपर दोनमधील इतिहास घटकावर विचारण्यात आलेल्या मागील वर्षीच्या प्रश्नांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात येतात:
बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण कमी आहे. पण वाढती काठिण्य पातळी पाहता विश्लेषणात्मक तयारीवर भर देणे आवश्यक आहे.
सरळसोट प्रश्नांमध्येही बारकाईने तयारीची आवश्यकता आहे अशा मुद्द्यांचा समावेश दिसून येतो.
या घटकावर एकूण दहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यापैकी राजकीय इतिहासाच्या तुलनेत सामाजिक आणि आर्थिक इतिहासावर जास्त प्रश्न विचारण्यात आलेले दिसून येतात. या वर्षी राजकीय इतिहासावर थोडा जास्त भर देणे फायद्याचे ठरू शकते.
या विश्लेषणाच्या आधारे प्रत्यक्ष तयारीबाबत पाहू.
सन १८८५ पासूनचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ही या घटकाच्या अभ्यासक्रमाची आउटलाइन आहे. या चौकटीमध्ये राहूनच या घटकाची तयारी करायला हवी. केवळ सामाजिक जागृती, राष्ट्रीय चळवळी हे मुद्दे पूर्णपणे राष्ट्रीय परीप्रेक्ष्यातून पाहावे आणि इतर मुद्द्यांची तयारी महाराष्ट्राच्या सीमेत राहून करावी हेच आयोगाला अपेक्षित आहे. हे लक्षात घेऊन इतिहासाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करता येईल. :
सामाजिक जागृतीमध्ये सामाजिक सुधारणा चळवळी, सुधारक, त्यांचे कार्य, मागण्या, विरोध, भूमिका, ब्रिटिशांचे सामाजिक सुधारणांचे प्रयत्न या बाबी समजून घ्याव्यात. यामध्ये ठळक राष्ट्रीय सुधारक, संस्था, ब्रिटिशांचे प्रयत्न या बाबींचा आढावा आवश्यक आहे.
आर्थिक जागृतीमध्ये शेतकरी, आदिवासी, कष्टकरी जनता, कामगार यांच्या संघटना, उठाव, त्याची कारणे व परिणाम यांचा आढावा घ्यावा, त्याचबरोबर ब्रिटिशांच्या आर्थिक पिळवणुकीबाबतचे सिद्धांत, ते मांडणारे भारतातील सर्व अभ्यासक यांचाही अभ्यास आवश्यक आहे.
वर्तमानपत्रांचा परिणाम या घटकाची तयारी त्यांचे संस्थापक, संपादक, ब्रीदवाक्य, भाषा, प्रकाशनाचा काळ, ठिकाण, प्रसिद्ध लेख, लेखक, सामाजिक व राजकीय भूमिका, समकालीन ब्रिटिश राज्यकर्ते, झाली असल्यास कार्यवाहीचे स्वरूप, इतर आनुषंगिक माहिती या मुद्द्यांच्या आधारावर करावी.
स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाच्या प्रसाराचे प्रयत्न, महिला व मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठीचे प्रयत्न, माध्यम व शिक्षणाच्या स्वरूपाविषयी समाजसुधारकांचे विचार, ब्रिटिशांनी स्थापन केलेले आयोग व त्यांच्या शिफारशी, ब्रिटिशांची भूमिका, स्वदेशी शैक्षणिक संस्था, विद्यापीठे व त्यांचे योगदान, संस्थापक, त्यांचे कार्य हे मुद्दे अभ्यासावेत.
महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये राजकीय व सामाजिकच नाही तर सांस्कृतिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. या व्यक्तींचा अभ्यास करताना त्यांचे कार्यक्षेत्र, कालावधी, महत्त्वाची उद्धरणे, स्थापन संस्था, कार्य, पुस्तके, असल्यास नियतकालिके, महत्त्वाच्या घटना, महत्त्वाची वैयक्तिक माहिती, असल्यास ब्रिटिशांशी संबंधांचे स्वरूप, परिणाम यांचा आढावा घ्यावा.
