‘मॅग्नीफेरा इंडिका’ या झाडाचं फळ तुम्ही खाल्लं असेलच ना? हा प्रश्नच तुम्हाला कदाचित समजणार नाही. पण हे शास्त्रीय नाव आहे आम्रवृक्षाचं. आपण आंब्याकडे पाहणार ते चोखंदळपणे ताव मारणारे आस्वादक म्हणून. वनस्पतीशास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, अन्नपदार्थतंत्रज्ञ, पाककलातज्ज्ञ त्याच विषयाकडे वेगळ्या पद्धतीनं पाहणार. सम्राट अशोकाने राजमार्गाच्या दुतर्फा ही झाडे लावली होती असं इतिहासकार सांगतात.
अगदी असंच आपल्या मनाचं आहे. मानसशास्त्र (आणि त्यातील शाखा), तत्त्वज्ञान, अध्यात्म, शिक्षणशास्त्र मनाकडे आपापल्या पद्धतीनं पाहतात आणि अभ्यास करतात. वर्ण्य वस्तू एकच पण चौकटी मात्र वेगळ्या. यातील प्रत्येक मांडणी प्रमाण (Valid) असू शकते. आज आपण मनाकडे पाहणार आहोत ते पेशीविज्ञानाच्या नजरेतून. पंधरावं ते एकोणिसावं शतक हा कालखंड इथे महत्त्वाचा ठरला. तोवर शरीररचनाशास्त्र (Anatomy) अनेक सूक्ष्म तपशिलांसकट स्थिरावलं होतं. सूक्ष्मदर्शकाचा शोध आणि सुधारणा याच काळात घडल्या. त्यामुळे पेशी म्हणजे ‘सेल’ या मूलभूत एककाचा (Unit) शोध लागला. इंग्रजीतील ‘सेल’ हा शब्द ‘छोटी जागा’ याच अर्थानं आला आहे. ‘पेशीपासून पेशी निर्माण होतात’, हा शोध रुडॉल्फ फर्कोर्व्ह या शास्त्रज्ञाचा आहे. तसेच पेशींमध्ये सहकार्य आणि सामंजस्याची रचना असते, असंही त्याने सिद्ध केलं. त्यामध्ये बिघाड झाला तर आजार होतो, हा अजून एक क्रांतिकारक शोध.
रुडॉल्फ फर्कोर्व्हने पेशीविज्ञानातून मानवी समतेचं तत्त्व मांडलं आहे. सर्व मानवांचा जन्म एका पेशीतूनच झाला. विविध अवयवांमधल्या पेशी एकसारख्या असतात, दिसतात, कार्य करतात. वैद्याकीय उपचार हा प्रत्येकाचा हक्क असल्याची स्पष्ट भूमिका त्याने घेतली होती. या कालावधीनंतर शोधकांची नजर मज्जापेशीकडे वळली. मेंदूमध्ये, जाळीदार संरचना (Network system) आहे असं मानलं जात होतं. गोल्गी या शास्त्रज्ञाने पेशींना दृगोचर करण्याची ‘रंगावलोकन’पद्धती (Staining) शोधून काढली. समकालीन कॅजॉल या शास्त्रज्ञाने ती विकसित करून सूक्ष्मदर्शकातून मज्जापेशी दाखवण्याचा पराक्रम केला. मेंदूच्या सूक्ष्म चकत्यांचं अवलोकन करून त्याने काढलेली रेषाचित्रे ही आजच्या ‘स्कॅनड्’ जगातही उल्लेखनीय मानली जातात.
या पेशी काम कसं करतात यावर खल सुरू झाला. मेंदूच्या पेशी संदेशवहन करतात यावर एकमत झालं. हे संदेश म्हणजे ऊर्जा-उत्तेजना असते हेही विज्ञानाला उमजलं. त्यासाठी थेट बेडकापासूनच्या प्राण्यांच्या, स्नायू-मज्जापेशी जोडीवर प्रयोग झाले. दोन मूलभूत उत्तेजना मिळाल्या. एक होती ‘हालचाली’ची (मोटर) आणि दुसरी होती ‘पंचेद्रियज्ञाना’ची (सेन्सोरी). गेल्या दीडशे वर्षांतलाच प्रवास आहे हा सगळा.
