Success Story: या जगात यश प्राप्त करणाऱ्या व्यक्तींना अनेक कठीण आव्हानांना सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. यातून जर आपण दृढनिश्चय आणि चिकाटीने पुढे गेलो, तर अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते हे सिद्ध झाले आहे. तुम्ही अशा प्रकारच्या अनेक यशोगाथा आजपर्यंत ऐकल्या असतील. आज आम्ही अशाच एका तरुणीचा यशस्वी प्रवास सांगणार आहोत. या यशोगाथेत दोन्ही हातांशिवाय जन्मलेल्या अंकिताने हार न मानता, तिच्या बुद्धीच्या जोरावर NET JRF मध्ये AIR-2 स्थान मिळवल्याची माहिती मिळेल. अंकिताचा प्रवास असंख्य लोकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देत आहे.
अंकिता तोपाल ही उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती जन्मापासूनच अपंग असली तरीही नेहमी तिने अभ्यासाला प्राधान्य दिले. तिचे वडील प्रेमसिंग टोपल हे आयटीआय टिहरी येथे प्रशिक्षक आहेत. अंकिता दोन्ही हातांशिवाय जन्माला आली आहे आणि पायांनी लिहिते. तिने देवल डेव्हलपमेंट ब्लॉकमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर हृषिकेशमधून इंटरमिजिएट केले. उच्च शिक्षणासाठी अंकिता डेहराडूनला गेली, जिथे तिने इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
अंकिताने दोनदा नेट उत्तीर्ण केली
अंकिताने दोनदा राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) उत्तीर्ण केली आहे आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) परीक्षेसाठीही पात्रता मिळवली आहे. यावेळी ती केवळ JRF उत्तीर्ण झाली नाही, तर तिने NET मध्ये ऑल इंडिया रँक २ देखील मिळवली.
आपल्या कुटुंबाला आणि उत्तराखंड राज्याला गौरव मिळवून देणारी अंकिता आपली स्वप्ने पूर्ण करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी एक आदर्श आहे. अंकिताची कहाणी प्रेरणादायी आहे.