सोमालियातील एका महिलेने इतिहास घडवला आहे. यूएनच्या मते ‘मानवतावाद धोक्यात असलेला जगातील सर्वाधिक अस्थिर देश’ अशी ओळख असलेल्या सोमालियातील पहिली महिला स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून डॉ. हवा अबिदी डिब्लावे यांची कारकीर्द रोमांचकारी ठरली असतीच, पण डॉ. अबिदी यांनी तब्बल ९० हजार निर्वासित, निराधार जनतेला आसरा दिला, त्यांना मोफत औषधोपचार, अन्न पुरवण्यासोबत रोजगार उपलब्ध करून स्थैर्याचं आयुष्य बहाल केलं आणि त्यासाठी अनेकदा त्यांना अतिरेक्यांच्या धमक्यांना सामोरं जावं लागलं. त्यांना ओलिस ठेवलं गेलं आहे. तरीही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आज वयाच्या ६६व्या वर्षीही दिवसरात्र कष्ट उपसत डॉ. अबिदी आपल्या देशवासीयांना ‘जगणं’ बहाल करीत आहेत.
सोमालिया हा पूर्व आफ्रिकेतील देश, कुपोषण, उपासमारी, भूकबळी यांनी वेढलेला. कट्टरतावादी इस्लामी टोळ्या व सैन्य यांच्यातील धुमश्चक्रीने सतत धुमसणारा प्रदेश. २६ जानेवारी १९९१ साली सोमालियातले तत्कालीन सरकार कोसळलं. युद्धाला प्रारंभ झाला. त्याच वेळी दुष्काळाने सोमालियात थैमान घातले. सोमाली जनतेला कुणी वाली उरला नाही. देशात लष्करी राजवट लागू झाली. रस्तोरस्ती माणसांचे मृतदेह पडलेले, कित्येकांचे आप्तस्वकीय डोळ्यासमोर चिरडले गेलेले. विषण्णता, असहायता, अनिश्चितता वातावरणात भरून राहिलेली. अशा वातावरणात राजधानी मोगादिशूपासून २० मैलांवर डॉ. हवा अबिदी यांनी महिला व मुलांसाठी छोटेसे क्लिनिक सुरू केलं. जखमींवर मोफत उपचार करायला सुरुवात केली. ज्यांची स्थिती वाईट होती, त्यांना दाखल करून घेतलं. बघता बघता मदत मागणाऱ्यांची संख्या इतकी वाढली की ४०० खाटांचं रुग्णालय उभं करायला लागलं. पण हळूहळू हा आकडा वाढतच गेला.
मात्र, बरे झाल्यावर हे लोक जाणार कुठे? युद्धामुळे निर्वासित झालेले हजारो लोक मदतीच्या आशेने अबिदी यांच्याकडे पाहू लागले. मग आपल्या १३०० एकर वडिलोपार्जित जागेवर त्यांनी तात्पुरती छावणी उभारली. आज या जागी टुमदार गाव वसलय ‘ डॉ. हवा अबिदी व्हिलेज’. तब्बल ९० हजार लोकांना या जागेमुळे निवारा मिळालाय.
निर्वासित जखमींवर, रुग्णांवर उपचार करायचे हे त्यांचं ध्येय होतं, पण त्यासाठी त्यांना सुरुवातीपासूनच संघर्षांला तोंड द्यावे लागले. हॉस्पिटलमध्ये जखमी लोकांचा तांडा येत होता. त्या वेळी अतिरेक्यांनी या लोकांना ताब्यात देण्याची मागणी केली. ‘मात्र, आधी मला ठार करा, मग माझ्या रुग्णांना’ असे ठणकावत अबिदी यांनी या साऱ्या रुग्णांचा जीव वाचवला. मात्र या लोकांच्या नुसत्या वास्तव्याची सोय करून प्रश्न सुटणार नव्हता. त्यांची पोटं भरण्यासाठीही काही व्यवस्था करावी लागणार होती. त्यासाठीही त्यांनी शक्कल लढवली. तेथील लोकांना शेती करण्याचे प्रोत्साहन दिले. मासेमारीही सुरू केली. प्रसंगी आपल्याकडे होते नव्हेत तेवढे सगळे दागिने विकून टाकले. मात्र या लोकांवर ही वेळ का आली, याचा विचार केल्यावर त्यांना उमजले, की यांच्याकडे शिक्षण नाही. मग त्यांनी मोर्चा वळवला शिक्षणाकडे. डॉ. अबिदी यांनी सर्वानाच, त्यातही मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. सुरुवातीला ८५० मुलांपासून सुरू झालेली या ठिकाणची शिक्षणाची गंगा आता अधिक वेगाने पुढे जात आहे.
