ऐतिहासिक महत्त्व लाभलेलं मंठा तालुक्यातलं हेलस हे गाव.. शंभर वर्षांपूर्वीचा तो काळ.. गावाचं गावपण टिकून असलेलं.. तसं माणसाचंही.. पावसाळा संपत आलेला असतो.. शेतीची कामं आता अगदी शेवटच्या टप्प्यावर असतात.. ती संपत आली की गणपती उत्सवाचे वेध लागायला सुरुवात होते.. गणेश चतुर्थी अगदी काही दिवसांवर आलेली असते. सगळ्यांच्या घरात गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली.. पुढचे दहा-पंधरा दिवस फक्त श्रीच्या उत्सवाचे.. आणि मग एके सकाळी.. झुंजुमुंजु झालेल्या अतिप्रसन्न वातावरणी घुंगराच्या माळा वाजू लागतात.. एकेक बैलगाडी गावात दाखल होऊ लागते.. प्रत्येक जण घराबाहेर डोकावू लागतं.. ‘कोण आलं’ची उत्सुक नजर मग गाडीतल्या ‘तिला’ सुखावून टाकते.. बैलगाडी कुणाही घरासमोर थांबलेली असो.. गावातल्या प्रत्येकाला ‘तिच्या’ आगमनाचं कौतुक असतं.. चौकशी-विचारपूस होत राहते.. ती असते त्या गावातली माहेरवाशीण.. खास गणेश उत्सवासाठी आलेली.. वर्षांतून बहुधा एकदाच.. गावच्या प्रेमाने भारावलेल्या, मायेनं जडावलेल्या ‘तिचे’ डोळे आपसूक वाहू लागतात आणि ‘ती’ अलगद आईच्या कुशीत विसावते..
जालना जिल्ह्य़ातील आणि मंठा तालुक्यातील प्राचीन (पालथी) नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेलस या गावाचं हे चित्र गेली १२५ वर्षे अखंडपणे तिथल्या माहेरवाशिणींसाठी हृदयी जपलेला ठेवा बनलेलं आहे. हेमाडपंथी शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्री पंत यांचं हे गाव असल्याने आपसूकच या गावाला ऐतिहासिक मूल्य लाभलेलं आहे. येथील हेमाडपंथी मंदिरे म्हणजे स्थापत्यकलेची अनमोल ठेव होत. गावाच्या मधोमध असणारे गणेशाचे मंदिर व त्यातील तीन फूट उंचीची गणपतीची मूर्ती हेच गावाचे ग्रामदैवत. पूर्वाभिमुख स्वयंभू मूर्ती भक्तांच्या, माहेरवाशिणींच्या सांसारिक जीवनात सदैव आनंद ठेवते अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे इथे कुणाच्याच घरी गणेशाच्या मूर्तीची स्वतंत्र स्थापना केली जात नाही. भाद्रपद नवमीला उत्सवाची सुरुवात गणेशाच्या मंदिरातील श्रींच्या मूर्तीचीच पूजा करून होते तर सांगता भाद्रपद पौर्णिमेला श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढून होते. असा हा स्थापना व विसर्जनाशिवाय साजरा होणारा व हिंदू, मुस्लीम, बौद्ध धर्मीय असलेल्या या गावातला जातीय सलोखा अबाधित ठेवणारा हेलसचा सार्वजनिक गणेशोत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्ष साजरा करत आहे. आजही हा गणेशोत्सव तितक्याच आनंदात साजरा केला जातो आणि त्यासाठी या गावात माहेरवाशिणींचं हे असं प्रेमभरलं स्वागत होतं, दर गणपती उत्सवाला.. अर्थात आता बैलगाडीची जागा खासगी गाडय़ा, बसेसनी घेतली आहे, गावात वीज आली आहे. गाव बदलला आहे, पिढय़ा बदलल्या आहेत, पण उत्सवाचं आणि उत्साहाचं रूप मात्र अगदी तसेच आहे, वर्षांनुवर्षे.. या गावाचं वैशिष्टय़ आणि परंपरा म्हणजे या उत्सवासाठी गेल्या १२५ वर्षांपासून गावातील जेवढय़ा मुली लग्न होऊन बाहेरगावी दिल्या जातात त्या हयात असेपर्यंत दरवर्षी, कितीही म्हाताऱ्या झाल्या तरी आपल्या पुढच्या दोन पिढय़ांसह या गणेशोत्सवासाठी येतातच. वयस्क माहेरवाशिणींबरोबर त्यांची सून आणि नंतर नातसूनही या उत्सवात सहभागी होते आणि
गावाचं ‘गोकुळ’ होऊन जातं. म्हणूनच या गणेश उत्सवाला ‘माहेरवाशिणींचा गणेशोत्सव’ म्हटलं जातं. हे दहा-पंधरा दिवस या तीन हजार लोकसंख्येचं गाव दहा हजारांच्या वर लोकांनी गजबजून जातं आणि गणेश उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो.
