सागर भस्मे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही लेखांमधून आपण राष्ट्रीय उत्पन्नांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण पैसा म्हणजे काय? त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तसेच पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार याबाबत जाणून घेऊ या. पैसा म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा होय. साधारणतः इ.स. ७०० पूर्व काळात लीडियाच्या राजाने सर्वप्रथम नाणी पाडायला सुरुवात केली. भारतामध्ये महाजनपद काळापासून इ.स.पूर्व ५ व्या शतकापासून नाणी पाडल्याचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळतो. मौर्य कालखंडामध्ये हत्ती, सूर्य अशा प्रतिमा असलेली अनेक नाणी आपल्याला सापडल्याचे आढळतात. गुप्त काळात म्हणजेच इ.स.नंतर चौथ्या शतकात शुद्ध सोन्याची नाणी पाडली जात होती. तसेच ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये एकोणिसाव्या शतकात नवीन एकेरी नाणे व्यवस्था अमलात आणली.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न भाग -६

विविध अर्थतज्ज्ञांनी पैशाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. जसे की, प्रा. क्राउथर यांच्या मते, “जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते, अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा.” तसेच प्रा. वाँकर यांच्या मते, “जो पैशाचे कार्य करतो, तो पैसा होय.”

आधुनिक अर्थव्यवस्था श्रमविभागणी व देवघेव यावर आधारलेली आहे. उत्पादक घटकांचा मोबदला देण्याकरिता, कर्जाचे व्यवहार पूर्ण करण्याकरिता पैशाचा उपयोग केला जातो. वस्तू किंवा सेवा यांची देवघेव सर्वमान्य विनिमय माध्यमांद्वारे होण्यापूर्वी वस्तू किंवा सेवांची प्रत्यक्षपणे देवघेव होत असे. मीठ देऊन कापड घेणे, गवंडीकामाचा मोबदला धान्याच्या रूपात देणे अशा पद्धतीचे वस्तुविनिमयावर आधारलेले व्यवहार प्रगत मानवजातीस गैरसोयीचे वाटू लागले. त्यानंतरचा टप्पा म्हणजे विनिमयाचे माध्यम म्हणून एखादी वस्तू वापरणे. जसे की, पिसे, हाडे, धान्य, हत्तीचे दात, वाघाचे कातडे, मेंढी, घोडे, हत्ती आदी वस्तूंचा आणि जनावरांचा जगाच्या विविध भागांत विनिमय माध्यम म्हणून उपयोग करण्यात येत असे.

पैसा अस्तित्वात येण्याचे कारण उत्क्रांती आहे; क्रांती नव्हे. पैशाचे स्वरूप काळाची गरज व सांस्कृतिक विकास यानुसार सतत बदलत आहे. आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे झालेल्या बदलांचा परिणाम आहे. पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार अस्तित्वात आलेले आहेत.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न भाग-४

पशू पैसा : इतिहासपूर्व काळात देवघेवीचे माध्यम म्हणून पशू पैसा वापरला जात होता. म्हणजेच प्राण्यांचा वापर हा विनिमयाकरिता होत होता. पशू पैशामध्ये विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तू पैसा अस्तित्वात आला.

वस्तू पैसा : जो वस्तू पैसा हा देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरला जात होता, तो हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होता. उदाहरणार्थ- प्राण्यांची कातडी धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड व दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. परंतु, वस्तूंचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला.

धातू पैसा : धातू पैसा तयार करताना सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. परंतु, मौल्यवान धातू व धातूच्या तुकडा यांतील समानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्यांचा शोध लागला.

धातूंची नाणी : पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असत. कालपरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने एक प्रणाली निश्चित केली गेली. त्यामध्ये प्रमाणित किंवा प्रधान नाणी, तसेच गौण नाणी असे वर्गीकरण करण्यात आले. प्रमाणित नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते. शासकीय यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचे विनिमय मूल्य निश्चित केले जाते. ब्रिटिश कालखंडामध्ये प्रमाणित नाण्यांचा वापर केला जात होता. गौण नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यांसारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनवलेली असतात. भारताच्या चलनातील सर्व नाणी गौण नाणी आहेत. गौण नाण्यांच्या वहनियतेच्या अडचणीमुळे कागदी पैसा अस्तित्वात आला.

हेही वाचा – UPSC-MPSC : अर्थशास्त्र : राष्ट्रीय उत्पन्न भाग-३

कागदी पैसा : कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय म्हणून आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. भारतामध्ये एक रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी भारत सरकारकडून चलनात आणली जातात आणि त्यापुढील चलनाच्या निर्मितीचा अधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोयी व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणांमुळे बँक पैसा अस्तित्वात आला.

पत पैसा : पत पैसा म्हणजे बँक पैसा होय. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवींच्या आधारे पत पैसा निर्माण करतात.

प्लास्टिक पैसा : आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. डेबिट व क्रेडिट कार्ड प्लास्टिक पैसा म्हणून वापरले जातात. पुढे जाऊन इलेक्ट्रॉनिक पैसा अस्तित्वात आला.

इलेक्ट्रॉनिक पैसा : ई-पैशाला मौद्रिक मूल्य असून, हे इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या साह्याने हस्तांतरित केले जाते. ई-पैसा जागतिक व्यवहारांमध्ये वापरला जातो.

आभासी पैसा : अलीकडेच पैशाचा नवीन प्रकार अस्तित्वात आला आहे. आभासी पैसा म्हणजेच बिटकॉइन. बिटकॉइन हे एक डिजिटल चलन आहे. या डिजिटल चलनाद्वारे पैसे जगभरात कोठेही पाठविता येतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc indian economy money and currency part 1 mpup spb