९ दुर्गांचा सत्कार… त्यांना वाद्यांच्या सुरावटीनं मानवंदना देणाऱ्या ९ स्त्रीवादक… साथीला बासरी, कीबोर्ड, सॅक्सोफोन, लीड गिटार, काँगो ढोलक, ऑक्टोपॅड, तबला, व्हायोलिन, हार्मोनियम अशा ९ वाद्यांचा अप्रतिम वाद्यावृंदीय आविष्कार… सुरांनी बहरलेलं वातावरण… हिंदी-मराठी गाण्यांच्या सुमधुर सुरावटीचा गोफ लीलया विणत या स्त्री कलाकारांनी सादर केलेला कमाल ऊर्जा देणारा कार्यक्रम… जोडीला टाळ्या, ‘वन्स मोर’ने भारलेलं सभागृह. ‘पंचतुंड नररुंड मालधर…’ या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नांदीनं कार्यक्रमाची चैतन्यभारित सुरुवात झाली आणि हा सारा अनोखा मेळ जुळून आल्यानं रसिक अक्षरश: स्तिमित झाले. त्याच वेळी मराठी साहित्यवैभव इंग्रजीत आणणाऱ्या, पत्रकारिता, मराठी-इंग्रजी अनुवाद, चित्रपट-कला समीक्षा, कादंबरी लेखन या सर्वच क्षेत्रांत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या… ज्यांच्या साहित्यकर्तृत्वाचा अभिमान वाटावा अशा शांता गोखले यांचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार देऊन केलेला सन्मान! हा सारा आठवणींच्या कुपीत जपून ठेवावा असा अनुभव प्रेक्षक, मान्यवरांनी घेतला. निमित्त होतं- लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२५!

आयुष्यातली नवनवीन आव्हाने पेलून समाजाला प्रगत-प्रगल्भ दिशा देणाऱ्या, समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या स्त्रीशक्तीचं कौतुक करणाऱ्या या सोहळ्याचं यंदाचं बारावं वर्षं. अर्थात नऊ स्त्रियांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाला वंदन करणाऱ्या या सोहळ्याची तपपूर्ती. यानिमित्त कर्णमधुर बासरीवादनाने खुललेले सूर, सॅक्सोफोनचा ठेका, ढोलकीवरची थाप आणि विविध वाद्यांच्या सुरावटींनी भारलेला… स्त्री कलाकारांच्या कलाविष्कारासह साजरा झालेला हा स्त्रीशक्ती सन्मान सोहळा उपस्थित साक्षीदारांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभव देणारा ठरला.

‘लोकसत्ता चतुरंग’च्या फीचर्स एडिटर आरती कदम यांनी आपल्या प्रस्तावनेत ‘दुर्गा पुरस्कारा’च्या मानकरी ठरलेल्या दुर्गांच्या निवड प्रक्रियेविषयी सांगितलं की, ‘‘गेल्या १२ वर्षांत १०८ दुर्गांचा सन्मान या व्यासपीठावरून झाला त्याचा मनस्वी आनंद आहे. यंदाच्या या दुर्गांमध्ये आर्थिकदृष्ट्या ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ दोन्ही वर्गांतील दुर्गा आहेत. ‘आहे रे’ गटातल्या दुर्गांनी स्वत:ची रेषा उंच करत उच्च शिक्षण घेतलं. संशोधक, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक पदावरून असे शोध लावले की राज्याला, देशाला त्याचा उपयोग व्हावा. डॉ. मंजिरी पांडे, डॉ. आरोही कुलकर्णी, डॉ. बीना नायर, डॉ. स्वप्नजा मोहिते. या एकीकडे तर दुसरीकडे ‘नाही रे’ वर्गातल्या न थांबणाऱ्या दुर्गा. माडिया आदिवासी जमातीतल्या भाग्यश्री लेखामी स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर पहिल्यांदा गावात एसटी आणते तेव्हा ग्रामस्थांच्या डोळ्यातून पाणी का आलं असेल ते आपल्याला समजू शकतं. रामोशी या गुन्हेगारीचा ठप्पा आजही पुरेसा पुसता न आलेल्या जमातीत जन्मलेल्या वैशाली भांडवलकर, या १५ गावांतल्या जातपंचायतीचा जाच कायमचा दूर करतात तेव्हा त्या धाडसाला वंदन करणं एवढंच आपल्या हाती असतं. या सगळ्यांच्या योगदानाबद्दल समाज म्हणून आम्ही आभारी राहूच.’’