पूर्वी या उत्सवासाठी १५ दिवस आधीपासूनच या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या असायच्या. आता अर्थातच ते कमी झालंय आता ते तीन किंवा पाच दिवसांवर आलंय पण ती ओढ आजही कायम आहे. आपल्या भूतकाळातल्या आठवणी जाग्या करताना ८५ वर्षीय राजूबाई पवार म्हणाल्या, ‘‘खेळण्या-बागडण्याच्या काळातच माझं लग्न झालं. तो काळ होता १९४० चा. वय झालं की सासरी जाणं गृहीतच होतं. पण लहान असल्यानं सासरी रुळायला वेळ लागला नाही. सगळं गोडीगुलाबीने वागायचे. पण एकदा का पावसाळ्याची सुरुवात झाली की ओढ लागायची ती गणेशोत्सवाच्या निमित्ताने माहेरी जाण्याची. माहेरच्यांना आणि गावातल्या मैत्रिणींना भेटण्याची उत्सुकता इतकी असायची की भाद्रपद नवमीला माहेरच्या वाटेने पावले आपसूकच चालायला लागायची. कधी बैलगाडी नाहीतर बऱ्याच वेळा २०-३० किलोमीटर अंतर पायी चालत यायचो. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाची व वाहतुकीची कुठलीच साधने नव्हती. माहेरी आल्यानंतर जुन्या मैत्रिणींसोबत दिवसभर खेळायचो, अगदी भांडणंही व्हायची पण त्याचबरोबर संसारातील सुखदु:खाच्या गप्पाही व्हायच्या. कौटुंबिक अडीअडचणी सोडविण्यासाठी आमचे ते हक्काचे व्यासपीठ होते. त्या काळी आईला स्वयंपाकात मदत करताना, सर्वाच्या आवडीच्या मुगाची भाकरी आणि मुगाचेच बेसन करून कितीतरी दिवसांनी एकत्र जेवणाचा आनंद घ्यायचो. तेव्हा एकत्रित कुटुंबपद्धती असल्यामुळे हा गणेशोत्सव म्हणजे आनंदी आनंद असायचा.’
माहेरवाशिणींच्या मनात माहेरची जी ओढ असते तशीच तिच्या आई-वडिलांना आणि घरातल्या लोकांना तिची असते. साठीला आलेल्या शालनताई कासार म्हणाल्या, ‘‘गणेशोत्सवाला लेकी, नातवंडं गावात येणार यामुळे उत्सव जवळ आला की आमच्या सर्व गावाच्या नजरा गावातील मुख्य रस्त्याकडे लागलेल्या असायच्या. हेलस पाटीपासून अडीच किलोमीटर पांदणीच्या घनदाट झाडीच्या छोटय़ाशा रस्त्यातून यावे लागायचे. या वेळी बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज आला की त्याकडे आम्हा मायमाऊल्यांचे डोळे व कान रस्त्याकडून येणाऱ्या माहेरवाशिणींवर असत. एकदा का तिची खुशाली कळाली की साऱ्या मैत्रिणी एकत्र येऊन बालपणीचे खेळ खेळायला, धिंगाणा घालायला मोकळ्या असायच्या. सगळं घर, परिसर दणाणून सोडायच्या. अगदी आजही ते होतं, पण थोडं मर्यादित स्वरूपात.’’
