ज्याच्यापासून आपल्याला कधीच पळून जाता येत नाही ते म्हणजे आपलं मन! भाव, भावना, विचार, जाणिवा, इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती यांसारख्या मनाच्या विविध शक्ती, हेतू, कल्प – विकल्प यांसारख्या कित्येक गोष्टींनी ठासून भरलेल्या मनाबद्दल आपल्याला कुतूहलही वाटतं आणि अप्रूपही! मन ‘असं’ आहे वाटे वाटे तोवर ते बदलतं. दिसत नसलं तरी या मनोव्यापाराचे ठसे देहावर, व्यवहारावर, वर्तणुकीवर, परस्पर नातेसंबंधावर, वातावरणावर, अवघ्या जगण्यावरच ठायी ठायी दिसतात.
आपल्याच मनाला समजून घेताना आपण गोंधळतो आणि जगताना तर आपल्याला इतरांच्या मनाचाही विचार करावा लागतो. मन असं चंचल की त्रलोक्य त्याच्या संचाराला पुरत नाही. ‘कळतं पण वळत नाही आणि समजतंय पण तसं वागणं जमत नाही’ याचा अनुभव आपण रोजच जगताना घेत असतो. मग आपण करायचं काय? या मनाची गंमत म्हणजे त्याला प्रयत्नपूर्वक शिस्त लावता येते. गती आणि वाढ हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. जसं वृक्षाला अनेक पाने असली तरी पानागणिक तो वेगळा नसून एकच वृक्ष असतो. तसं आपला देह, मन, बुद्धी, प्राण आणि आत्मा या साऱ्यांचा मिळून एकच ‘मी’ असतो. या साऱ्यांच्या गती आणि वाढीत एक सुसूत्रता आणली की हा आपल्यातला ‘मी’ अधिक सक्षम, अधिक दृढ, बलवान आणि प्रगतिशील बनत जातो.
आपल्या मनाच्या आतल्या मनात आपण बुडी मारली की तिथे माणसाच्या ‘प्राणी’ स्तरावरच्या गोष्टी भरपूर स्वरूपात आढळतात. मला जे हवं आहे ते लगेच आणि कसंही करून हवंच आहे. ते मला मिळालंच पाहिजे’ असा अट्टहास या अबोध मनाचा असतो. आपल्या सुखासाठी आणि बरं वाटण्यासाठी काहीही करण्याची या मनाची तयारी असते. आणि तसा जबरदस्त ऊर्मीचा रेटा लावून त्या हव्यासपूर्तीसाठी कृती करण्याचा या मनाचा मानस असतो. पण अंतर्मनातल्या आपल्या जाणिवा खूप तीव्र असतात आणि याच मनात अंत:स्फूर्ती असते, आपल्याला आपल्या हिताचा मार्ग सांगणारा एक ‘आतला आवाज’ असतो. एखादी वाईट कृती करताना हाच आवाज ती कृती ‘करू नको’ म्हणून जोरात सांगत असतो. पण प्रलोभनाने आणि व्यवहाराने बहिरे होऊन कधी आपण अशी ‘नको असणारी’ कृती केली की त्याची आपल्याला टोचणीही लागते आणि वाईट फळेही चाखावी लागतात. वाईट संगतीत राहताना आपल्याला मनातल्या मनात ही संगत सोडून द्यायला हवी हे नक्की माहिती असतं. व्यसन करणाऱ्या माणसाला नंतर अपराधी भाव येतो.
असं होऊ नये म्हणून आपण देहाने केलेल्या कृतींचा जाणीवपूर्वक वापर करून अस्थिर मनाला आवर घालू शकतो. देहाच्या विकृत आणि विकारयुक्त वागण्याने मनातही तसे विचार येऊ लागतात. आळस करणं, वाटेल तेव्हा झोपणं, जिभेवर ताबा नसणं, विषयांची अति आसक्ती असणं या गोष्टी मनाला अपायकारक ठरतात. याउलट देहाचे धर्म आणि व्यापार-व्यवहारामध्ये एक शिस्त ठेवली की मनावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. मन संतुष्ट राहतं. आनंदी राहतं.