त्यानंतर झालेल्या पाच दुर्गांच्या सत्कारानंतर पुन्हा एकदा ९ स्त्री वादकांनी रसिकांना सुरांच्या माध्यमातून संगीताची सैर घडवून आणली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कारा’विषयी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर म्हणाले, ‘‘आम्हाला दैनंदिन कामातून ऊर्जा मिळण्यासाठी काही उपक्रम असतात, ‘दुर्गा पुरस्कार’ हा त्यापैकीच एक आहे.’’ विपरीत परिस्थितीत आशा न सोडता सातत्यानं काम करत राहिलेल्या, पुरस्कारासाठी निवड झालेल्या दुर्गांचं त्यांनी कौतुक केलं. तसंच ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्काराच्या मानकरी शांता गोखले आणि या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी ‘लोकसत्ता’चे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शांता गोखले यांच्या लिखाणाबद्दल ते म्हणाले की, ‘‘ समीक्षा लेखन करणाऱ्यांना सहसा ललित लेखन करणाऱ्यांविषयी ममत्व नसतं परंतु शांताबाईचं ललित लेखनही तितकंच चांगलं आहे. मराठीची त्यांची अशी छान, स्वतंत्र शैली आहे. त्यात मराठीपण आहेच पण त्या इंग्रजीत लिहितात तेव्हा इंग्रजीचा बाज घेऊन लिहितात. त्यांचा आवडलेला गुण म्हणजे त्यांच्या दोन्ही इंग्रजी आणि मराठी लिखाणातला समान धागा आहे, तो ‘मिस्किलपणा’चा.’’

या सत्कार सोहळ्यात भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमासाठी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या डॉ. मंजिरी पांडे, सूक्ष्म जैवतंत्रज्ञानातून ऊर्जानिर्मिती करणाऱ्या डॉ. आरोही कुलकर्णी, मोहरी आणि जवसाचं नवं वाण तयार करणाऱ्या डॉ. बीना नायर, मासेमारी, खारफुटी जंगल, कांदळवनांचे संवर्धन करणाऱ्या डॉ. स्वप्नजा मोहिते, देवराया आणि खासगी जंगले संरक्षित करून पर्यावरणाला हातभार लावणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले तर माडिया आदिवासी समाजातल्या लोकांना स्वातंत्र्याने दिलेल्या मूलभूत सोयीसुधारणा ७६ वर्षांनंतर देणाऱ्या भाग्यश्री लेखामी, धीवर समाजातल्या ७५ तलाव पुनरुज्जीवित करणाऱ्या, मासे उत्पादन वाढवून स्त्रियांना आर्थिक रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या शालू कोल्हे, भटक्या विमुक्त जमातीत जन्मलेल्या मुलांसाठी शिक्षणाचे दार खुले करणाऱ्या, १५ गावांतल्या जातपंचायतीचा जाच कायमचा मोडून काढणाऱ्या वैशाली भांडवलकर, दारिद्र्य, भेदभाव यांच्या दुष्टचक्रात अडकलेल्या १६ लाख स्त्रियांमध्ये ‘माविम’च्या माध्यमातून आत्मभान निर्माण करणाऱ्या कुसुम बाळसराफ या ९ स्त्रियांचा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी सांगितलं, ‘‘दुर्गाशक्ती’च्या प्रतीक ज्या स्त्रियांना इथं पुरस्कृत केलं, त्या सर्वांना मी सलाम करते. ‘दुर्गाशक्ती आयी है, नई रोशनी लायी है।’ या कार्यक्रमामध्ये ज्याची अपेक्षा नव्हती असं सुंदर मनोरंजनही झालं. आज धार्मिक आणि सांस्कृतिक यांचं समन्वयाचं चित्र आपण देशभरात पाहतो. परंतु इथे फार सुंदर प्रकारे आपली कलाकुसर, आपली क्षमताही या कलाकार दुर्गांनी आपल्याला दाखवली. या धरातलावर काम करणाऱ्या दुर्गा आहे, त्यांना पुरस्कार देणं म्हणजे आपणच पुरस्कृत होणं असं असतं, म्हणून इथे यायचं मी कबूल केलं. केवळ ८ मार्च या आंतराराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी स्त्रियांचं नाव उजळायचं, त्यापेक्षा आम्ही म्हणतो, ‘हर दिन महिला दिन’. ‘दुर्गा पुरस्कारा’चा १२ वर्षांचा कार्यकाळ त्यांनी सुरू ठेवला आहे, त्यातून एक संदेश देण्याचं कार्य ‘लोकसत्ता’ परिवार करत आहे, याबद्दल त्यांचं अभिनंदन.