आशामती खराबे म्हणाल्या, ‘‘त्या वेळी आजच्यासारखी कुठलीच साधने आमच्याकडे नव्हती. आईचे तिच्या आयुष्यातले, संसारातले अनुभवाचे बोल आमच्या संसारातील प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी उपयोगी पडायचे. तिच्याशी बोलून मनातल्या दु:खाला तर वाट मिळायचीच पण अनेक समस्यांवर मार्गही सुचायचे. आई हे आमच्यासाठी मन मोकळं करण्याचं मोठं स्थान होतं. म्हणूनच असेल कदाचित आम्हाला कायम माहेराची ओढ लागलेली असायची. शिवाय तिचं ते कायम कामात व्यस्त असणं आम्हाला अस्वस्थ करायचं. तिला विश्रांती कधी मिळणार आणि कोण देणार? म्हणून मग आम्हीच तिला या काळात कोणत्याच कामाला हात लावू द्यायचो नाही. तेवढंच आम्हाला समाधान वाटायचं. या शिवाय आमच्या आकर्षणाचा एक भाग असायचा तो म्हणजे श्रींचा आवडीचा प्रसाद करणं. सव्वा किलो रव्याचे अनारसे आणि मोदक करून तो प्रसाद देवळात नेऊन गणपतीला दाखवायचो. तो मनाला आनंद देणारा अनुभव असायचा.’’
या गणेशोत्सवात पालखी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी भागवत ग्रंथाची गावातून पोथी मिरवणूक काढली जाते. या वेळी मुली डोक्यावर कळस घेऊन घरोघरी रांगोळी काढून पूजा करतात. दुपारी २ वाजेनंतर येथील प्रसिद्ध असलेला शिरा, भात, कढीचा महाप्रसाद पंगतीद्वारे सर्वाना दिला जातो. तो खाण्यासाठी जालना, परभणी जिल्हय़ातील स्त्रियाही आवर्जून येतात. संध्याकाळी श्रींच्या पालखीची मिरवणूक मंदिरापासून सुरू होते व गावातील चौ रस्त्यातून पालखी जमिनीवर खाली न ठेवता खांद्यावर मिरवली जाते. यात पूर्वीच्या काळी शंभर दिंडय़ा सहभागी होऊन गवळणी, भारुडे, अभंगाच्या माध्यमातून श्रीची धारणा करायचे. या पालखी पुनवे माहेरवाशिणी तर येतातच पण त्यासोबतच गावातील पुरुष कामानिमित्त कोणत्याही बाहेरगावी गेलेले असल्यास तेही आवर्जून येतात.
गावातली काही कुटुंबे वर्षभर दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करून राबतात व कमविलेल्या कवडी कवडी पैशातून आपली मुलगी कुटुंबासह माहेरी येणार या ओढीने घरात किराणा सामान भरण्यापासून ते सर्व टापटीपपणा ठेवतात. मायमाऊल्या जेवढय़ा दिवस राहतील तेवढय़ा दिवस गोड जेवण देऊन तिला सर्वजण आपापल्या परीने आनंदी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. मुलीचं माहेरपण जपतात आणि माहेरवाशिणीही दिवसभराचं काम संपलं की संध्याकाळी मिळालेला थोडा मोकळा वेळ आपल्या वयस्क नातेवाईकांबरोबर घालवतात. गावातल्या सगळ्या ज्येष्ठांची चौकशी करणं हा एकमेकांच्या आनंदाचा, नातं अधिक दृढ करणारा ठरतो. नातवंडाचे लाड पुरवण्यात आजी-आजोबांचाही वेळ चांगला जातो. संपूर्ण गाव एक कुटुंब होऊन जातं.