या शोधांमुळे मज्जाशास्त्रातील अभ्यास पुढे-पुढे जाऊ लागले. त्यामध्ये आधुनिक स्कॅन यंत्रांची पुढे भर पडली. या मज्जापेशींमधूनच मानसिक प्रक्रियांचा उगम कसा होतो, यावर आता लक्ष केंद्रित झालं. हे संदेशवहन होतं ‘माहिती’चं. अधिक सूक्ष्म स्वरूपाचं. तोवर विज्ञानाची गाडी इथंवर आली होती की, मज्जापेशीमधली वाहकव्यवस्था मुळात विद्याुतजन्य (इलेक्ट्रिकल) आहे.
मज्जापेशीची मूर्त कार्ये या भूमिकेवर स्पष्ट करता येत होती. उदाहरणार्थ, अर्धांगवायू होतो तेव्हा पेशींमध्ये चेतना गेल्यामुळे संदेशवहन होत नाही. छोट्या मेंदूतली संदेशवहन व्यवस्था कोसळली, तर माणसाचा शारीरिक तोल जातो इत्यादी. मूर्त म्हणजे अशी कामे, की जी दिसतात, मोजता येतात. आपण न्यूरोलॉजिस्टकडे गेलो तर कापूस, सुई, गरम-थंड पाणी तसेच रबरी हातोडा अशी उपकरणे असतात. ते तज्ज्ञ तपासतात ‘सेन्सोरीमोटर’ बाजू. म्हणून सरळ रेषेवर चाला अशी सूचना देतात. डोळे बंद केले तर तोल जातोय का बघतात. मूर्त कार्यामधल्या बिघाडाच्या दुरुस्तीसाठी आपण न्यूरोफिजीशियन किंवा न्यूरोसर्जनकडे जातो.
डेल आणि लोवी या शास्त्रज्ञांनी आपल्या प्रयोगातून असं सिद्ध केलं की, मेंदूतील संदेशवहन जसे इलेक्ट्रिकल आहे तसंच ते रासायनिक म्हणजे ‘केमिकल’ आहे. या प्रयोगाचं चित्तथरारक वर्णन डॉ. सिद्धार्थ मुखर्जी यांच्या ‘साँग ऑफ द सेल’ या पुस्तकात सापडतं. ते लिहितात, ‘‘विचारी मज्जापेशी एकमेकींशी दोन भाषांमध्ये बोलतात. लहान मुलांच्या बडबडगीतासारखे शब्द असतात ते… इलेक्ट्रिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल!’’ पहिलं जीवरसायन-Neurotransmitter सापडलं ते होतं ‘अॅसेटाइलकोलीन’. तिथपासून आजपर्यंत १००-१२५ जीवरसायने आणि त्यांचे परस्परसंबंध यावर संशोधन होऊन स्किझोफ्रेनिया, नैराश्य, अतिचिंता, मंत्रचाळेपणा अशा मानसिक आजारांबरोबरीने कंपवात, स्मृतिभ्रंश अशा न्यूरोलॉजिकल आजारांवरची प्रभावी औषधं बनली आणि बनत आहेत.ही जीवरसायनं नेमकी कुठं काम करतात. विद्याुतशक्ती नेमकी कधी रासायनिक होते? त्यांच्यातले आदानप्रदान होतं तरी कसं? असे पुढचे प्रश्न उभे ठाकले. दोन मज्जापेशींच्या मध्ये असलेले सूक्ष्मअवकाश म्हणजे ‘सिनॅप्स’ किंवा ‘सायनॅप्स’. या अद्भुत अवकाशामध्ये जीवरसायने खेळतात. या अवकाशात विद्याुतरासायनिक प्रक्रिया घडतात, बिघडतात. पण अवकाश तसंच राहतं, करूनही अकर्तेपण घेणारे. चित्ताचे आकाश अर्थात् चिदाकाश ही संकल्पना अगदी सूक्ष्म पातळीवर ‘सिनॅप्स’च्या रूपाने तर दिसत नसेल? ‘जे पिंडी तेच ब्रह्मांडी’ हा नियम पूर्वसुरींनी सांगितलाच आहे की. मज्जापेशीच्या पापुद्र्यांवर असलेल्या स्थानकांना (Receptors) ही रसायनं भेटतात. त्यांची कार्यतीव्रता वाढवतात किंवा कमी करतात. त्या प्रमाणात मज्जापापुद्र्यांवरचे सोडियम आणि पोटॅशियमचे घनकण ( ions) बदलतात. त्यातून निर्माण होते विद्याुतशक्ती. ती जाते पुढच्या पेशीमध्ये. मेंदूचा नकाशा म्हणजे जगाचा नकाशा असं क्षणभर मानूया. आपण जागतिक बातम्या पाहत आहोत. काही युद्धे धुमसत आहेत. कुठेतरी राजकीय समझोते होत आहेत.
