Success Story: मेहनतीच्या जोरावर माणूस काय करू शकतो याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. या गोष्टीवर फार कमी लोकांचा विश्वास बसेल; पण भारतातील एका १३ वर्षांच्या मुलाने १०० कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे. या मुलाचे नाव तिलक मेहता असून, तो त्याच्या व्यवसायातून प्रत्येक महिन्याला दोन कोटींहून अधिक पैसे कमावतो. तिलक मेहताने कमी गुंतवणुकीतून त्याचा हा व्यवसाय सुरू केला आहे. खरे तर तिलक मेहताने पेपर एन पार्सल नावाची कंपनी काढली. कंपनी सुरू करण्यासाठी त्याच्याकडे फारसे भांडवल नसल्याने त्याने वडिलांकडून काही पैसे घेतले आणि मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीने कोट्यवधींचा व्यवसाय सुरू केला. अशी सुचली व्यवसायाची कल्पना (Success Story) या व्यवसायाची कल्पना तिलकला त्याच्यासोबत घडलेल्या एका घटनेनंतर सुचली. तिलक एकदा काकांच्या घरी गेला असताना परत येताना तो त्याचे पुस्तक तिथेच विसरला; पण दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने त्याला त्याच दिवशी पुस्तक हवे होते. अडचण अशी होती की, एकही डिलिव्हरी कंपनी त्याच दिवशी त्याचे पुस्तक पाठवायला तयार नव्हती. काही डिलिव्हरी कंपन्यांनी मान्य केल्यावरही त्यांनी भरपूर पैसे मागितले. त्यानंतर अशा समस्येवर उपाय म्हणून तिलकने पेपर एन पार्सलचे काम सुरू केले. स्वस्त ऑनलाइन सेवेला सुरूवात पैशांची कमतरता पाहून तिलक मेहताला एक नवीन कल्पना सुचली. त्याने मुंबईतील डब्बावाला या टिफिन सेवा कंपनीशी संपर्क साधला आणि २०१८ पासून त्यांच्यासोबत ऑनलाइन काम सुरू केले. या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे लोकांना स्वस्त दरात डिलिव्हरी सेवा मिळू लागली. टिफीनप्रमाणेच डबेवाले पार्सलदेखील पोहोचवतात. त्यामुळे एकाच दिवसात डिलिव्हरी लोकांपर्यंत पोहोचू लागली आणि हळूहळू हा व्यवसाय वाढू लागला. हेही वाचा: Success Story: फक्त २०० रुपयांपासून केली सुरुवात अन् मेहनतीच्या जोरावर कमावले १० कोटी महिन्याला दोन कोटींचा फायदा तिलक मेहताच्या पेपर्स एन पार्सल कंपनीने स्थापनेपासून जवळपास २०० कर्मचाऱ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत आणि पाच हजारहून अधिक डबेवाल्यांना कंपनीशी जोडले आहे. त्यामुळे आता डबेवाल्यांचे उत्पन्नही दुप्पट झाले आहे. कारण- आता ते खाद्यपदार्थ पोहोचवण्याबरोबर पार्सलचे कामही करीत आहेत. या कंपनीची किंमत आता १०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे आणि तिलक मेहताची एकूण संपत्ती ६५ कोटी रुपये आहे. तिलक दररोज सुमारे सात लाख रुपये कमवतो. म्हणजे त्याला प्रत्येक महिन्याला साधारण दोन कोटी रुपयांचा फायदा होतो.