पूर्वीच्या आणि आताच्या काळाची तुलना करताना अरुणा खराबे-घोलप म्हणाल्या,‘‘आजच्या स्पर्धेच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नातेसंबंध ही संकल्पना पुसट होत चालली आहे. मोबाइल क्रांतीमुळे सुखदु:खाची देवाणघेवाण केवळ फोनपुरतीच राहिली आहे. आज अनेक जणी इथे फारसं येण्यापेक्षा फोनवरून गप्पा मारणं पसंत करतात. आम्हाला मात्र माहेरी येऊन आईच्या कुशीत तासन्तास झोपून संसाराच्या गप्पा मारणं फार आवडायचं. एरव्ही वर्षभरातील कुठल्याच सणाला आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र भेटण्याचा प्रसंग येत नाही. मात्र गणेशोत्सव काळात आम्ही सर्वजणी माहेरी जाण्याचा सासरी आवर्जून हट्ट धरतो. त्या निमित्ताने जुन्या मैत्रिणींना, त्यांच्या पतींना, मुला-बाळांना भेटण्याचा योग येतो व त्यातून आमच्या मुलांत एकोप्याची, आपलेपणाची भावना, प्रेम निर्माण होऊन ऋणानुबंध अधिकाधिक घट्ट होतो.’’
माया हेलसकर यांच्याशी गप्पा मारताना जाणवलं की त्यांच्यासाठी माहेरी येणं म्हणजे उत्सवाचा आनंद आणि कौटुंबिक आनंद असा दुहेरी आनंदयोग आहे. त्या म्हणाल्या,‘‘आम्हा सर्व माहेरवाशिणींच्या दु:खांचे हरण करणाऱ्या श्रींच्या उत्सवासाठी कित्येक वेळा मी तीस किलोमीटर पायी चालत आलेले आहे. चालता चालता पाय दुखायचे. पण जसं जसं गावाची वेस दिसायला लागायची तसा उत्साह यायचा.. आणि गावात शिरल्यावर तर मैत्रिणी, आई-वडील दिसले की, थकण्याची जागा नव्या जोशाने भरली जायची. श्रीच्या उत्सवाची तयारी करायला मन आणि शरीर लगेच तयार व्हायचं. कामाला लगेच सुरुवात व्हायची. गणेशोत्सव म्हणजे वेगवेगळ्या आरत्या म्हणणं. त्याचा आनंद काही वेगळाच असायचा. काकड आरती गावातले सगळे लोक एकत्र येऊन म्हणायचेच शिवाय श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, श्रीमद्भागवत ग्रंथ कथा वाचन, हरिपाठ, श्रींची आरती, हरिजागर अगदी अहोरात्र सुरू असायचं. प्रत्येक जण त्यात उत्साहाने सहभागी व्हायचा.’’
हा देव नवसाला पावतो अशी इथल्या ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्याप्रमाणे बोललेला नवस पूर्ण झाला की तो श्रद्धेने फेडलाही जातो. नवस पूर्ण करण्याच्या पद्धतीला येथे पारभरणी म्हणतात. यासाठी अनारसे, करंज्या, पापडय़ा यासह अन्य पदार्थाचा समावेश असलेले ताट श्रींच्या पारावर ठेवून या दु:खहर्ता, विघ्नहर्त्यांला भक्तिभावाने नमस्कार केला जातो. याशिवाय एक गोष्ट आवर्जून केली जाते ती म्हणजे गावातल्या लोकांना, नवीन पिढीला पौराणिक गोष्टी माहीत व्हाव्यात यासाठी येथील विष्णुपंत कुलकर्णी भागवत कथा सांगतात.
या उत्सवातील लोकांच्या आकर्षणाचा आणखी एक भाग म्हणजे तीन दिवस सादर होणारी धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक नाटके. नाटय़ोत्सवाची ही परंपराही गणेशोत्सव समकालीन असून तोही यंदा आपले शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. गावात येणाऱ्या माहेरवाशिणींसाठीही रोज संध्याकाळी सादर होणारे हे नाटय़प्रयोग उत्सुकतेचा भाग असायचा आणि आजही आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मनोरंजनाची कुठलीच साधने उपलब्ध नव्हती. त्या वेळी लोकरंजनातून लोकज्ञान हे ब्रीदवाक्य समोर ठेवून‘श्री गणेश नाटय़ मंडळ’ मागील १२५ वर्षांपासून अखंडपणे सांगीतिक नाटय़ परंपरेद्वारे लोकप्रबोधन, स्त्रियांचे हक्क, मनोरंजनाची गरज पूर्ण करीत आलेले आहेत. सुदामती खराबे म्हणाल्या,‘‘आम्हा महिलांना ‘चूल आणि मूल’ एवढंच माहीत होतं. मात्र गावातील नाटकाचे प्रयोग बघितल्यानंतर बाह्य़ जगाचं ज्ञान मिळू लागलं. स्त्री हक्काची जाणीव होऊन खरोखरची‘स्त्रीमुक्ती’ ही संकल्पना अस्तित्वात आली. नाटकामुळे आम्हा महिलांत वागणे, बोलणे, राहणे यात सुबकता आली. आम्ही चार भिंतीबाहेर पडून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला.’’
