सुष्मा देशपांडे
‘‘आश्रमात राहणाऱ्या मुलीची समलिंगी संबंधावर आधारित ‘उंबरठा’ चित्रपटातली माझी व्यक्तिरेखा रसिकांच्या आजही लक्षात आहे. त्यानंतरही तशा प्रकारच्या, पण वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या. शबनम सुखदेवचा ‘टेलिफोन’, अरुण फुलाराचा ‘माय मदर्स गर्लफ्रेंड’, मनोज थोरात दिग्दर्शित ‘भ्रम’. त्यानंतर २०२३ मध्ये सिद मेनन या भारतीय तरुणाने ‘द लिटील बीट ऑफ ग्लिटर’ लघुपटासाठी भारतातून मला लंडनला बोलावून घेतलं. या सर्व भूमिका साकारताना आपल्या जगण्याचाच भाग असलेली, तरीही आपल्यापासून दूर असलेली ही मुलं सहजपणे मनात खोल स्थिरावत गेली.’’
का ही दिवसांपूर्वी पुण्यात मी रिक्षासाठी थांबले होते. रिक्षा थांबली आणि एक तरुण मुलगी रिक्षातून उतरली, मी त्याच रिक्षात चढत असताना तिने वळून मला विचारलं, ‘‘तुम्ही ‘उंबरठा’ चित्रपटात काम केलं आहे ना?’’ मी हसून होकार देताच, तिचे डोळे आनंदले. आनंदात ती तशीच बरंच काही बोलत राहिली… १९८२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला, मात्र तेव्हापासून आजवर गेल्या ४३ वर्षांत अनेकांनी मला हा प्रश्न विचारला आहे. खरं पाहता खूपच गाजलेल्या या चित्रपटात मी एक छोटीशी भूमिका केली होती. मात्र लोकांच्या ती कायमस्वरूपी आठवणीत राहिली.
‘उंबरठा’ चित्रपटासाठी आश्रमात राहणाऱ्या मुलींच्या भूमिकेसाठी अनेक मुली हव्या होत्या. माझ्याशी ओळख असल्याने डॉ. जब्बार पटेलनं त्यातील समलिंगी संबंध असलेल्या मुलींपैकी एकीची भूमिका करशील का? असं विचारलं. मी नुकतीच काविळीच्या आजारातून बरी झाले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे खाण्याची पथ्यं खूपच होती. त्यामुळे ‘जमणार नाही’, असं मी नम्रपणे सांगितलं. ‘थिएटर अकॅडमी’ची धुरा सांभाळणारे अण्णा राजगुरू यांच्यावर निर्मिती व्यवस्थेमधील काही जबाबदारी असावी. अण्णांनी त्यांच्या पद्धतीने माझा पिच्छा पुरवायला सुरुवात केली. मध्येच जब्बारही विचारत असे. पण तब्येत महत्त्वाची, हे डोक्यात घट्ट असल्याने मी कळवळून सांगायचे, ‘‘अवघड आहे मला जमणं.’’ जब्बारने एकदम माझ्या वडिलांनाच माझ्याशी बोलायला सांगितलं. पपा मला म्हणाले,‘‘तो इतका मागे लागला आहे. तू नाही का म्हणत आहेस?’’ ‘‘पपा, काविळीची पथ्यं आहेत.’’ मी अस्वस्थ होऊन म्हणाले. तर पपा म्हणे, ‘‘डॉक्टर आहे तो. सांग त्याला पथ्याचं, तो घेईल काळजी.’’ मग मी, मला मसाल्याचे कोणतेच पदार्थ खायचे नाहीत… वगैरे वगैरे बरंच काही सांगितलं. जब्बार म्हणे, ‘‘राहण्यापासून सर्व सोय ‘पूनम हॉटेल’मध्येच आहे. तू ये.’’ माझा मुक्काम ‘हॉटेल पूनम’मध्ये सुरू झाला. पथ्याचं खाणं आणि दिवसभर चित्रीकरण स्थळी जायला सुरुवात झाली.
आम्ही ‘आश्रमातल्या मुली’ दिवसभर चित्रीकरणस्थळी असायचो. फक्त गप्पांचा कार्यक्रम… एकूण टाइमपास चालू असायचा. न राहवून एकदा आम्ही मुलींनी विचारलंही, ‘‘चित्रीकरण नाही तर असंच किती दिवस यायचं आहे?’’ यावर निर्माते राव गमतीत म्हणाले, ‘‘जब्बारने लग्नाचं जेवण दिलं नव्हतं, ते आता देत आहोत.’’ आज वाटतं, हे इतकं सहज नसावं. आश्रमातल्या मुलींचा वावर सहज आणि स्वाभाविक व्हावा म्हणून असं ठरवलं असावं का?
