एकनाथांचे आई-वडील ते अगदी लहान असताना गेले. एकनाथ थोडा मोठा झाल्यावर, आपले आईवडील देवाघरी गेले म्हणजे नक्की कुठे गेले, याचा विचार करीत असे. एकदा गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर खेळायला गेले असताना, त्याला एक साधू भेटला. देव कुठे आहे, हे फक्त दौलताबाद किल्ल्याचे किलेदार, जनार्दन स्वामी सांगतील, असे साधूने सांगितल्यावर, ८-१० वर्षांचा एकनाथ, घरी कोणालाही न सांगता, पैठण ते दौलताबाद हे ७२ किलोमीटरचे अंतर चालत गेला. या मुलाला पाहिल्यानंतर, त्याची योग्यता स्वामींनी ताबडतोब ओळखली, आपल्यातील शुद्ध जाणीव म्हणजेच ईश्वर, हे समजण्यासाठी, त्यांनी त्याला अगदी आरंभापासून शिकवायला सुरुवात केली. ते म्हणाले,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देह शुद्ध करूनि भजनी भजावे,
आणिकांचे नाठवावे दोष गुण

यात केवढा तरी अर्थ भरलेला आहे, सामान्य माणूस नेहमी दुसऱ्याचे दोष शोधत असतो. ज्या दिवशी आपल्या अवगुणांची, दोषांची जाणीव होईल, त्या दिवसापासून चित्तशुद्धीला सुरुवात होईल, हळूहळू आनंदाची वाट सापडेल. हे समजतं, पण हे किती कठीण आहे यावर तुकाराम महाराज म्हणतात,

माझे मज कळो येती अवगुण,
काय करू मन अनावर
ज्

ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात, ‘रु णुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे,’ इथे भ्रमर म्हणजे भुंगा जसा एके ठिकाणी बसत नाही, चंचल असतो, तसं हे मन चंचल आहे. या मनाला ते सांगतात, तुझे अवगुण काढून टाक, त्या ईश्वराच्या चरणावर एकदा तरी अगदी निश्चल होऊन बैस.

रहीम अकबराच्या दरबारातला एक विद्वान. तो एके ठिकाणी म्हणतो,
दोस पराई देखी चला, हसंत हसंत,
आपणे याद न आवई, जिसका आदि न अंत

दुसऱ्यांचे दोष पाहून माणूस हसत असतो, पण त्याला आपल्या दोषांची, ज्या दोषांना आदि अंत नाही याची जाणीवच नसते. म्हणून आनंदाच्या,  परमार्थाच्या वाटेवर पाऊल टाकताना, प्रथम देहाच्या व मनाच्या शुद्धीचे महत्त्व जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगितले, ‘आणिकांचे नाठवावे दोष गुण’

– माधवी कवीश्वर
madhavi.kavishwar1@gmail.com

मराठीतील सर्व चित्ती असो द्यावे समाधान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont blame or find fault in others