मुक्ता भाबट-शेळके म्हणाल्या,‘‘आम्हा माहेरवाशिणींसाठी नाटय़प्रयोग म्हणजे मनोरंजनातून ज्ञानप्राप्ती मिळविण्याचे महत्त्वाचे साधन होते. नाटकातील स्त्रीपात्रामुळे स्त्रीहक्क, अन्याय, अत्याचाराविरुद्ध व सामाजिक बंदिस्तीच्या बाहेर नेण्याचे काम झाले त्यासोबतच महिला साक्षरतेचे महत्त्व समजले. नाटकातून शिक्षणाचा बोध घेऊन येथील महिलांनी आपापल्या मुलींना शाळेत पाठवलं. अभिमानाची गोष्ट म्हणजे आजही येथे दहावी पास झालेल्या मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. या मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणाऱ्या निरक्षर मातांना खरा बोध झाला तो नाटकाचे प्रयोग बघूनच. नाटकांचा हा उपयोग खरंच समाजोपयोगी आहे.’’
महाराष्ट्राला नाटय़परंपरेचा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. मात्र यात हेलस येथील नाटय़ परंपरा उपेक्षित व दुर्लक्षितच राहिलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात एकसंधतेसोबतच राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे नाटय़प्रयोग व स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला हक्काची जाणीव करून देणारे नाटय़प्रयोग खरोखरच दखल घेण्याजोगे होते. नाटय़प्रयोगाला येणाऱ्या अडचणींवर स्वातंत्र्यपूर्व काळात पाथरी, जि. परभणी व अहमदनगर येथील देवराव काळे व बाबुलाल महाराज यांनी अतोनात प्रयत्न केले. येथील नाटय़ परंपरेचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे नाटकात स्त्रीपात्र कायम पुरुषांनीच साकारली. यातीलच एक म्हणजे साहेबराव खराबे. पेशाने शिक्षक असलेले साहेबराव यांनी १९५३ ते १९८७ पर्यंत विविध नाटकांत स्त्रीपात्रांच्या भूमिका समरसून साकारल्या. आपल्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, ‘‘नाटकात पुरुषांनी स्त्रीपात्र साकारणे खरोखरच महाकठीण आहे. स्त्रीच्या अंगी उपजत असलेले माया, प्रेम, स्नेह, आवाजातला गोडवा, मृदुस्वभाव हे गुण नाटय़प्रयोगात प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी एक महिना अगोदरपासून तयारी करायचो. एकदा का रंगमंचावर उतरलो की मी पुरुष आहे हे विसरूनच जायचो त्यामुळे कित्येकांना मी स्त्रीच वाटायचो. माझ्या गाजलेल्या भूमिकांपैकी अजरामर झालेली ‘राजा हरिश्चंद्र’ नाटकातील ‘तारामती’ची भूमिका. १९६२ साली जेव्हा याचा प्रयोग सुरू होता तेव्हा मी तारामती पात्र करत होतो. माझे पती राजा हरिश्चंद्र स्मशानात प्रेतांना आग लावण्याचे काम करत असतात. माझ्या हातात मृतावस्थेतला मुलगा रोहिदास. मी मुलाचा खून केल्याचा आरोप करून प्रजा मला मारायला लागते आणि मी स्मशानात जाते. त्या वेळी हरिश्चंद्र आपल्या कर्तव्यापोटी मला ओळख दाखवत नाही व माझे हाल असह्य़ होतात. हे दृश्य पाहताना मला आठवतंय तेव्हा गावातीलच नाही तर अगदी नाटक बघण्यासाठी बाहेरगावाहून आलेली मंडळीही ढसाढसा रडू लागली होती.’’