पुरस्कारप्राप्त नऊ ‘दुर्गां’च्या कार्याची महिती देणाऱ्या ध्वनिचित्रफिती या वेळी दाखवण्यात आल्या. शिवाय ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२५’च्या मानकरी, अभिजात आणि आधुनिक साहित्याला जागतिक साहित्य क्षेत्राचं दार व्यापक करणाऱ्या शांता गोखले यांचं अतुलनीय कार्य ध्वनिचित्रफितीद्वारे उपस्थितांना पाहता आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ज्येष्ठ लेखिका, अनुवादकार शांता गोखले यांनी आपल्या मनोगतात नऊ दुर्गा आणि वादक कलाकार स्त्रियांच्या कामगिरीचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, ‘‘मेधाताई, उन्हातान्हात काम करतात, हे वाचूनच आम्हाला थक्क व्हायला होतं. माझ्यात किती गोष्टी नाहीत, याची जाणीव आज झाली. असे सांगून त्यांनी नऊ वादक कलाकार स्त्रिया एकमेकींना साथ करत वाद्या वाजवतात. त्यांच्या वादनात त्या आनंद घेत आहेत, आणि दुसऱ्यांनाही देत आहेत तसेच या नऊ स्त्रिया मिळूनमिसळून काम करतात याचा हेवा वाटला. त्यांच्यासमोर लोक असतात तसं लिहिताना वाचक समोर नसतो, कोण वाचतंय हेही माहीत नसतं, म्हणून पुस्तक आवडल्याचा कोणी ई-मेल केला तरी मी एकटीच उठून नाचते.’’ असंही त्या गमतीनं म्हणाल्या.

सूर, वाद्या आणि संगीतकारांचं नातं उलगडून दाखवत आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं कुणाल रेगे आणि डॉ. श्वेता पेंडसे यांनी. पुरस्कार कार्यक्रमाची संहिता लिहिली होती ‘लोकसत्ता’च्या विशेष प्रतिनिधी चारुशीला कुलकर्णी यांनी.

सत्कार करण्यात आलेल्या यंदाच्या प्रत्येक ‘दुर्गा’ म्हणजे पणतीच. त्या स्वत:च्या कार्यतेजाने उजळत समाजातल्या भेदभावरूपी अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यक्रम संपताना त्यांच्या या कार्याने स्तिमित झालेल्या प्रेक्षकांचे चेहरेही त्या प्रकाशाने उजळले होते.

मुख्य प्रायोजक – ग्रॅव्हिटस फाउंडेशन

सहप्रायोजक – टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड, वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स, मे. बी. जी. चितळे डेअरी, केसरी टूर्स, पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, व्ही एम मुसळुणकर ज्वेलर्स, ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड

पॉवर्ड बाय – डीडीएसआर ग्रुप, चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृह आणि एम सी एच आय ठाणे रास रंग

टेलिकास्ट पार्टनर – झी २४ तास

namita.warankar@expressindia.com