डॉ. हवा अबिदी यांचा जन्म १९४७ सालचा. त्यांचे वडील बंदरावर कामाला होते. त्या फक्त १२ वर्षांच्या असतानाच आईचा बाळंतपणातील यातनांनी झालेला मृत्यू त्यांनी पाहिला. आई आपल्या डोळ्यासमोर गेली, आपण काहीच करू शकलो नाही, याची बोच त्या कोवळ्या मनाला ज्या वेदना देऊन गेली, त्यातूनच आपणही पुढे डॉक्टरच व्हायचं, तेही स्त्री-रोगतज्ज्ञ हा त्यांचा निर्धार पक्का झाला. आई निवर्तल्यामुळे लहानग्या हवा अबिदीवर चार बहिणींची जबाबदारी येऊन पडली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणं सुरू होतं. घरात गरिबी असली तरी वडील शिकलेले होते. मुलीने डॉक्टर व्हावे, यासाठी ते तिला प्रोत्साहन देत होते. १९६४ मध्ये, सोव्हिएत युक्रेनच्या शिष्यवृत्तीवर कीव येथे त्यांनी वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात केली. शरीया कायद्याचा विरोध डावलून १९६०च्या दशकात मुलींनी शिक्षण घेणे हीच मुळात कौतुकाची बाब होती. १९७१ साली त्या स्त्री-रोगतज्ज्ञ झाल्या. पण महिला रुग्णांची सामाजिक स्थिती पाहता आपण कायद्याचे शिक्षणही घेतले पाहिजे, असे वाटू लागले आणि त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. १९८३ सुरू केलेल्या दवाखान्यापासून सुरू झालेली त्यांची सेवा इतकी वाढली की २००७ सालापासून ‘डॉ. हवा अबिदी फाऊंडेशन’ नावाची संस्था सुरू केली.
अर्थात इतकं मोठं कार्य, त्यात सारं आलबेल असेल असं कसं होईल? अनेक विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी त्यांचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. हिज्ब-अल-इस्लाम या कट्टरतावादी इस्लामी अतिरेकी समूहाने ‘एक बाई हे करू शकत नाही’, असे सांगत हे हॉस्पिटल बंद करण्याचा फतवा काढला. अबिदी यांना ओलीस ठेवले. पण हवा अबिदी डगमगल्या नाहीत. ‘मी एक महिला आहे, सोमालियन नागरिक आहे, पण मी एक डॉक्टरही आहे. समाजाचे देणं लागते. तुम्ही या समाजासाठी काय केलं?’ असा उलट सवाल त्यांनी अतिरेक्यांना केला.
मे २०१० मध्येही साडेसातशे अतिरेक्यांनी त्यांच्या रुग्णालयावर हल्ला केला. तिथली व्यवस्था बंद पाडली. जगभरातील सोमालियन नागरिकांनी याचा तीव्र निषेध केला. युनोने यात लक्ष घातले. त्या वेळी अतिरेक्यांना माघार घ्यावी लागली. अतिरेक्यांनी नुसती सुटका करू नये, तर लेखी माफीनामा द्यावा, अशीही मागणी या निडर स्त्रीने केली. आणि विशेष म्हणजे ती पूर्णही झाली.
हा प्रसंग बाका होता. त्यांची मुलगी डेको मोहमद त्या वेळी अटलांटा येथे डॉक्टरकीचे शिक्षण घेत होती. आईशी नियमित संपर्कात होती. अतिरेक्यांच्या दहशतीची तिला कल्पना असल्याने आईने माघार घ्यावी, यासाठी तिने विनवणी केली. पण ‘मेले तरी बेहत्तर पण अभिमानाने मरेन’ असे हवा अबिदी यांचे उत्तर होते. सुदैवाने या घटनेने कोणतेही विघातक वळण घेतले नाही. पण हल्ल्यात हॉस्पिटलची प्रचंड वाताहात झाली. पण हार मानतील त्या अबिदी कसल्या. त्यांनी नव्या जोमाने पुन्हा काम सुरू केले. कारण आता जगभरातील सोमालियन नागरिकांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं होतं आणि आर्थिक मदतीचा ओघ डॉ. हवा अबिदी फाऊंडेशनकडे वळू लागला.