आज हा उत्सव गावाचा केंद्रबिंदू झाला आहे. श्री गणपती संस्थानचे अध्यक्ष दीपकराव खराबे यांनी सांगितलं की स्त्री-पुरुष मतभेद किंवा जातीयता न बाळगता दरवर्षी आम्ही उत्सव साजरा करतो. महिलांची उत्सवप्रियता जोपासण्यासाठी व माहेरची‘रुणगी’टिकविण्यासाठी आम्ही पुढच्या काळात अधिकाधिक प्रयत्न करणार असून या मंदिराचा मागील वर्षी ७ लाख २१ हजार रुपये खर्चून जीर्णोद्धार केला होता.
गोदावरी खराबे ही नवविवाहित ‘आजची’ तरुणी एका वेगळ्या दृष्टिकोनातून या उत्सवाकडे बघते ती म्हणते,‘‘माझ्या गावातील गणेशोत्सव, नाटय़ोत्सव हे उल्लेखनीय आहे. मात्र गावातील परिसरात भग्नावस्थेत विखुरलेल्या मूर्तीचे जतन करण्यासाठी शासनाने या ठिकाणी एखादे संग्रहालय बांधणे गरजेचे आहे. पुरातत्त्व विभागाने उत्खनन करून ऐतिहासिक पुरावे शोधून काढावेत. कारण हेमाडपंथी शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्री पंत यांचे हे गाव असल्याचे आहे. मोडी लिपीचे ते जनक होते.’’
यापेक्षा थोडीशी वेगळी व संतप्त प्रतिक्रिया देताना मीरा खराबे म्हणाल्या,‘‘माझ्या गावातील प्रत्येक घराघरात नाटय़परंपरेत काम करणारी एकतरी व्यक्ती आढळते. मात्र यांची ना शासन दरबारी नोंद ना कुठे दखल. शासन कलाकारांना मानधन भत्ता देण्यासाठी त्यांच्याकडे फोटो पुरावे मागते. मात्र या गावात १९६४ साली वीज आली. याअगोदरही डोक्यावर दिवाबत्ती घेऊन नाटय़प्रयोगाद्वारे सामाजिक बदल घडविण्याचे काम ज्यांनी केले. त्याचे फोटो कसे काय मिळतील? त्यांच्याकडे कुठलेच पुरावे नाहीत. शासनाला हा ठेवा जोपासायचा असेल तर शासनाने येथे नाटय़प्रशिक्षण केंद्राची स्थापना करावी अथवा पुण्यातील नाटय़क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी येथील नाटय़परंपरेची दखल घेऊन याची माहिती जगासमोर आणावी.’’
सामाजिक बंधनात अडकलेल्या निरक्षर महिलांच्या आयुष्यात त्यांच्या हक्कांची, माहेरच्या आवडीची भावना जोपासण्यासोबत ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषणविरहित नैसर्गिक गणेशोत्सव साजरे करणारे हेलस गाव म्हणजे खरोखरच प्रेरणादायी व आदर्शवत आहे. जातीयतेच्या सीमा ओलांडून केवळ माहेरच्या ओढीने येणाऱ्या माहेरवासीयांच्या सान्निध्यात १२५ वे गणेशोत्सव, नाटय़ोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष या वर्षीही मोठय़ा उत्साहात पार पडेल याबाबत शंका नाही. त्यासाठी माहेरवाशिणीदेखील तेवढय़ाच आतुरतेने माहेरी येतील आणि इथल्या सासुरवाशिणी त्यांना तेवढीच मोलाची साथ देऊन ही परंपरा अधिकाधिक घट्ट करत राहतील..
santoshmusle1515@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 7th Sep 2013 रोजी प्रकाशित
माहेरवाशिणींचा गणेशोत्सव
ऐतिहासिक महत्त्व लाभलेलं मंठा तालुक्यातलं हेलस हे गाव.. शंभर वर्षांपूर्वीचा तो काळ.. गावाचं गावपण टिकून असलेलं.. तसं माणसाचंही..

First published on: 07-09-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Married leadies celebrates ganeshotsav in their mother place