आठ बिहिणी, एक भाऊ आणि आई, वडील अशा सुखवस्तू कुटुंबातील रोया (सदत) ही मोठी मुलगी. आई-वडील दोघेही सुशिक्षित. अफगाणिस्तानत सतत चालू असलेली टोळीयुद्धाची झळ त्यांनी मुलांना शक्यतो लागू दिली नाही. पण तरीही तिची धाकटी बहीण अलकाच्या जन्मानंतर काही महिनेही उलटत नाहीत तोपर्यंत तालिबान्यांनी अफगाणिस्तानची सत्ता स्वत:च्या हातात घेतली. मुलींनी शिकलं पाहिजे या विचारसरणीच्या तिच्या पालकांना तालिबान्यांमुळे बंद झालेलं मुलींचं शिक्षण त्रास देत होतं. तालिबान्यांचा मुलींना घरातही न शिकवण्याचा कट्टर आदेश असताना रोयाची आई, काकू स्वत:च्या आणि शेजारच्या मुलींना घरातच लपून छपून शिकवत होत्या. त्यांची विचारसरणी घडवत होत्या. तालिबान्यांपासून लपवून शिक्षण घेणं म्हणजे सतत डोक्यावर टांगती तलवार. पण या स्त्रियांनी हार मानली नाही आणि त्यांच्या या कष्टाचं फळ त्यांना रोया आणि अलकाच्या आंतरराष्ट्रीय यशाच्या रूपाने मिळते आहे.
रोया हेरतच्या शाळेत शिकत असताना तिच्या शाळेच्या नाटकांसाठी संहितालेखन करायची. अवघ्या १२ वर्षांच्या असलेल्या या मुलीला तेव्हापासूनच सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण होती. पण तालिबान्यांनी थमान घातल्यावर तिला शाळा सोडून घरी बसावं लागलं. पण ही पठ्ठी काही शांत बसली नाही. मिळतील तिथून सिनेमांची, नाटकांची पुस्तकं गोळा करून ती वाचत होती, त्यांचा अभ्यास करत होती. अत्यंत प्रतिकूल, जिवावर बेतणारी परिस्थिती असतानादेखील इतक्या लहान वयात अफगाणी स्त्रियांच्या प्रश्नांवर नाटकं लिहीत होती, दिग्दíशत करत होती. पण हा सगळा कारभार चालला होता भूमिगत पद्धतीनं. कारण तालिबान्यांना जराही संशय आला असता, तर तिची काही खैर नव्हती. जिथे पुरुषाशिवाय (भाऊ, नवरा, मुलगा किंवा वडील फक्त) एकटीच घराबाहेर आली म्हणून १७ वर्षांच्या मुलीला भर रस्त्यात पालथं पाडून तिच्या पाश्र्वभागावर चाबकाचे ३५ फटके मारले जातात, तिच्या विव्हळण्याची दखलही घेतली जात नाही. त्या क्रूर तालिबान्यांनी रोयाचं काय केलं असतं याचा विचारही करायला नको. त्यांच्या मते रोयाचं काम म्हणजे तर बंडखोरी, पाप होतं. पण तरीही रोया डगमगली नाही. प्रयत्नपूर्वक तिने स्वत:चं शिक्षणही पूर्ण केलं. साऊथ कोरीयातल्या बुसानच्या ‘एशियन फिल्म अकादमी’मध्ये प्रवेश घेऊन स्कॉलरशिपच्या जोरावर चित्रपट बनविण्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं.
२००२-२००३ च्या दरम्यान तालिबान अकार्यक्षम होऊ लागल्यावर रोयाने ‘थ्री डॉटस’ हा तिचा पहिला चित्रपट दिग्दíशत केला. या चित्रपटाने अफगाणिस्तानात इतिहास घडवला. अफगाणची पहिली महिला दिग्दर्शिका म्हणून ती सगळ्या जगासमोर आली, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झगडून. या चित्रपटाने अफगाण स्त्रियांची स्थिती जगासमोर मांडली. ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाने मिळवले. अनेक चित्रपट महोत्सवांत या चित्रपटाची दखल घेतली गेली.
