कुमुद कदरकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भौतिक सुखांमध्ये ‘आयुष्याचा अर्थ’ नसतोच. तो असतो आयुष्य जगण्यात, विविध अनुभव घेण्यात. आपल्या मानलेल्या माणसांत, त्यांच्या सुखदु:खात, काहींना माफ करण्यात, तर काही गोष्टी विसरण्यातही.. आयुष्य सापडतं, ते निसर्ग भरभरून अनुभवण्यात, कविता, गाणी, विविध कलांमध्ये रमण्यात. अशा अनेक गोष्टी आयुष्यात अर्थ भरत जातात..

मी सत्तर वर्षांची, साधंसुधं आयुष्य जगणारी एक गृहिणी.. आता आजीच्या भूमिकेत शिरलेली. माहेरच्या कोंदणातून प्रामाणिकपणा, सच्चेपणा, दातृत्वाचं तेज बरोबर घेऊन सासरी आलेली. आपल्याला नात्याची माणसं निवडता येत नाहीत, पण सासरचेही खरी ‘कदर’ करणारे व मोठय़ा मनाचे मिळाले. त्यामुळे आयुष्य छान अनुभवता आलं. ‘आयुष्याचा अर्थ’ विविध टप्प्यांवर कळत गेला.

मी आठवीत असताना माझ्या मामांकडून वाचनाचं बाळकडू मिळालं. निरीक्षणानं, वाचनानं जगणं, वागणं समृद्ध होत गेलं. चांगुलपणा, सच्चेपणा अधिकाधिक कसदार बनत गेला. लग्नानंतर पतीच्या प्रोत्साहनानं अकरावी ते ‘एम.ए.’पर्यंतचा प्रवास आणि पुढे संगीत, राग, हार्मोनियम, ‘हॅपी थॉट्स’सारखे कोर्स, भरतकाम, चित्रकला, रांगोळीसारखे छंद जोपासता आले. नंतर पंधरा वर्ष मध्यम व गरीब वर्गातील मुलांना माफक फीमध्ये, प्रसंगी मोफत शिकवलं. या सगळय़ा गोष्टींनी खूप आंतरिक समाधान मिळालं.

माझ्या दोन्ही मुलांना पुरेसा वेळ देऊन मी जागरूकतेनं वाढवलं. ती नम्र, माणुसकी जपणारी आहेत, याचा आनंद आहे. जावई आपुलकी जपणारे व सुनबाई मायाळू आहे. या सगळय़ांनी आयुष्य समृद्ध आहे. तरीही माझी सखी रोजनिशी, ती लिहिण्याची सवय मला स्व-निरीक्षण, चुकांची कबुली व अधिकाधिक सद्वर्तनाकडे नेते.

 देव ही संकल्पना, ईश्वरीय शक्ती मानतेच, पण विशेष कर्मकांडात न गुंतता, सणांचा खरा अर्थ समजावून घेत-देत सद्वर्तन हाच देव मानते. भौतिक सुखांमध्ये ‘आयुष्याचा अर्थ’ नसतोच, नाही का? हे स्वत:च्या अनुभवांतून जाणवलं. मुळातच हौस, हव्यास मोह कमीच होता. ऐपत असतानाही कधीच वाटलं नाही, की हिऱ्यांचा सेट घालून मिरवावं; उलट सुधा मूर्ती, राणी बंग, मंदा आमटे यांचं आयुष्य पाहिलं की खूप चांगलं वाटतं.

श्रावणात कामवाल्या बाईला पुरणपोळी जेवू घालणं, एखादीची नव्या साडीनं ओटी भरणं, नवरात्रात ४-५ जणींना वस्तू देणं, रिमांड होममध्ये जाऊन तिथे खाऊ वाटणं, यांसारख्या छोटय़ा गोष्टींतूनही समाधान मिळतं आणि समोरच्याचं कौतुक, प्रशंसा करत, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणं मला महत्त्वाचं वाटतं. सध्याच्या आमच्या गायनगुरू श्वेता मॅम यांच्यासह अनेक माणसं मी जोडली, जी आयुष्यात आनंद भरत आहेत. 

 आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी निसर्गानंही मदत केली. अनेक निसर्गगोष्टी अनुभवल्या- चैतन्यदायी पाऊसथेंब, लावण्यवतीसारखी नटलेली झाडं, हिरवा सर्जनउत्सव, वाहाणारे धबधबे, गाणारे पक्षी, अमरनाथचं शिविलग, हे सारं आनंदाच्या वाटेवर नेणारं आहे. झाडाझाडांतून जणू ‘मल्हार’ जागत असतो. निसर्गगुरू आपला नम्रपणा, दातृत्व, नव्यांना जागा करून देणं, असं खूप काही शिकवतो. फुलांवर खूप कविता लिहिल्या. गाण्यातले, कवितेतले शब्द, सौंदर्य व अर्थ मला फार भावतात. मोबाइल जमान्यातही मी पत्र लिहिण्याचा छंद चालू ठेवला आहे. या सगळय़ा छोटय़ा छोटय़ा गोष्टी माझ्या आयुष्यात अर्थ भरत आहेत.   प्रत्येक दिवस आपल्याला शिकवत असतो. समोरच्यांचे स्वभाव सवयी न पटणाऱ्या गोष्टी असतातच ना, पण जे आहे ते स्वीकारणं आणि काही सोडून द्यायला शिकणं, ही अवघड प्रक्रिया आहे. हे ‘गिव्ह अप’ जमत नाही लवकर; पण आजही तो प्रयोग करणं व मनाला बजावणं चालू आहेच. कुणाच्याही न पटणाऱ्या गोष्टीत ‘स्वीकारापर्यंत’ यावंच लागतं. ‘इट्स ओके’ म्हणत तो प्रयत्न आयुष्यभर चालूच असतो. अजूनही चालू आहे. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या तत्त्वावर विश्वास आहेच, त्यानुसार वागणं चालू आहेच. मनात काही न ठेवता समोरच्याला क्षमा करणं, प्रेमानं मन भरून घेणं हे पण आयुष्याचं देणं असावं, असं मी मानते.

करोनाच्या साथीनं खूप काही शिकवलं. सुख, हव्यासाच्या कल्पना बदलल्या. मावळतीच्या या टप्प्यावर निरपेक्ष राहावं. मन कृतज्ञ, शांत असावं. दुसऱ्यांनी आपल्याशी जसं वागावं असं आपल्याला वाटतं तसंच आपण दुसऱ्यांशी वागावं, हे मला खूप पटतं. फक्त गाणी, कविता यांच्यावर प्रेम केलं तरी त्यातला आशय, सौंदर्य, अर्थ ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ हे शिकवतात; हो ना?

chaturang@expressindia.com  

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushyacha arth author kumud kadarkar life happiness experience ysh