फोटो हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. जुन्या फोटोंमध्ये रमला नाही असा माणूस नसेल. हे फोटो आपल्या आयुष्याच्या विशिष्ट काळाचे साक्षीदार असतात. दस्तावेजीकरण हे छायाचित्र काढण्याचं सगळ्यात मोठं कारण असावं. त्यामुळे कित्येक वर्षांपूर्वीचे फोटो पाहताना जुना काळ, जुनी माणसं आपल्यासमोर साक्षात उभी राहतात. फोटो काढण्यामागे एक मानसशास्त्र नक्की आहे. प्रत्यक्ष फोटो काढताना माणूस त्या क्षणात जगतो. परंतु आज, मोबाइल फोनचा कॅमेरा हातात असल्याने कधीही, कुठलेही, कितीही फोटो काढण्याने त्यामागची संवेदनशीलता हरवली आहे का?

धडकी भरवणारे, रात्री वाईट स्वप्नं पाडणारे, दरदरून घाम फोडणारे काही शब्द असतात. ‘उद्या रिझल्ट आहे’, ‘घराची किल्ली सापडत नाहीये’, ‘स्वयंपाकीण येणार नाहीये’, ‘लॅपटॉप बंद पडला’ वगैरे. माझ्यासाठी या श्रेणीतले आणखी तीन शब्द म्हणजे ‘एक फोटो मिळेल?’

वर्ष २०२१, पुण्यातलं एक हॉटेल. मी काही कारणाने पुण्याला गेले होते. या हॉटेलमध्ये काही मित्रमंडळी उतरली आहेत असं मला कळलं. मी उत्साहाने दुचाकी घेऊन मंडळींना भेटायला गेले. हॉटेलच्याच खालच्या भागात गप्पा, काव्यशास्त्रविनोदावर चर्चा, सगळं झालं आणि मी निघाले. हॉटेलमधून बाहेर आले, आणि अचानक कुठून तरी एक बाइक आली आणि माझ्या दुचाकीला धडकली. मी पडले, माझ्या अंगावर माझी दुचाकी पडली. वेग कमी होता त्यामुळे कुणालाही इजा वगैरे झालेली नव्हती. फक्त ते दुचाकीचं धूड मला माझ्या अंगावरून बाजूला करता येईना. धडकलेल्या बाइकवरची दोन मुलं मला मदत करायला लागली. रस्त्यावरून चाललेलं एक तरुण जोडपंसुद्धा लगबगीनं पुढे आलं. आता आपली या विचित्र अवस्थेतून सुटका होणार या कल्पनेनं मला किंचित बरं वाटत असतानाच माझ्या कानावर शब्द आदळले. ‘‘अय्या, तुम्ही सीरियलमध्ये असता ना… एक फोटो मिळेल?’’ पुढच्या क्षणाला माझ्या तोंडासमोर एक फोन आला आणि ‘क्लिक’ असा आवाज आला. ताई नव्वद अंशात वाकल्या आणि पाठोपाठ एक सेल्फीसुद्धा झाला. ‘‘मला जरा उठायला मदत करता का?’’ असं म्हणण्याचा मी क्षीण प्रयत्न केला, पण ताईंना गुलबकावलीचं फूल दिसल्याचा आनंद झाला होता, त्यामुळे माझं बोलणं त्यांना ऐकू गेलं नाही. चुकून उठून उभी राहिल्यावर, मी धूम ठोकून पळून गेले असते तर त्यांना कोहिनूर हिऱ्याइतका मौल्यवान फोटो नसता ना मिळाला, म्हणून त्यांनी आधी होत्या त्या अवस्थेत फोटो काढून घेतला, आणि मग मला उठायला मदत केली. एक पाय दुचाकीच्या वर, दुसरा खाली दबलेला, एक हात तिरका, दुसरा डोक्याच्या खाली, गॉगल वाकडा झालेला, आणि मान उंचावलेली असल्यामुळे मानेच्या ताणलेल्या शिरा, असा तो माझा फोटो, एका अनोळखी बाईकडे आहे. आता मी स्वत:चे कितीही ग्लॅमरस वगैरे फोटो काढून घेतले, तरी काहीही उपयोग नाही. जगात कुठे तरी माझा एक अत्यंत विनोदी फोटो अस्तित्वात आहे… कदाचित!