आपलं अस्तित्व जाणीवपूर्वक अधिक समृद्ध करत नेता येतं. शिकणं हा प्रत्येकाचा स्थायीभाव आहे. पण आपण ठरवून स्वत:ला उपयोगी हितकारक आणि प्रगतीकडे नेणारं शिकणं हे आपल्याला जाणीवपूर्वकच करावं लागतं. वाईट गोष्टींकडे मनाचा कल असला तर ठरवून निश्चयपूर्वक एक एक स्वत:साठी उपयुक्त आणि हिताची असणारी गोष्ट शिकायला हवी. त्यासाठी लागणारा वेळ, श्रम आणि पैशांची उपलब्धी निर्माण करायला हवी. इथे दोन गोष्टींचे भान राखायला हवे. एक म्हणजे आयुष्य हे पर्यायाचंच असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पर्यायी विचार, पर्यायी कृती इतकंच काय पण पर्यायी भावनांचीही उपलब्धी असते. त्यापैकी जेव्हा आपण एकाची निवड करतो तेव्हा बाकी पर्याय नाकारतो. अभ्यास न करता उगीच इकडेतिकडे भटकण्याचा पर्याय आपण स्वीकारताना अभ्यास करून आपली माहिती आणि ज्ञान वाढवण्याचा पर्याय आपण नाकारत असतो. सिगरेट ओढताना सिगरेट न ओढण्याचा पर्याय आपण नाकारलेला असतो. खोटं बोलताना आपण खरं बोलण्याची संधी नाकारत असतो. निराश होताना आशावादी राहण्याचा आपण त्याग करतो. अस्वस्थ होताना मनाचा शांतपणा आपण घालवतो. इथे खरोखरच आपण कळत-नकळत निवड करतो. मग आपण जाणीवपूर्वक, सजगतेने, ठरवून आपल्याला प्रगतीकडे नेणाऱ्या, आपले स्वास्थ्य जपणाऱ्या आणि आपल्याला अधिक सक्षम करणाऱ्या गोष्टीची निवड का करायची नाही? मला माहीतेय कधी परिस्थितीचा रेटा असतो, कधी प्रसंगाचा, कधी इतर माणसांचा तर कधी आपल्यातल्याच सुखोपभोगी भावनेचा रेटा असतो. पण अशा वेळीच तर आपला कस लागतो. हिताच्या गोष्टीची निवड केल्यास कधी जास्त मेहनत करावी लागते, श्रम, वेळ, पैसा जास्त लागतो, त्रासही होतो कधी, पण विश्वास ठेवा, शेवट आपल्या चांगल्यासाठीच होतो! तात्पुरती संकटं वाटतात, परिस्थिती तात्पुरती कठीण वाटते आणि सोप्या भोग्य गोष्टी सोडून मेहनतीच्या आणि कष्टाच्या गोष्टी कराव्या लागतात. पण घसरणे नेहमीचे सोपे असते, वर चढणे कठीण असते. पण शिखरावरून जे दृश्य दिसते, जो आनंद मिळतो, जे यश आपण अनुभवतो ते आपण गडगडत गेल्यास कधीच अनुभवता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय शिकतो याचे भान सतत बाळगणे. याचे उदाहरण म्हणून लहान मुलांकडे बघायचं. मुलं अनुकरणाने खूप शिकतात. म्हणून लहान मुलांना काय आपण शिकवतो आणि घराबाहेरही ती काय शिकतात यावर पालकांची नजर असते. पण आपण मोठे होताना आणि मोठे झाल्यावर हे आपण स्वत:च करणे अपेक्षित आहे. आळशीपणा करायला आपण शिकतो तसा कामसूपणाही शिकतो. खोटं बोलणं, चोऱ्या करणं, दुसऱ्यांना वाईट वाटेल असं वागणं, घातक कृत्य करणं, व्यसन करणं या साऱ्यातून इतरांना आपण त्रास देतोच, पण सगळ्यात जास्त नुकसान आपलंच होत असतं. म्हणून जगताना प्रत्येक क्षणी आपल्या शिकण्यावर आपली नजर हवी. आपण दक्ष असायला हवं. आपण आपले व्यक्तिमत्त्व सकारात्मक, आत्मविश्वासू, लोभस आणि संपन्न असेच तर करत जातो.