रोयाचे आणि अलकाचे चित्रपटही त्यांनी भोगलेली परिस्थिती चित्रपटांतून मांडतात. तालिबान्यांची जुलमी राजवट आणि त्यानंतरचा अफगाणिस्तान, तसेच गेल्या वीस वर्षांतील राजकीय, आíथक, सामाजिक स्पंदने हे चित्रपट टिपतात. अलकाने दिग्दíशत केलेल्या ‘शोराब दोख्तार’ या लघुचित्रपटात तर तिने तिची बहीण मोझगान मुलाचा वेश घेऊन उदारनिर्वाहासाठी जो संघर्ष करीत होती तो चित्रित केला आहे. मुलाचा वेश घेतला असताना मोझगानने ‘शोराब’ हे नाव धारण केलं होतं त्यामुळे या चित्रपटाचं नावही ‘शोराब दोख्तार’ आहे. ‘थ्री डॉट्स’मध्ये तर इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर तीन मुलांसह एकाकी जीवन जगणाऱ्या गुल अफ्रुजची कथा मांडली आहे. उदरनिर्वाहासाठी तिला स्थानिक खानाने अमलीपदार्थाची करायला लावलेली तस्करी आणि या प्रकरणात सीमेवर तिला झालेली अटक हा चित्रपट मांडतो. हा चित्रपट युद्धानंतर एकाकी झालेल्या स्त्रियांच्या हलाखीचे जिवंत चित्रण करतो. रोयाचे सर्व चित्रपट तिच्या www. royafilmhouse.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे चित्रपट देखणे नाहीत, पण ते अफगाण स्त्रियांच्या परिस्थितीचं योग्य चित्रण करतात. स्वत: कॅमेरा हातात घेऊन बिनधास्त दिग्दर्शन करणाऱ्या या बहिणींना डोक्यावरचा अबाया (डोक्यापासून कानापर्यंत बांधलेला रुमाल)काढायला मात्र परवानगी नाही. कितीही पुरोगामी असल्या तरी धर्माची चौकट त्यांना मोडता येत नाही. पण तरीही त्यांच्या आई व काकू यांच्या चिकाटीमुळेच या दोघी इथपर्यंत पोहोचल्याच, पण इतर बहिणीही अफगाणिस्तानातील सर्व महत्त्वाच्या पदांवर आज कार्यरत आहेत ते याच हिमतीवर. तिची एक बहीण साहित्याची प्राध्यापिका आहे, तर एक बहीण कला या विषयाची प्राध्यापिका आहे, एका बहिणीचा स्वत:चा फॅशन स्टुडिओ आहे. रोयाची बहीण झायेदा ही तर फोटो जर्नालिस्ट आहे. मोझगान ही रोयाची सगळ्यात लहान बहीण. वर उल्लेख केल्या प्रमाणे स्त्रियांनी उदरनिर्वाहासाठीही बाहेर न पडण्याचे तालिबान्यांचे आदेश असताना ही छोटीशी मोझगान मुलाचे कपडे घालून, केस कापून जिवावर उदार होऊन आपल्या कुटुंबाला पोसण्याचं काम करत होती. त्या काळात रोयाच्या वडिलांना उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडता येत नव्हतं. आणि खाणारी तोंडं तर बारा. अशा वेळेस फक्त पुरुषानेच कामधंदा केला पाहिजे, जर स्त्री कामधंदा करताना दिसली तर मृत्यूशी गाठ, असा फतवा असतानाही ही बहाद्दर पठ्ठी पोटासाठी जिवावर उदार झाली होती.
खास महिला चित्रपट दिग्दíशकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘बर्ड्स आय व्हूय़’ या चित्रपट महोत्सवासाठीही या बहिणींना अफगाणिस्तानमधल्या परिस्थितीमुळे जाता आले नाही तरीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्त्रियांच्या प्रश्नांना चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं काम सुरूच आहे.
अलीकडेच ‘दहाव्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल’मध्ये खास अफगाणी चित्रपट दाखवण्यात येणार होते, त्यासाठी रोया आणि अलका दोघीही या चित्रपट महोत्सवात परीक्षक आणि पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. एका प्रतिगामी देशातल्या दोन तरुणी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्वत:च्या देशाचं प्रतिनिधित्व करत होत्या, हीच किती महत्त्वाची कामगिरी आहे.
तालिबान्यांच्या राजवटीत स्वत:च्या आयुष्याची महत्त्वपूर्ण वर्षे घालवलेल्या या दोघी जणी आज जगातल्या उत्तम सिनेदिग्दíशका म्हणून गणल्या जात आहेत. आजघडीला या बहिणींना जगभरातले अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. आज अनेक मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांना परीक्षक म्हणून आमंत्रित केलं जातंय. पण त्यांचा हा संघर्ष अजूनही डोक्यावर टांगती तलवार घेऊन सुरूच आहे. जिथे अगदी कालपरवा म्हणजे ५ सप्टेंबर २०१३ ला तालिबान्यांविरुद्ध लेखन केलं म्हणून घरातून बाहेर काढून गोळ्या घालून ठार करून टाकलेल्या सुश्मिता बॅनर्जी या भारतीय लेखिकेचं उदाहरण अगदी ताजं आहे. तिथे या बहिणी काय परिस्थितीत काम करत असतील याची नुसती कल्पनाच केलेली बरी.
रोया आणि अलकासारख्या स्त्रियांना जिवावर उदार होऊन काम करत राहावं लागतंय पण त्या करीत राहणारच आहेत, याचं कारण प्रतिगामी शक्तींनी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी पुरोगामी विचार हा सातत्याने प्रतिगामित्वावर मात करत, माणसातलं माणूसपण जपण्यासाठी पुढे येतच राहणारच आहे.
rane.geet@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2013 रोजी प्रकाशित
क्रांती-चित्रपटाच्या माध्यमातून
अफगाणिस्तान म्हटलं की तालिबान आणि पर्यायाने व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा, विशेषत: स्त्रियांना तर स्वतंत्र अस्तित्व नाही, हेच चित्र समोर येतं.

First published on: 05-10-2013 at 01:13 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movie producer courageous roya and her sister alka