आयुष्यात लाज, शरम वाटावी असे प्रसंग घडतच असतात. त्यामागे असतो, ‘लोक काय म्हणतील?’ या भावनेचा बागुलबुवा. पण प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिससारखा माणूस त्यावर मात करायला सांगतो. कारण ती भावना आपल्या मनानेच तयार केलेली असते. माणसाला स्वत:च्या माणूसपणापेक्षा स्वत:ची ‘प्रतिमा’ जास्त निकटची वाटायला लागते तेव्हा शरम ही भावना रिंगणात उतरते. कधी येईल ‘निलाजरेपण कटीस नेसले!’ ही अवस्था?

सकाळी सहा वाजताचं विमान पकडायचं म्हटलं, तर ती मोठी कसरत असते. मुंबईच्या विमानतळावर पहाटे चार वाजता पोचण्यासाठी ठाण्याहून सव्वातीनला निघावं लागतं. उशिरात उशिरा पहाटे अडीचला उठावं लागतं. अशाच एका उत्तररात्री मी अर्धवट झोपेत हा पल्ला गाठला. नोंदणीचे सोपस्कार करून, विमान कंपनीहाती सामान देऊन सुरक्षा तपासणीच्या रांगेत उभा होतो. माझी शारीर तपासणी घेणारा जवान अचानक खो-खो हसायला लागला. माझा झोपाळू चेहरा अधिक बावळट झाला.

‘‘पाजामा उल्टा पहन रखा है आपने।’’ हॅशटॅग ‘मानहानी’ लावलेला क्षण मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. सामान वाहणाऱ्या पट्ट्याजवळचे सारे जवान, माझ्या रांगेतले पाठचे प्रवासी सारेजण माझ्याकडे पाहात होते. माझी झोप कुठच्या कुठे पळाली होती. नजरा ‘टोचणे’ म्हणजे काय, ‘लाफिंग स्टॉक’ होणे म्हणजे काय, याचा इतका तीव्र अनुभव कधीच घेतला नव्हता. अर्धवट झोपेत कपडे चढवताना धुतलेला पायजमा ‘तसाच’ चढवला गेला होता. त्याला फक्त ‘नाडी’ होती. बटणे असती तर उलटसुलट कळलं असतं.

‘‘ये क्या नयी फॅशन है क्या!’’ माझ्या बोर्डिंग पासवर शिक्का मारत तो म्हणाला.मी चक्क ‘हो’ म्हणालो. स्वत:ची सुटका करून घेतली. स्वच्छतागृहात गेलो आणि उलट्याचा सुलटा होऊन बाहेर आलो. विमानात चढण्याची प्रतीक्षा करताना मला भेडसावणारा प्रश्न असा होता की आजूबाजूला बसलेल्या, उभ्या किती माणसांनी मला ‘तसे’ पाहिले होते? मी डोळ्यांना ‘स्कॅनर’ बसवून सर्वत्र पाहिलं. सारेजण सर्वसाधारणपणे जसे असावे तसे ‘आपले आपल्यात’ होते. पहाटे सव्वाचारचा मूड जसा हवा तसा! हुश्श. मी काहीसा सैलावलो. विचार सुरूच होते.

‘‘अहो, तुम्ही मनोविकारतज्ज्ञ ना…आज अगदी धांदरट, बावळट झालात…कुणी ‘रील’ काढला नाही तुमचा, यात समाधान माना…’’ दचकलो. माझ्याच मनातले संवाद होते हे.आपण ‘गोंधळ’ केला हे खरं. तो घडला. आता या क्षणापासून आपण सावधगिरी बाळगू. अनोळखी लोकांपुढे आपली चूकभूल उघड झाल्याने अवघडलेपण(Embarrassement) येणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. पण समजा उपस्थितांपैकी एक किंवा अनेकांनी आपली यथेच्छ टिंगलटवाळी केली असती तरी आपल्या ‘माणूसपणात’ कोणता फरक झाला असता? समजा या वागण्याबद्दल प्रत्येकाने माझी उघड अवहेलना केली तरीही ‘मानहानी’मधली ‘मान’ माझीच आणि मान-अपमानही माझाच दृष्टिकोन ठरवणार. मी आता कॉफीचा कप हातात घेऊन विचार करत होतो.