चित्रीकरण सुरू झालं. स्मिता पाटील मुख्य भूमिकेत होती. सगळ्यांशी खूपच मिळून-मिसळून वागायची. आश्रमातल्या प्रत्येक मुलीची स्वतंत्र गोष्ट होती आणि या सगळ्या गोष्टी अंगावर येणाऱ्या होत्या. विजय तेंडुलकर यांनी हा चित्रपट लिहिला आहे. तेंडुलकर आणि जब्बार यांच्या चर्चेतून आश्रमातील मुलींची पात्रे ठरली असावीत. त्या लिहिलेल्या भागाचे कधी कधी चित्रीकरणस्थळी वाचन होत असे. एक गरोदर लहान मुलगी, एक कुठेही चढून बसणारी वेडी- तिला सुरक्षित खाली आणताना उडणारा गोंधळ, एक तर बाळाला जन्म दिल्यानंतर आश्रम सोडायला लागू नये म्हणून त्या बाळालाच मारून टाकणारी तरुणी. मला आठवतं, त्यातल्या एकीचे केस कापलेले होते, ते दाखवण्यासाठी तिला त्रास देण्यासाठी तिचे केस घरच्यांनी कापले, असं दाखवलं गेलं होतं. त्यात मी आणि संध्या काळे, समलैंगिक संबंध असणाऱ्या आम्हा दोघींची गोष्ट.
प्रत्येकीची गोष्ट चित्रित होताना पाहायचं आकर्षण वाटायचं. मला आजही दोन मुली आश्रमात स्वत:ला पेटवून घेतात, या दृश्याचं चित्रीकरण आठवतं. पेटलेल्या मुलींचं चित्रीकरणाचं तंत्र पाहण्याची उत्सुकता सगळ्यांना होती. आमच्या नात्याविषयी चित्रित झालेल्या दृश्यातही काही तरल दृश्ये होतीच. एका दृश्यात आम्हाला त्रास देणाऱ्या मुली माझ्या अंगावर गरम गरम आमटी ओततात त्यामुळे ‘ती’ अस्वस्थ होते, सारखे प्रसंग होते. एका रात्री आम्ही गुपचूप उंच इमारतीच्या गच्चीत
एकमेकींच्या मिठीत आहोत, असा प्रसंग चित्रित करत होतो. रात्रीची सुमारे अडीच-तीनची वेळ असावी. अचानक स्मिता स्वत: कॅमेरा घेऊन तिथे आली. ‘‘तू का आली आहेस आत्ता?’’ असं विचारल्यावर, ‘‘मला यांचे फोटो काढायचे आहेत’’असं म्हणत तिने आमचे अनेक फोटो काढले.
‘चांद मातला मातला, त्याला कशी आवरू?’ गाण्याचं चित्रीकरण चालू होतं. जयमाला इनामदारने ते नृत्य बसवलं होतं. अनेक जणी त्या नृत्यात होत्या. माझी जोडीदार संध्या गाणं गात होती. नृत्य संपलं, दिग्दर्शकाने मला सूचना दिल्या… मी दुरून चालत, ओतप्रोत प्रेमाने तिच्याकडे पाहात असते. मनातल्या मनात तिच्या कौतुकाचं किंचित हसू चेहऱ्यावर असतं. सुचनाबरहुकूम मी संध्याकडे पाहात होते. चित्रीकरण संपलं. तो माझा चित्रीकरणाचा शेवटचा दिवस होता.
निघण्यापूर्वी न राहवून मी जब्बारला म्हटलंच, ‘‘इतकंच करायचं होतं कॅमेऱ्यासमोर तर, एवढं माझ्या मागे लागायचं काय कारण होतं?’’ जब्बारने माझ्या डोक्यावर टपली मारली आणि हसून म्हणे, ‘‘मूर्ख आहेस तू. तू हे
हवं तसं करशील माहीत होतं.’’ अनेक जणी ही भूमिका करू शकत होत्या, मीच का? असा विचार करतच मी तिथून निघाले.
‘तुला टेन्शन नाही आलं ही भूमिका करायचं?’, ‘बाप रे, आपण मोठ्या पडद्यावर ‘लेस्बियन’ म्हणून दिसणार, याबद्दल काय आलं होतं मनात?’ या अर्थाचे खूप प्रश्न आजवर अनेकांनी विचारले आहेत. माझ्या दिग्दर्शकाला याचा अंदाज होता बहुधा, हे जाणवतं राहतं. ‘सुषमा धीटच आहे.’ हेही अनेकदा ऐकायला मिळालं. मी मात्र, माणसासारख्या माणसाची भूमिका करणं यात धैर्य ते काय! असं म्हणत राहते. अगदी माझे आई- पपासुद्धा कधी या भूमिकेवरून मला काही बोलले नाहीत, हे लक्षात येतं. आज डॉ. जब्बार पटेल यांचे ही भूमिका दिल्याबद्दल जाहीर आभार मानावेसे वाटतात.
यानंतर १९९४ मध्ये शबनम सुखदेवने (तेव्हाची शबनम चोप्रा) ‘एफटीआयआय’च्या डिप्लोमा फिल्मसाठी ‘‘माझ्या चित्रपटात काम करणार का?’’ विचारलं. तिला माझं नाव कोणी सुचवलं हे माहीत नाही. एका ‘होम’मधली ‘लेस्बियन मेट्रन’ची भूमिका होती.
