हातात पर्स घेऊन कुठेतरी नोकरी करण्यात व मिरवण्यात मला उत्साह होता. ते माझं स्वप्न होतं. त्या स्वप्नामागे धावताना मी एका ठिकाणी अर्ज केला. नोकरी मिळाली. नोकरीचा तो पहिला दिवस. मी तिथे पोहोचले. आणि..
माझ्या आयुष्यातला ‘टर्निग पॉइंट’ अर्थात आयुष्य बदलवणारं वळणं म्हणजे १९५८
तेव्हाही आत्ताप्रमाणेच वृत्तपत्रात ‘वाँटेड एम्प्लॉइज’च्या खूप जाहिराती येत. त्या वाचण्याचे तर मला वेडच लागले होते. एकदा एक अशी जाहिरात वाचली व मी अर्ज केला. अर्थात घरच्यांची परवानगी घेऊनच. एका कंपनीकरिता मुले-मुली पाहिजे होत्या. मुख्य ऑफिस बोरीबंदरला व अर्ज करण्याचे व भेटण्याचे ठिकाण दादरला, एका लॉजिंग-बोर्डिग टाइप हॉटेल हे दिले होते. अर्ज केल्यानंतर आठच दिवसांनी मला मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. वडिलांबरोबरच मी मुलाखतीला गेले. वडीलही त्या कंपनीच्या मॅनेजरला भेटले. माझ्याबरोबर चार मुली व दोन-तीन मुलेही मुलाखतीला त्यांच्या पालकांसवे आली होती. त्या मुलींची व माझी ओळख झाली. दुसऱ्या दिवशी तेथेच आणखी दहा मुलामुलींना मुलाखतीसाठी बोलाविले होते. मुलाखतीच्या वेळी त्यांनी आम्हाला चार-पाच तोंडी प्रश्न विचारले. इंग्लिश पेपर थोडासा वाचून घेतला व एक पॅरिग्रॉफ लिहून घेतला. मुळातच माझे अक्षर सुरेख व वाचन स्पष्ट त्यामुळे माझी मुलाखत चांगली झाली हे मी बाहेर आल्याबरोबर वडिलांना सांगितले.
लगेचच पाचसहा दिवसांनी कारकून पदासाठी निवड झाल्याचे पत्र आले. माझा आनंद गगनात मावेना. पत्राप्रमाणे ऑफिसची वेळ १० ते ५ पगार १५० रुपये. त्या काळाच्या मानाने चांगला होता. सहा महिन्यांकरिता डिपॉझिट म्हणून २०० रुपये भरावे लागणार होते. मी माझ्या मोठय़ा भावाबरोबर जाऊन त्या कंपनीच्या मॅनेजरकडे श्री. नायरकडे जाऊन पैसे भरून आले. त्या दिवशी चार मुली व दोन मुले पैसे भरण्यास आली होती. त्यांनी आम्हाला कच्ची पावती दिली व सहा महिन्यांनी पावती दाखवल्यावर २०० रुपये परत मिळण्याची ग्वाही दिली. शनिवारी आम्हा तिघींना नायर हेड ऑफिसमध्ये घेऊन जाणार असे ठरले.