‘शरम’ ही भावना कशी ठसली असेल मानवी मेंदूत? शास्त्रज्ञ सांगतात की, शरम वा लाज ही सामाजिक भावना आहे. माणसे जेव्हा एकत्र राहायला लागली, जेवायला, झोपायला लागली तेव्हा नियम करणं भाग होतं. नियम मोडले तर शिक्षा होत्या. पण छोट्या-छोट्या नियमतोडीला वेळीच पायबंद घालण्यासाठी ‘तिरस्कार’ या भावनेचे डोस सर्वांनी त्या व्यक्तीला द्यायला हवेत. सामाजिक नीतिनियमांचं पालन करणारा माणूसच ‘येथे स्वीकारला जाईल’ हे त्या ‘दोषी’ माणसाला कळायलाच हवं. त्याच वेळी हा असा संदेश सर्वांपर्यंत पोहोचायला हवा. म्हणजे सगळेच आपापल्या ‘अवकाद’मध्ये राहतील.

‘लोक काय म्हणतील?’ नावाच्या भावनिक त्रासाचा जन्म झाला तो हा असा. मी कोणता ‘प्रघात’ मोडला होता? पायजमा घालण्याची सर्वमान्य पद्धत मोडण्याचा. पण अत्यंत ‘विचित्र’ रंगाचे, फाटके-तुटके कपडे घालून बिनधास्तपणे फिरणाऱ्यांचे काय? समाजाचे नियंत्रण धुडकावणारे लोकही काही कमी नसतात. ते प्रतिक्रियावादी बनतात. निषेधाची भाषा आपलीशी करतात. थोडक्यात बेशरम होतात. त्यातले काही तर बेशरमपणा मिरवतातदेखील. स्वयंकेंद्रितता अर्थात ‘नार्सीसिझम’ या स्वभावसूत्राचा उगम असा होतो. त्यात एक भाग शरमेचा असतो. बंडखोरी करून शरमेला पायदळी तुडवायचं. ‘मी’ तुम्हाला ‘लोळवले’. पण अबोध मनात मात्र कुरतडणारी शरम आहे, मानहानी आहे. त्याचे ठसे आहेत. ‘जोकर’ या इंग्रजी चित्रपटातील व्यक्तिरेखेचा प्रवास आठवून पाहा.

आणि दुसऱ्या टोकाला आहेत ‘लाजेने चूरचूर’ होणारी मने. त्यांचे अस्तित्व, त्यांची किंमत फक्त सामाजिक मान्यतेवरच अवलंबून. लोकनिंदेच्या शक्यतेनेच त्यांनी स्वत:ला झाकोळून टाकलेले. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलीस या गटामध्ये होते. स्वत:च्या लज्जास्पद वा लाजिरवाण्या स्वभावावरचा उतारा म्हणून त्यांनी या भावनेवर हल्ला करण्याचे प्रयोग केले. ‘Shame Attacking Exercises’ म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ट्राममधून जाताना एलीस अचानक पुढच्या थांब्याची घोषणा करायचे. लोक विचित्र नजरेने पाहायचे. ‘त्यांच्या नजरा मला ना मारणार आहेत ना खाणार आहेत’ असे ते स्वत:ला सांगत. असे प्रयोग रचून त्यांनी स्वत:ला ‘स्वस्थ लाज’ (Healthy Shame) या अवस्थेला आणले.

सामाजिक संकेतांचे तंतोतंत पालन झाले नाही, कधीमधी लाजिरवाणी चूक घडली तरी स्वत:चे ‘माणूसमूल्य’ (Human Worth) तिथे लावायचे नाही हे एलीस स्वत:ला शिकवत होते. मानसशास्त्रातील असे सारे लिखाण वाचताना मला वाटायचे की ही एवढी काही तीव्र समस्या नसावी. संताप, भीती, नैराश्य या त्यामानाने जास्त ‘अनुभवायला’ मिळतात. माझे हे मत बदलले जेव्हा मी विवेकनिष्ठ मानसशास्त्राच्या कार्यशाळा घेऊ लागलो तेव्हा.

लाज ही भावना दडपून टाकायची भावना असल्याने ती व्यक्त करण्याची पद्धतच नाही. ‘झाकली मूठ’ भावना म्हणता येईल तिला. स्वत:ला लपवण्याची ही अतिशय आदिम प्रतिक्रिया आहे. अनेक जण पाठलागावर आहेत असे जाणून एकटा माणूस कसा लपून बसतो… हजारो वर्षं अशी प्रतिक्रिया दिली गेली आहे. त्या वेळचा पाठलाग प्राणघातक होता. आजचे नजरांचे बाण आणि शब्दांचे हल्ले यांना ‘घायाळ’ मन तसाच विनाशक दर्जा देते.