काही ठिकाणी उत्सव, तर कुठे संहार. कुठे खेळांचा थरार तर कुठे वन्यजीवनावरचे हल्ले…असाच बहुरंगी खेळ मेंदूमध्ये सुरू असतो. विचार, भावना, संवेदना, स्मृती, बुद्धी, प्रेरणा, तारतम्य, विवेक, जागृती यांची विद्याुतरासायनिक समीकरणे सुरू असतात. जीवरसायनांचे अगणित आकृतिबंध रेखाटत असतात मनाची ‘अमूर्त’ व्याख्या! या वर्णनात उल्लेख केलेल्या मनाच्या संस्था म्हणजे मज्जापेशीची ‘अमूर्त कार्ये’ होत. या कार्यसमुच्चयालाच म्हणतात मन! म्हणजे कोट्यवधी मज्जापेशींच्या कार्यामध्ये मूर्त आणि अमूर्त (Abstract) अशी दोन्ही कार्य राहातात. शरीर आणि मनामधल्या अभेदाची ही पेशीपातळीवरची सुरुवात आहे. पंचेंद्रियज्ञान म्हणजे ‘सेन्सेशन्स’ आणि संवेदना म्हणजे ‘परसेप्शन्स’ कशी एकजीवपणे नांदतात ही कार्ये पाहूया. वस्तूपासून निघणारे प्रकाशकिरण डोळ्यांच्या भिंगाला पार करत दृकपटलावर प्रतिमा उमटवतात. ही प्रक्रिया सर्व मानवांसाठी एक. पण ‘काय सुंदर आहे’ ही आहे संवेदना. म्हणूनच तर म्हणतात की, सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत आहे. कानावर पडणाऱ्या ध्वनिवलयांची तीव्रता ‘डेसिबल्स्’मध्ये मोजता येते. पण संगीताची व्याख्या सांगणारी ‘ऑडिओमेट्रिक’ तपासणी नाही. मन आणि मेंदू असे एकजीवपणे काम करत असतात. म्हणून तर पदार्थाच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटतं आणि भयकथा पाहताना अंगावर काटा येतो. भीती वाटली की येतो तो काटा. प्रेमाच्या स्पर्शाने येते ती शिरशिरी. उठतात ते रोमांच! वास्तविक शारीरिक क्रिया एकच आहे. भावना मात्र वेगळी. हेच सामंजस्य मनाच्या विविध संस्थांमध्येही असतं. विचार, भावनेची सुसंगती असली तर वर्तन लयबद्ध होतं. स्मृतीला बुद्धीची साथ मिळाली तर अभ्यास पटकन संपून जातो.
कोट्यवधी मज्जापेशींमध्ये असणाऱ्या असंख्य अशा सिनॅप्सेस्, सगळ्या एकत्र उत्तेजित झाल्या, तर आफतच यायची. मज्जापेशींच्या भोवताली त्यांच्या दहापट संख्येने असतात ‘ग्लायल सेल्स्’( Glial cells) या पेशींना म्हणतात मेंदूउद्यानातील माळी. ते अयोग्य ‘सिनॅप्सेस’ची छाटणी करतात (Pruning). आपण ‘शिकत जातो’ त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे अतिरिक्त उत्तेजना काढून अनुरूप असे मज्जामार्ग विकसित करत जाणं. उत्क्रांतीजन्य विज्ञान सांगतं की, स्वहिताबरोबर परहित साधणारे मार्ग विकसित करणे म्हणजे माणसाचा व्यक्तित्वविकास. हे काम ‘ग्लायल पेशी’ करतात. त्यांना आपण आवरणपेशी असे नाव देऊ. या आवरणपेशींचं काम प्रत्येक वेळी ‘योग्य’ होतंच असं नाही. छाटणी न झाल्यामुळे सूक्ष्मअवकाश उत्तेजना अतिस्वरूपात येतात. स्किझोफ्रेनिया आणि स्वमग्नता या अवस्थांच्या मुळाशी ही प्रक्रिया असली पाहिजे. कधी कधी अधिक छाटणी झाली, तर नैराश्य आणि स्मृतिभ्रंश याची प्रक्रिया सुरू होते. मेंदूच्या नेमक्या भागांमध्ये या क्रिया सतत सुरू असतात. आता या आवरण पेशींवर जगभर संशोधन सुरू आहे. भविष्यातही मनमेंदू क्षेत्रातली औषधं या पेशींवर काम करणारी असू शकतील.