डॉ. हवा अबिदी चर्चेत आल्या, त्या ‘ग्लॅमर’ मासिकानं त्यांचा गौरव केल्यानंतर. अमेरिकन पत्रकार, इलिजा ग्रिसवोल्ड यांनी या ठिकाणाला भेट दिली, त्या वेळची तिची प्रतिक्रिया फार बोलकी आहे, ‘एका गोष्टीचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. शस्त्रांशिवाय उभ्या असणाऱ्या एका स्त्रीनं हे करून दाखवलंय. बाहेरची यादवी परिस्थिती, भूकबळी यांनी वेढलेल्या जगात हे बेट मात्र स्वावलंबी आहे.’
अबिदी यांच्या छावणीत मुले व महिला यांची संख्या अधिक आहे. अबिदी महिलांच्या बाबतीत प्रचंड आशावादी आहेत. ‘प्रतिकूल परिस्थितीतही महिला आशेचा किरण आणू शकतात. महिला अस्थिर वातावरणात स्थैर्य आणू शकतात. त्या शांतता प्रस्थापित करू शकतात,’ असं त्या आवर्जून सांगतात. महिलांच्या सर्वागीण विकासासाठी डॉ. हवा अबिदी आग्रही आहेत. घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना सरंक्षण म्हणून त्यांच्या या छावणीत बायकांवर हात उचलणाऱ्या नवऱ्यांना शिक्षा म्हणून छोटे तुरुंगही आहेत. त्यात सजा अमलातही आणली जाते.
अबिदी यांच्या फाऊंडेशनमार्फत चार कार्यक्रम राबवले जातात- आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण व स्वच्छ पाणी आणि जलनिस्सारणाचा प्रकल्प. मात्र आजही तिथल्या प्रतिकूल परिस्थितीची त्यांना कल्पना आहे. अबिदी म्हणतात, ‘सोमालियातील कुपोषणाचा दर भयावह आहे. १८ टक्के इतका प्रचंड बालमृत्यूदर आहे. या आव्हानांशी दोन हात करायचे आहेत, तोपर्यंत थांबता येणार नाही.’
आता अबिदी यांची मुलगी डॉ. डेको यांनी हॉस्पिटलच्या कामकाजाचा ताबा घेतला आहे. तरीही डॉ. अबिदी यांचा दिवस प्रचंड व्यस्त असतो. सकाळी ५ वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. दरदिवशी ५०० जणांना मोफत औषधोपचार केले जातात, तर २४-२५ महिलांची प्रसूती होत असते. कुठली कुठली २० ऑपरेशन्स दिवसाला येथे होत असतात. अर्थातच हे काम खर्चीक आहे. कितीही खर्च झाला तरी आम्ही रुग्णाकडून शुल्क आकारू शकत नाही, कारण कित्येकांना दोन वेळचे जेवणही मिळणं दुरापास्त आहे. म्हणूनच छावणीतून कृषिविषयक कार्यक्रम राबवण्यावर अबिदी यांनी भर दिला आहे. फक्त ५०० कुटुंबांची गरज भागेल, इतक्या अन्नधान्याची निर्मिती तेथे होते आहे. त्यामुळे निधींवर अवलंबून राहावं लागतं. त्यासाठी निधी संकलनावर त्यांना अवलंबून राहावं लागतं. फाऊंडेशनचं काम सोमालियाच्या किस्मायो, बैडो या भागांतही वाढवण्याची अबिदी यांची इच्छा आहे. पण लोकांची सुरक्षा हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान आहे. अतिरेक्यांची टांगती तलवार डोक्यावर आहेच.