प्रत्येक कार्यशाळेदरम्यान आम्ही सहभागी मंडळींबरोबर एक प्रयोग करतो. आतापर्यंत जे करण्याची प्रचंड लाज वाटत होती ते वर्तन, ती कृती करायची आणि ‘रेकॉर्ड’करून ग्रुपवर टाकायची किंवा दुसऱ्या दिवशी सर्वांसमोर करायची. हा प्रयोग ऐकतानाच काहींची मने घाबरतात. आठ दिवसीय कार्यशाळेच्या सातव्या दिवशी सायंकाळी ही पूर्वसूचना मिळते. आठव्या दिवशीपर्यंत तोवरच्या शिकण्यामुळे निरोगी आत्मस्वीकाराला काहीसा आकार मिळालेला असतो. त्यामुळे धीराचे प्रमाण वाढलेलं असतं.

पुढच्या दिवसाची सकाळ ‘हॅपनिंग’असते. एक दाढीमिशीवाले गृहस्थ नव्या मुंबईच्या घरून निघून ठाण्याला कार्यशाळेच्या ठिकाणी आले. पण कसे तर पायघोळ ‘स्कर्ट’ आणि त्यावर ‘बायकी’ मानला गेलेल्या रंगाचा शर्ट घालून. त्यांच्या गळ्यात मोत्याची माळ होती. घरातून निघाल्यापासूनचा अनुभव त्यांनी आम्हा सर्वांना सांगितला. प्रचंड लाज, शरम इथपासून हा स्कर्ट किती कम्फर्टेबल आहे इथपर्यंत त्यांचा भावनिक फरक झाला होता. पुरुषाने ‘स्त्री’ सारखं वागायचं नाही, दिसायचं नाही हा पुरुषप्रधान व्यवस्थेचा दंडक त्यांनी मोडला होता. उत्क्रांतीमध्ये मातृसत्ताक पद्धतीमध्ये ‘शरम’ ही भावना कमी प्रमाणात होती. कारण सरासरी भावनांक उंचावलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेने ‘देहबळ’ या गुणाला इतकं अवास्तव महत्त्व दिलं की भावना चुरगळली गेली. तेव्हापासून स्त्रियांमध्ये ‘शरम’ ही भावना पुरुषांपेक्षा जास्त दिसू लागली. आणि पुरुषांमध्ये स्त्रीतत्त्वाचा कोणताही आविष्कार ‘लाजिरवाणा’ ठरला.

एका कार्यशाळेत एक जण, बेडशीट नेसून आले लुंगीच्या पद्धतीने. ‘साहेबांची तब्येत बरी आहे ना’ असे भाव सेवकगणांच्या चेहऱ्यावर. कारण ते आहेत ज्येष्ठ सरकारी अधिकारी. एक उद्याोजक दोन वेगळ्या रंगांचे बूट घालून आले होते. त्यांचा ड्रायव्हर अर्ध्या तासात उरलेले दोन बूट घेऊन हजर. ‘‘माझी प्रतिमा आहे ती सत्ता असलेल्या माणसाची. अशा प्रतिमेच्या माणसाची वेशभूषेच्या संदर्भात जरासुद्धा चूक व्हायलाच नको.’’ हा व्यक्तीचा, यंत्रणेचा आणि समाजाचासुद्धा हट्ट असतो. ‘‘माझ्या साध्या राहणीची अनेक जण स्तुती करतात. त्यांच्या ‘श्रीमंत’ माणसाने कसे राहावे या व्याख्येत मी बसत नाही. पण माझ्या साधेपणाचा संबंध माझ्या दृष्टिकोनाशी आहे. पैशाशी नाही. पैसे मर्यादित असूनही त्याचा दिखावा करणारे कमी नाहीत.’’ या दोघांची निरीक्षणे सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी होती.

स्वत:च्या शरीरातील विशिष्ट अवयवांबद्दलची, लाज हासुद्धा एक ‘झाकलेला’ विषय, आमचे अनेक विद्यार्थी मांडतात. एका मुलीला तिच्या दाताच्या रचनेतील एका दाताबद्दल खूप लाज वाटायची. तो दात लिपस्टिकने ठळक बनवून ती आली दुसऱ्या दिवशी. बहुमताचे म्हणणे असे पडले की त्या विशिष्ट दंतरचनेमुळे ती ‘जास्त गोड’ दिसत होती. या पावतीमुळे (Validation) तिने जणू स्वत:च्या शरीरप्रतिमेवरच मान्यतेची मोहोर उठवली. माझी काख काळसर आहे, याबद्दल एकीला शरम वाटत होती. कुणाला त्वचेच्या रंगाबद्दल तर कुणाला वजनाच्या कमी-जास्तपणाबद्दल. व्यक्तीची शारीरप्रतिमा घडवण्यामध्ये कुटुंब आणि समाजाचा किती मोठा वाटा असतो. अनेक पालक त्यांच्या मुलांना आत्मविश्वास देण्याऐवजी लाजेचा ‘संस्कार’ देतात.

