Success Story: परिस्थिती कशीही असो, स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय एकदा केला की सारं काही सोप्पं होतं; फक्त त्यासाठी मेहनत आणि जिद्द कायम असायला हवी. भारतातील अनेक तरुण मंडळी मोठमोठ्या परीक्षा देत असतात. बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; पण काही जण असेदेखील असतात, जे मेहनतीच्या जोरावर यश मिळवतात. आग्र्यातील अभिषेक आणि शिवम या दोन्ही भावंडांनीदेखील अशीच उत्तम कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनादेखील त्याचा अभिमान वाटत आहे.
JEE Advanced 2024 चा निकाल ९ जून रोजी जाहीर झाला असून यंदा १,८०,२०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि त्यापैकी ४८,२४८ विद्यार्थी पात्र ठरले. अनेक समस्यांना तोंड देत विद्यार्थी JEE Advanced परीक्षा उत्तीर्ण करतात. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील अभिषेक आणि शिवम या भावंडांनीदेखील अशाच अडचणींना तोंड देत ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
आग्रा येथील अभिषेक कुमार आणि शिवम कुमार यांनी यंदा JEE Advanced परीक्षेत अव्वल गुण मिळवून आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे केले आहे. अभिषेक आणि शिवम हे सख्खे चुलत भाऊ आहेत. या दोघांचे वडील रोजंदारी मजूर म्हणून काम करतात.
आर्थिक परिस्थितीशी झुंज देत अभिषेकने JEE Advanced मध्ये २३७२ वा क्रमांक मिळवला. अभिषेक हा राजेंद्र कुमार यांचा मुलगा आहे, तर विजेंद्र कुमार यांचा मुलगा शिवम कुमार याने AIR २९८९ वा क्रमांक मिळवला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजेंद्र आणि विजेंद्र यांनी सांगितले की, “ते १५ वर्षांपूर्वी कामासाठी आग्रा येथे आले होते. तिथे आल्यानंतर त्यांना रंगकामाचे काम मिळाले. काही वर्षांनी त्यांनी बलुनी संस्थेतच रंगकामाचे काम केले. इथे शिकणाऱ्या मुलांना आम्ही इंजिनीअर बनवण्याचे स्वप्न पाहिले. आमच्यासोबत मुलांनी खूप मेहनत घेतली.”
पुढे त्यांनी सांगितले की, “अनेकदा घरातील आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला रिकाम्या पोटानिशी झोपावे लागे. बऱ्याचदा आम्ही दिवसातून एक वेळा उपाशी राहिलो आहे.”
शिवम आणि अभिषेक यांनी दहावी, बारावीतही मिळवले होते उत्तम गुण
शिवम आणि अभिषेक यांनी दहावी, बारावीतही चांगले गुण मिळवले होते. अभिषेकला दहावीत ८७ टक्के आणि बारावीत ८९ टक्के, तर शिवमला बारावीत ८६ टक्के आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेत ८४ टक्के गुण मिळाले होते.