हो कदाचितच, म्हणजे ताईंनी तो दुसऱ्या दिवशी डिलीट केला नसेल तर! कलाकारां-बरोबर फोटो काढायची लोकांना उत्सुकता असते, मला अगदीच समजू शकतं. पण मग नंतर, आपल्या मोबाइल गॅलरीमधल्या साडेसात हजार फोटोंमधल्या त्या एका फोटोचं ते नेमकं काय करतात, हा मला प्रश्न आहे. स्वत: काही वेळा बघतील, घरच्यांना दाखवतील, मित्र-मैत्रिणींना फॉरवर्ड करतील, किंवा यातलं काहीही करणार नाहीत. तो फोटो तसाच पडून राहील. ताई तशा साध्या वाटल्या, म्हणजे माझी झालेली फजितीच त्यांना लोकांना दाखवायची असावी, असं मला वाटलं तरी नाही. पण त्यापेक्षा ताईंनी मला त्या क्षणी अपेक्षित मदत केली असती तर उलट मी त्यांच्याशी जास्त प्रेमाने चार शब्द बोलले असते. कलाकार हा मुळात ‘सार्वजनिक’च असतो असा एक समज आहे. त्यामुळे त्याच्या इच्छेचा वगैरे काही संबंधच येत नाही. कुठल्या तरी पडद्यावर दिसणारा एक चेहरा समोर आहे, आपल्या हातात फोन आहे ज्यात कॅमेरा आहे, बास. फोटो काढायला याहून जास्त काहीच लागत नाही. पण तसं नाहीये ना हो. थोडी संवेदनशीलता लागते की.

समोरची व्यक्ती फोटो देण्याच्या शारीरिक, मानसिक अवस्थेत नसू शकते. एकदा ‘मायबाप’ म्हणून कायमचं ऋण मान्य केलेलं असल्यामुळे फोटो देण्याचं कलाकारांवर एक प्रकारचं बंधन आलेलं असतं. मग ते कुटुंबाबरोबर जेवत असोत, कुणाच्या तरी तेराव्याला आले असोत किंवा दवाखान्यात उपचाराला. खरं तर अशा अनोळखी माणसांच्या मोबाइलमध्ये आपले फोटो असणं हे सध्याच्या स्कॅमच्या जमान्यात धोक्याचंच नाही का? पण हा विचार करण्याची परवानगी कलाकारांना नसते. मध्यंतरी एकदा माझ्या नाटकाच्या प्रयोगानंतर मला भेटायला माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य आले. मला खूप आनंद झाला. ते कौतुकाने बोलत होते, मी आस्थेनं त्यांची चौकशी करत होते. तेवढ्यात मला एक अत्यंत उर्मट आवाजात वाक्य ऐकू आलं… ‘‘ओ मॅडम, एवढा वेळ थांबलोय, या की फोटो द्यायला.’’ अर्थातच मला आवडलं नाही, पण मी नम्रपणेच बोलायला हवं कारण नाही तर पुन्हा ‘कलाकार उद्धट आणि कृतघ्न असतात,’ असंही म्हटलं जातं. पण मला त्या क्षणी ज्यांना मी आयुष्यात पुन्हा कधीही भेटणार नाही अशा अनोळखी पाच माणसांपेक्षा माझ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी बोलणं खूप खूप जास्त महत्त्वाचं वाटत होतं, हे कसं समजावणार मी त्या ‘फोटोचुंबक’ माणसांना?

फोटो हा खरं तर किती जिव्हाळ्याचा विषय असायला हवा. जुन्या फोटोंमध्ये रमला नाही असा माणूस नसेल. माझी लेक लहान असताना तो आम्हा दोघींचा एक अत्यंत आवडीचा कार्यक्रम असायचा. जुने फोटो काढायचे, एक एक फोटो बघत त्या फोटोमागची गोष्ट सांगायची. ती मन लावून ऐकायची. पुन्हा पुन्हा विचारायची. तो फोटो, त्यातली माणसं, ती जागा, तो काळ, ते सगळं आठवण्यात, जागवण्यात तासनतास जायचे. असे शेकडो फोटो नाहीत माझ्या लहानपणीचे, मोजकेच आहेत. पण जे आहेत ते फार मायेनं जपलेले आहेत. त्यांना खूप किंमत आहे माझ्या लेखी.