समाजसुधारकांचा अभ्यास करताना त्यांची ठळक वैयक्तिक माहिती – पूर्ण नाव, महत्त्वाचे नातेवाईक, जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी, सोबती, स्थापन केलेल्या आणि महत्त्वाची भूमिका निभावलेल्या संस्था, असल्यास वृत्तपत्र/नियतकालिक, साहित्य, महत्त्वाचे उद्गार, महत्त्वाच्या घटना, कार्ये (कालानुक्रमे), असल्यास लोकापवाद आणि इतर माहिती.
यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा.
राष्ट्रीय चळवळी अभ्यासताना महाराष्ट्राचा राजकीय इतिहास भारताच्याच इतिहासाचा भाग म्हणून अभ्यासणे आवश्यक आहे. सन १८८५ मधील काँग्रेसच्या स्थापनेपासून स्वातंत्र्यापर्यंत मुख्य प्रवाहातील संघर्षाचा अभ्यास आवश्यक आहे. मवाळ, जहाल कालखंड, गांधीयुगातील तीन महत्त्वाची आंदोलने, इतर महत्त्वाचे राजकीय पक्ष व त्यांची भूमिका आणि वाटचाल हा अभ्यासाचा गाभा ठेवायला हवा. याच वेळी महाराष्ट्रातील आणि इतर ठिकाणच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी व त्यामध्ये सहभागी नेते, संघटना यांचे योगदान, त्याचा मुख्य प्रवाहातील संघांवर परिणाम यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांतील स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करून करता येईल- स्थापनेची सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत, दोन्ही कालखंडातील नेत्यांच्या मागण्या, महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य, दोन्ही कालखंडातील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया, सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार यांची पार्श्वभूमी, कारणे व परिणाम या मुद्द्यांच्या आधारे आढावा घ्यावा.
गांधीयुगातील असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ. चळवळी अभ्यासताना त्यातील संघर्षाचे स्वरूप व त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासाव्यात. या चळवळींचा भाग म्हणून किंवा त्यांना समांतरपणे सुरू झालेले वैशिष्ट्यपूर्ण संघर्ष (झेंडा सत्याग्रह, पत्री सरकार इ.) यांचा अभ्यास बारकाईने करावा.
समकालीन चळवळींमध्ये जहाल कालखंडाशी समांतर क्रांतिकारी चळवळीचा थोडक्यात आढावा घ्यावा. दुसऱ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ जास्त विस्तृत असल्याने तिचा बारकाईने आढावा घ्यावा. महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना, त्यांचे कार्य, नेते, संघर्षाचे स्वरूप, नेत्यांचे लेखन, प्रसिद्ध उद्धरणे महत्त्वाच्या घटना यांचा बारकाईने आढावा घ्यावा,
क्रांतिकारी विचार आणि चळवळींचा उदय हा मुद्दा उद्याची पार्श्वभूमी, स्वरूप, कार्ये, ठळक विचार, घडामोडी, महत्त्वाचे नेते व त्यांचे योगदान, भारताबाहेरील कार्ये आणि त्याचे स्वरूप, महिलांचा सहभाग, वृत्तपत्रे, साहित्य, खटले अशा मुद्द्यांच्या आधारे करावा.
त्याच बरोबर आर्थिक जागृतीच्या अनुषंगाने अभ्यासलेल्या समांतर चळवळीतील ब्रिटिशविरोधी भूमिकाही समजून घ्यावी, शेतकरी चळवळी, आदिवासी चळवळ, साम्यवादी चळवळी, संस्थानांतील जनतेच्या चळवळी यांचाही आढावा घेणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रमामध्ये स्वातंत्र्यपूर्व महाराष्ट्राचा इतिहास असा स्पष्ट उल्लेख असल्याने आधुनिक भारताच्या इतिहासातील महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्रातील व्यक्ती, घटना आणि संस्था/संघटनांशी संबंधित बाबीवर प्रश्न विचारले जाणे गृहीत धरायला हवे. उदाहरणार्थ, समकालीन चळवळींचा अभ्यास करताना बंगालमध्ये तिभागा आंदोलनापेक्षा महाराष्ट्रातील शेतकरी / आदिवासींचे उठाव या मुद्द्यांवर भर असणे आवश्यक आहे.
steelframe.india@gmail.com