काही जणांना परक्या लोकांना सामोरे जाण्याची यामुळेच लाज वाटते. वरवर दिसताना ती भीती वाटते पण खोलात गेल्यावर शरमेची भावना पुढे येते. ‘मला टेन्शन येतं’ या विधानाला ‘मला अतिशय शरमिंदे वाटते’ या विधानापेक्षा जास्त मान्यता आहे. सामाजिक स्थान, कुटुंबाची प्रतिष्ठा याभोवती लज्जाबंधने पडतात. एका बॅचमध्ये सासू आणि सून दोघी होत्या. अभ्यासक्रमाच्या सातव्या दिवसाच्या संध्याकाळी गप्पा मारताना सासूबाई म्हणाल्या, ‘‘मला तर काहीच सापडत नाही लाजिरवाणे असे.’’.

‘‘उद्या हॉटेलच्या ब्रेकफास्टला नाइट गाऊनमध्ये यायचं’’ सुनेने सुचवलं. ‘‘काय म्हणतेस?’ सासूबाई चमकल्या, चरकल्या, पण त्यांनी खिलाडूवृत्तीने सूचना स्वीकारून प्रत्यक्षात अंमलात आणली. आपला अनुभवसुद्धा प्रांजळपणे सांगितला. माणसाला स्वत:च्या माणूसपणापेक्षा स्वत:ची ‘प्रतिमा’ जास्त निकटची वाटायला लागते तेव्हा शरम ही भावना रिंगणात उतरते. प्रतिमा म्हणजे चौकट. ‘इमेज’ला जपायच्या हट्टापायी या चौकटीचा तुरुंग बनतो. उसासे सोडत त्यात राहतात माणसे. विनातक्रार संकोचून राहतात.

‘‘माझ्या खानदानात क्रांती केली आहे मी आज.’’ एक मावशी म्हणाल्या. अत्यंत कर्मठ, जुन्या चालीरीती पाळणाऱ्या एकत्र कुटुंबातली थोरली सून होती ती. वेशभूषासुद्धा रूढींना साजेशी. या प्रयोगासाठी त्यांनी मिडी ड्रेस खरेदी केला आणि घालूनही आल्या. ‘‘नवरा झीट येऊन पडणार माझा’’ अतिशय मोकळेपणाने हसत त्या म्हणाल्या.

विवेकनिष्ठ मानसशास्त्र निर्लज्जपणाचं समर्थन करत नाही. स्वत:चं माणूसपण त्यातील खाचाखोचांसकट स्वीकारा, असं त्याचं म्हणणं असतं. आमच्या एका डॉक्टरताईंनी भाजी विकली. भरलेल्या बाजारामध्ये आणि मस्त आवाज लावून. एका अभ्यासक-संशोधकाने भर हमरस्त्यावर गाड्या पुसल्या आणि पैसे मागितले. या दोघांना ‘लाज’ वाटली नाही. त्यांचे अनुभव कॅमेऱ्यात बंदिस्त करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना वाटली. अशी मंडळी आपल्या एका वागण्यामधून स्वत:च्या माणूसपणाचे मूल्यमापन करत नाहीत. आपले स्वभावगुण, कौशल्ये, व्यवसाय, सामाजिक, आर्थिक स्थान, शरीरसौंदर्य या साऱ्या आपल्या ‘उपाधी’ आहेत. आपल्या स्वत्वाचे (Identity) वेगवेगळे पैलू आहेत ते. त्यांच्यापैकी कुणा एकावर अथवा अनेकांवर किंवा सर्वांवर आपल्या माणूसपणाचे मोल ठरत नाही. माणूसपणाला ‘उपाधी’ ही पूर्वअट नाही. आपल्यापैकी प्रत्येक जण एकमेव-अद्वितीय (युनिक) आहे. आपल्यापैकी कुणीही खास नाही. हे सूत्र उमगलं की मग निलाजरेपण कमरेला लावून ठेवता येते.

माझ्या विचारांच्या विमानाने आणि प्रत्यक्षातल्या विमानाने सफाईदारपणे लँडिंग केलं.

anandiph@gmail. com