आपल्याला जसं ‘वाटतं’ तसं आपण वागतो. पण मनामध्ये असंख्य भावना असतात आणि त्यांची उत्कटता वेगवेगळी असते. एकाच वेळी आपण अनेक भावनाही अनुभवू शकतो. जसं राग, आश्चर्य आणि भीती किंवा आशा आणि आनंद. या भावना सैरावैरा झाल्यास आपल्या कृतीही तशा होतात आणि अधोगतीकडे आपण जाऊ शकतो. भावनांवर नियंत्रण आणण्यासाठी शरीराची मदत घेऊ शकतो. दीर्घश्वसन, प्राणायाम, योगासने, ध्यानधारणा, नुसते काही मिनिटे शांत बसणे, नियमित व्यायाम करणे या प्रयत्नांनी आपण मनाला शांत राहण्यातली मजा अनुभवू देतो. शांत राहण्याची, संतुलित राहण्याची मनाची क्षमता यामुळे वाढते. खूप राग येत असेल तर त्याची उत्कटता आणि सातत्य कमी होते आणि आलेल्या रागातूनही आपण पटकन सावरतो. दु:ख, निराशा अपेक्षाभंग यांसारख्या नकारात्क भावनांमधूनही आपण पटकन सावरतो. मात्र हे मनाचे आणि शरीराचे व्यायाम दररोज सातत्याने केले पाहिजेत. त्यासाठी दैनंदिनीत एक वेळ ठरवावी आणि स्वत:लाही सबब न देता कृती करावी. मनाची शांत अवस्था, मनाची संतुलित अवस्था, मनाची आनंदावस्था या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत आणि रोजच्या ३० ते ४० मिनिटांच्या शरीर-मनाच्या व्यायामाने कुणीही त्या अनुभवू शकतो. मात्र धरसोड करायची नाही आणि सातत्य राखायचं.
मनाला घातक अशी एक भावना म्हणजे स्वत:ची कीव करणे. हा जन्म आपण आपल्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी घेतला आहे. त्यासाठी योग्य प्रयत्न आपण करायलाच हवेत. हे ज्यांना पटत नाही ते स्वत:ची कीव करू लागतात. परिस्थिती प्रसंग, माणसं यांना स्वत:च्या स्थितीसाठी जबाबदार धरतात. एकदा स्वत:च्या नाकामीचे, अपयशाचे खापर दुसऱ्या कशावर फोडले की आपला अहंकार इतरांकडून सहानुभूती हक्काने मागू शकतो. कुणी नाही मिळाले तर दैव, नशीब यांनाच माणसे जबाबदार धरतात. अशा वेळी स्वत:मधल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा, क्षमता नवं काही योग्य ते शिकून वाढवताही येतात. कोणतीही समस्या लहान आणि आपण मोठे हे लक्षात ठेवावे आणि समस्येपासून पळून न जाता किंवा समस्येवर गप्प न बसता ती सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. न घाबरता प्रयत्न करावेत. आवश्यकता असल्यास इतरांची मदत घ्यावी. ‘मी माझे – मला’ हा अहंकार जपणारा आणि वाढवणारा मंत्र आपण बाजूला सारला तर कितीतरी माणसं सहृदयी असतात, मैत्रीपूर्ण वागतात, सहकार्य करतात, मदतीचा हात देतात याचा प्रत्यय येतो. मात्र गरज असेल आणि संधी आली तर आपणही असे वागायला हवे. मनात धीराचे, विवेकाचे विचार ठेवले की कोणत्याही आपत्कालात टिकून राहता येते.
ईर्षां आणि अविवेकी स्पर्धा ही माणसाला नुकसानदायी ठरते. स्पर्धा स्वत:ची स्वत:शी करावी. मी पूर्वी कसा होतो – आज कसा आहे आणि पुढे कसा होणार याचे भान ठेवले की प्रगतिपथावर राहणे जमू लागते. ही पुढे जाण्याची वाट बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावी. खाचखळगे, आडमार्ग, मोहाची वळणे सारे स्वच्छ दिसते. बुद्धीच्या विवेकाने नको ते टाळता येते, तारतम्य राखून भावनांना आवर घालता येतो आणि योग्य ती कृती वेळेवर करता येते. देह-मन-बुद्धीच्या एकवाक्यतेने आपल्या वागण्यात, विचारात आणि वाटण्यात सुसंगती राहते. मग आपण सुसंस्कृत होतो. मनाचा स्वार्थ सुटला की इतरांशी आपण प्रेमाने, सद्भावनेने वागू लागतो. जगणे सोपे सरळ होत जाते. जगण्यातली छोटय़ा-मोठय़ा संकटांची आव्हाने आपण सक्षमतेने पेलू लागतो. कधी अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करतो. मनातले हीन कमी होत मन लख्ख होतं. रंग-रस-गंध यांच्यात समरसून जगताना मनाला शांत शुद्धतेचा आनंद मिळतो. ‘मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ हे तर पटतंच, पण आपल्या जगण्याचंही मोल आपण वाढवतो!
अंजली पेंडसे
manobal_institute@yahoo.co.in
(सदर समाप्त)