चित्रीकरणाच्या तारखांबद्दल बोलणं झालं आणि अचानक मला पत्रकारितेतलं व्यावसायिक काम आलं. या कामामुळे मला काम करणं अवघड आहे, असं मी शबनमला कळवलं. तर शबनम घरीच आली, ‘‘ यू कान्ट डू धिस टू मी,’’ म्हणत ‘अग्रेसिव्ह’च झाली. तिची अस्वस्थता, तिचा ताण पाहून ‘‘आपण ठरवूया कसं करता येईल ते.’’ म्हणत त्याच तारखांना कसं जमवता येईल याचा विचार केला. तिचं विद्यार्थांना दिलेल्या तारखा बदलणं खूप अवघड होतं, हे समजून घेणं गरजेचं वाटलं.
त्या ‘टेलिफोन’ या चित्रपटामध्ये किटू गिडवानी, दिव्या भाटिया, अभय कुलकर्णी काम करत होतो. ही मेट्रन या मुलीला (किटूला) घेऊन जात असताना किंवा तिला डांबलेले असते त्या खोलीत तिला शारीरिक त्रास देते, अक्षरश: बलात्कार करते अशी दृश्ये होती. माझ्यासाठी एकूणच हा चित्रपट अवघड होता. आजही हा लघुपट पाहिलेले भेटले तर कित्येक जण अवाक् होऊन बोलतात. हीच फिल्म शबनमने पुन्हा ‘स्टार टीव्ही’साठी केली. त्याचे पैसे मिळाले, पण कामाची मजा आली नाही.
२०२१मध्ये मी ‘My Mother’s Girlfriend’ या लघुपटामध्ये लेस्बियनची भूमिका केली. अरुण फुलारा या मित्राने ती लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे. अरुणच्या मते, ती लिहीत असतानाच त्याच्या डोक्यात मी होते. त्याने त्या पात्राचे नावही सुषमा ठेवलं होतं. पुढे ते बदललं. अंजू आल्वा ही बंगळूरुची गुणी अभिनेत्री माझ्या सखीच्या भूमिकेत आहे. सुहास शिरसाट माझ्या मुलाच्या भूमिकेत आहे. कॅमेऱ्यावर होती रंगोली अग्रवाल. यात दोघींचे मिठीतले, एकत्र प्रेमाचे दृश्य होते. रंगोली, अरुण, मी आणि अंजू एवढेच हे दृश्य साकारताना खोलीत होतो. चित्रीकरणापूर्वीच्या तयारीतच अंजूने सहजतेनं वातावरण हलकं केलं होतं त्यामुळे चित्रीकरणही सहज झालं. करोनाची साथ संपता संपता याचं चित्रीकरण झालं होतं. या लघुपटाची खूप चर्चा झाली. खूप नावाजली गेली. अनेक अनोळखी लोक आजही समाज माध्यमावर ‘मेसेज’ करतात. संपर्क साधतात.
याशिवाय आणखी दोन लघुपट केले. २०१५ मध्ये मनोज थोरात दिग्दर्शित ‘भ्रम’मध्ये मी ‘गे’ मुलाची आई होते. जिने आपला मुलगा ‘गे’ आहे, हे स्वीकारलं आहे, मात्र मुलाच्या जोडीदाराची जात समजताच ती मुलाचं नातं नाकारते. तर २०२३ मध्ये सिद मेनन या भारतीय तरुणाने त्याच्या ‘लंडन फिल्म स्कूल’च्या डिप्लोमा लघुपटासाठी भारतातून मला लंडनला बोलावून घेतलं. मूळची भारतीय असलेली साधं, सरळ आयुष्य जगणारी विद्या, पती गेल्यावर एकटी राहात असते. ती एका ‘गे’ मुलाला खोली भाड्याने देते. भावाला ती फसवली जाईल असं वाटत असतं म्हणून भाऊ तिचे निर्णय घेऊ इच्छित असतो. शेवटी भावाचं न ऐकता विद्या ‘एलजीबीटीक्यू परेड’ला जाते. या भूमिकेच्या मेकअपसाठी इटालीची मुलगी होती, डीओपी (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी) होती एक व्हिएतनामी मुलगी. काही मुलं युनायटेड किंगडममधली. कमाल शिस्त आणि वेगळीच ऊर्जा तिथे अनुभवली. त्यानंतर ‘एलजीबीटीक्यू’ गटासह केलेल्या नाटकाविषयी पुन्हा कधी तरी…
आपल्या जगण्याचाच भाग असलेली, तरीही आपल्यापासून दूर असलेली ही मुलं सहजपणे मनात खोल स्थिरावली. कला, साऱ्यांचं जगणं आपल्यात सामावून घ्यायचा मार्ग दाखवते, हे सत्य तंतोतंत पटत गेलं.