विद्याुत रासायनिक प्रक्रियांवरचं संशोधनही ऐन भरात आलं आहे. माहितीचं पृथ:करण करणाऱ्या मज्जापेशींचे संघ हे पेशीपातळीवर कधी जलद म्हणजे जोमदार उत्तेजनेनं कार्यरत होतात. तर कधी ते मंदगतीनं चालतात. नैराश्याच्या आजारावरील संशोधनाला यामुळे गती मिळाली आहे. मज्जापेशींच्या पापुद्र्यांवरचे ‘ DARPP-32’ नावाचं एक प्रथिन निराशा आणण्याचं आणि टिकवण्याचं काम करते असं आढळून आलं. या प्रथिनाचं प्रमाण अनुवंशिकता ठरवतं.
डिप्रेशन म्हटलं की, सिरोटोनीन नावाच्या जीवरसायनातला ‘केमिकल लोचा’ असं स्पष्टीकरण असतं. पण हे प्रथिन ‘डोपॅमाइन’ नावाच्या उल्हासी जीवरसायनावरही परिणाम करतं असं दिसून आलं. थोडक्यात असं की, सर्व जीवरसायनांच्यादेखील संरचना आणि आकृतिबंध आहेत. डिप्रेशन येणं या प्रक्रियेचे पेशीच्या पातळीवरसुद्धा अनेक पदर आहेत.
रासायनिक बाजूने मनमेंदूच्या समस्यांची उत्तरं शोधणाऱ्या औषधोपचारांमध्ये भर पडतेच आहे. ‘विद्याुत’ या बाजूने काही उपचार पारंपरिक पद्धतीनं सुरू होतं. विद्याुत- उपचारपद्धती अर्थात् ‘ईसीटी’ अर्थात बदनामीकारक शॉक ट्रीटमेंट, ही पद्धती जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याला पेशीविज्ञानाचा पाया नव्हता. डॉक्टरांच्या अचूक निरीक्षणामधून ही पद्धत जन्मली. डिजिटल तंत्रज्ञान वापरून क्षणिक आणि निर्धोक विद्याुतऊर्जा विशिष्ट पद्धतीने मेंदूला दिल्यास जो फायदा होतो त्यावर आता मज्जापेशींवर आधारित शास्त्रीय पाहण्या उपलब्ध झाल्या आहेत. मज्जापेशींच्या पदरांवर होणारे विद्याुतरासायनिक बदल आता जाणून घेता येतात. या संशोधनाचा सूर असाच आहे की विशिष्ट मनोविकारांमध्ये विशिष्ट टप्प्यांवर ही उपचारपद्धती आजही प्रभावीपणे वापरता येते. मज्जापेशींच्या अभ्यासाचा थेट रुग्णाच्या बरे होण्याशी संबंध आहे तो हा असा.
मेंदूच्या पेशींच्या चयापचय क्रियेवर म्हणजेच ‘मेटाबॉलिजम’वर (Metabolism) होणारा परिणाम अत्याधुनिक गतिशील स्कॅनर्स आपल्याला सप्तरंगी आलेख काढून दाखवू लागले आहेत. वेगवेगळ्या भावस्थितींचे थेट मेंदूचित्रण आता शक्य झालं आहे. विविध भावनांच्या उगमाचे आणि आवाक्याचे मेंदूनकाशेही उपलब्ध झाले आहेत. एकेकाळी अतिधूसर दिसणाऱ्या मनाची, वैज्ञानिक समज दरवर्षी वाढत चालली आहे आणि तरीही डॉ. रुडॉल्फ फर्कोर्व्ह म्हणतात त्याप्रमाणे, ‘स्वत:च्या अज्ञानाची जाण म्हणजेच ज्ञान’ हे वाक्यही चार शतकांनंतर तितकंच लागू आहे.
‘जेथ शांताचिया घरा,अद्भुत आला आहे पाहुणेरा’ असं ज्ञानदेव म्हणतात. निसर्गाने तयार केलेला मनमेंदूच्या संतुलनाचा शांतरस आणि त्यात संशोधकांच्या कुतूहलातून उत्पन्न झालेला अद्भुतरस आपल्यासमोर एका पेशीच्या माध्यमातून विश्वरूपाचंच दर्शन घडवत आहे. त्याला मन:पूर्वक वंदन.
anandiph@gmail.com