छावणीत आलेल्या सोमालियन स्त्रियांची पारंपरिक भूमिका बदलणं, अबिदी यांच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होतं. ‘‘स्त्रिया पुरुषांपेक्षा दुय्यम असतात, या विचारांचा पगडा या स्त्रियांवरही असायचा. त्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्यानं त्यांच्यातील गुण वाढीस लागले. छावणीतही अनेकदा टोळीयुद्धे भडकत. अशा वेळी जर तुम्ही सोमाली असल्याची ओळख विसरून गटाचा झेंडा उभारणार असाल, तर तुम्हाला येथे थारा नाही, अशी कडक भूमिका अबिदी यांना घ्यावी लागली. त्यांचा फायदा अर्थातच झाला. जेव्हा लोक आश्रयासाठी यायचे, तेव्हा ते चिडलेले असत, गोंधळलेले असत. त्यांच्या आई-वडिलांचे, भावाबहिणींचे डोळ्यासमोर झालेले खून त्यांनी पाहिलेले असायचे. त्यांचा माणुसकीवरचा विश्वास उडाल्याने सारे जग हिंसक वाटायचे. मी त्यांना आयुष्यावर विश्वास ठेवायला शिकवते. आपल्या गटाच्या, टोळीशी प्रामाणिक राहण्यापेक्षाही समानता, माणुसकी आधी असल्याचं शिकवते.’’ असं त्या सांगतात.
‘‘सतत गोळ्यांचा आवाज, अपघाताला बळी पडलेले रुग्ण, त्यांचे रक्ताने माखलेले कपडे हे बघून अनेकदा हे सारे सोडून देण्याची प्रबळ इच्छा होत असे. आपल्यावर कोणत्याही क्षणी हल्ला होईल हे सावट असे. पण आपण ज्यांना जीवदान दिलं त्यांचा उजळलेला चेहरा बघून सगळी भीती निघून जायची,’’ अशी कबुली अबिदी देतात. या अनुभवांवरचं त्यांचं ‘किपिंग होप अलाइव्ह’ हे चरित्रवजा, आत्मकथन करणारं पुस्तक अल्पावधित आंतरराष्ट्रीय पातळीवर बेस्टसेलर्स ठरलंय.
‘‘माझ्या मुलींनी माझा वारसा पुढे न्यावा, अशी जबरदस्ती मी कधीच केली नाही. त्यांना त्यांच्या देशाविषयी, इथल्या लोकांविषयी प्रेम आहे, म्हणून त्यांनी माझी धुरा पुढे नेली आहे. त्या पूर्ण बांधिलकीने काम करत आहेत, याचा मला अभिमान आहे’’
अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेत असताना डेकोला सोमालियात परतण्याची इच्छा नव्हती. हताश झाल्यासारखे वाटायचे, पण आईच्या कामामुळे मला प्रेरणा मिळाली. माझ्यावरच्या जबाबदारीने मला इथे परत आणले, असं डेको नमूद करते.
अबिदी म्हणतात, ‘९० हजार लोकांना आसरा देणं सोपं काम नाही. या लोकांना एकत्र नांदताना पाहणं सुखद आहे. यासाठी आयुष्य धोक्यात घातलं, पण त्यातून खूप मिळवलं. खूप काही घडलं. अद्याप स्त्रियांना आर्थिकदृष्टय़ा समर्थ करायचं आहे. सोमालियन लोकांनी एकत्र आलं पाहिजे. त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे. गरिबी, युद्ध यांतून मुक्तता करून घेतली पाहिजे. शोषण होण्यापासून लांब राहिलं पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत हा लढा सुरू राहील.’’
कोणत्याही शस्त्रांशिवाय, अहिंसात्मक पद्धतीने डॉ. हवा अबिदी यांचा हा लढा सुरू आहे. त्याचीच पोचपावती म्हणून २०१२ मध्ये त्यांचं नाव शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकित झालं. गेल्या वर्षी त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही, परंतु तो त्यांना मिळेलच इतकं आकाशाएवढं काम त्यांनी करून ठेवलं आहे. लोकांसाठीच्या त्यांच्यातल्या ममतेच्या, प्रेमाच्या शक्तीबरोबरच अतिरेक्यांनाही गप्प बसवणाऱ्या त्यांच्यातल्या धाडसी शक्तीमुळेच देशवासींयांकडून त्यांना मिळालेलं ‘ममा हवा’ हे संबोधन सार्थच म्हणायला हवं!
bharati.bhawasar@rediffmail.com
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2013 रोजी प्रकाशित
निर्वासितांची ‘ममा’
सोमालियासारख्या अस्थिर, कुपोषणाने त्रस्त आणि यादवीने ग्रस्त देशात एक बेट मात्र या सगळ्यांपासून मोठय़ा प्रमाणात वेगळं आहे.

First published on: 05-10-2013 at 01:10 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr hawa abdi village