शनिवारी सकाळी ९ वा त्याने आम्हाला दादर स्टेशनबाहेर उभे राहण्यास सांगितले. आम्हा तिघींची मैत्री झाली होती. सकाळी मोठा भाऊ माझ्याबरोबर आला होता. नायरसाब तेथे हजर होते. टॅक्सीत नायर पुढे व आम्ही तिघी मागे बसलो. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे भावाने टॅक्सीचा नंबर बघून ठेवला. टॅक्सी ड्रायव्हर दाक्षिणात्य असावा. टॅक्सी चालू झाल्यावर ते त्यांच्याच भाषेत बराच वेळ बोलत होते. वीस-पंचवीस मिनिटांनी टॅक्सी एका छोटय़ाशा गल्लीतील इमारतीजवळ थांबली. नायरने आम्हा तिघींना एका बाजूला उभे केले व दहा मिनिटांत ऑफिस प्यूनकडून ऑफिस साफ करून घेतो, असे सांगून वर गेला. टॅक्सी ड्रायव्हर कुणाशी तरी बोलत, पण आमच्यावर पाळत ठेवून उभा होता. आमच्याबरोबरची वैजू गिरगावात राहाणारी. ती खूप चलाख होती. आम्ही उभ्या असलेला एरिया जरा विचित्र व अनोळखी आहे हा संशय तिने आम्हांला बोलून दाखविला. आम्हीही मनातून घाबरलो. तितक्यात एका बाजूच्या दुकानदाराने तुम्ही इथे कशाला आलात व का उभ्या आहांत? हे जवळ येऊन विचारले. आमच्या साहेबांचं या बिल्िंडगमध्ये ऑफिस आहे व तिथे आम्हांला नोकरी मिळाली आहे, असे सांगताच त्यांनी कपाळाला हात लावला व ‘अगं पोरींनो, हा ऑफिसचा एरिया नाही. हा कुंटणखाना-लालबत्ती एरिया आहे. ताबडतोब येथून पळा, समोरच्या गल्लीत पोलीस स्टेशन आहे तिथे पोलिसांना सांगा व घर गाठा ताबडतोब.’’
आमच्या जिवाचे पाणी झाले. आम्ही सरळ धावच घेतली. ग्रँट रोड गाठून तिघीही दादरला माझ्या घरी आलो. घरांत आमचे रडके चेहरे बघून व हकिगत एकून सगळेच घाबरले. मोठा भाऊ दोन मित्रांना घेऊन नायर जिथे उतरला होता त्या हॉटेलवर गेले. पण त्यांनी आदल्या दिवशीच हॉटेल सोडल्याचे कळले. दोन दिवसांतच चौकशीअंती आमच्यासारखे १२/१५ जण फसल्याचे व पैसे फुकट गेल्याचे समजले. एका उमेदवाराचे वडील वकील होते. त्यांनी केस करून, नायरला शोधून त्याला गजाआड टाकले, पण आम्ही बुडालो.
या प्रसंगाने मी अंथरूणच धरले. वडिलांच्या कष्टाचे २०० रुपये गेले हे मनाला खूप लागले. पण आईवडिलांनी व भावाने समजून सांगितले, ‘अगं, पैसा परत मिळेल, पण तुझा मोलाचा जीव वाचला यातच सर्व आले.’ त्या प्रसंगातून सावरायला मला खूपच वेळ लागला. हा एक प्रसंग पण मनावर कायमचा ठसा ठेवून गेला. काही प्रसंग खूप शिकवून जातात तसाच हा.
त्यानंतर मी ठरविले, कोणत्याही गोष्टीत आततायीपणा करायचा नाही. धीर धरायचा व आधी घरांतल्या मोठय़ा माणसांचे ऐकायचे. खासगी नोकरीचा नाद सोडून द्यायचा व सरकारी नोकरीच करायची. कारण त्यावेळी माझ्या डोक्यातील नोकरीचे खूळ घरांत कुणाला फारसे पसंतच नव्हते. पुढे वय वर्षे १९ पूर्ण झाल्यावर लगेचच मला ‘बॉम्बे टेलिफोन्स’मध्ये सरकारी कायम नोकरी लागली व माझे आयुष्य समृद्ध बनले.
त्या प्रसंगाने माझा आत्मविश्वास वाढला. माणसाची पारख करायचे ज्ञान मिळाले व पैसा! कसा, कुठे व कोणत्या विश्वासावर द्यायचा याची खात्री पटली. प्रत्येक गोष्ट धीराने व कायद्याने करायचे बाळकडू मला त्या प्रसंगाने शिकवले. म्हणूनच ऐन तारुण्यातील तो प्रसंग अनुभव माझ्या आयुष्यातील ‘टर्निग पॉइंट’ठरला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
नडली नोकरीची लालसा
हातात पर्स घेऊन कुठेतरी नोकरी करण्यात व मिरवण्यात मला उत्साह होता. ते माझं स्वप्न होतं. त्या स्वप्नामागे धावताना मी एका ठिकाणी अर्ज केला
First published on: 25-01-2014 at 06:04 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job aim troubled