एके काळी दस्तऐवजीकरण हे छायाचित्र काढण्याचं सगळ्यात मोठं कारण असावं. साधारण फोटोग्राफीचं तंत्र उदयाला येऊन दोनशे वर्षं झाली. तेव्हाची माणसं, त्यांचे दागिने, पेहराव हे सगळं या शास्त्रामुळे अभ्यासता आलं. अनेक ऐतिहासिक क्षण आज आपण केवळ फोटोंतूनच बघू शकतो. फोटो नसते तर अनेक अद्वितीय प्रसंग, ऋषितुल्य माणसं आपण फक्त कल्पनेतच पाहू शकलो असतो. कधी तरी कुठल्या तरी कृष्णधवल फोटोनं आपल्या मनात कायमचा ठसा उमटवलेला असतो. सेपिया टोनमधले ते फोटो जगण्याचे किती रंग दाखवतात आपल्याला. जुन्याजाणत्या नेत्यांचे भाषण करतानाचे फोटो, आपल्या शहरातल्या जुन्या वास्तूंचे फोटो, ‘प्रभात फिल्म कंपनी’ पुण्याला आली तेव्हा त्या मोकळ्या माळरानाकडे आणि आपल्या स्वप्नाकडे बघतानाचा विष्णुपंत दामलेंचा फोटो, कोलकातात माणसांना घेऊन जाणारी रिक्षा ओढणाऱ्या माणसाचा फोटो. माणसं, त्यांची त्या क्षणीची मन:स्थिती त्या स्तब्ध छायाचित्राच्या पलीकडे आपल्यापर्यंत पोहोचलेली असते. काळ बदलण्याचं, मूड बदलण्याचं सामर्थ्य त्या फोटोंमध्ये असतं.

आपले स्वत:चे लहानपणीचे फोटो बघताना, कौटुंबिक फोटो बघताना क्षणभर का होईना, पण एक ठहराव येतो. पाच, दहा, वीस, पंचवीस वर्षांचे आपण, दरवेळी आपल्या चेहऱ्याच्या ठेवणीत, केसांच्या वळणात होत गेलेले बदल, सुरुवातीचं मोकळं हसू आणि मग कुणी तरी आपला फोटो काढतंय हे कळायला लागल्यानंतर खास फोटोसाठी म्हणून तयार होत गेलेल्या आपल्या मुद्रा, आणि आता फोटोसमोरचा मोकळेपणासुद्धा ठरवून आणलाय की काय, अशी शंका येईल असे आपले फोटो. उभं राहण्याची पद्धत मात्र तीच आहे बरं का, अजूनही फोटोसाठी हीच पोझ येते पटकन, असं काही तरी साम्यही शोधतो आपण. फोटो आपल्या आयुष्याच्या विशिष्ट काळाचे साक्षीदार असतात. आपल्यानंतरसुद्धा आपले फोटो राहतील, कदाचित आपल्या पुढच्या पिढ्या त्यांच्या पुढच्या पिढ्यांना ते फोटो दाखवतील, गोष्टी सांगतील. प्रश्न ते टिकवायचं की जे दिसेल ते टिपत सुटायचं, हा आहे. संस्मरणीय आणि तात्पुरतं याचा फोटोपुरता तरी भेद उरला नाहीये.

छायाचित्राचं मानसशास्त्र काय असावं, का काढायचे असतात सगळ्यांना सतत फोटो? तर तज्ज्ञ असं म्हणतात की, बहुतांश वेळा फोटो काढल्यामुळे माणसाच्या मनात एक प्रकारची समाधानाची भावना जागृत होते. ९९ टक्के वेळा फोटो काढला जात असताना माणूस हसतो. आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसावा असं वाटणं ही अत्यंत नैसर्गिक ऊर्मी आहे, फोटोमधले आपण हसत असतो, म्हणून आपल्याला ते बघायला आवडतात. प्रत्यक्ष फोटो काढताना माणसाला भवतालचा विसर पडतो, तो त्या क्षणात जगतो. तो एक सुखद अनुभव असतो आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो.

फोटो बघणं मात्र नेहमीच सुखद असतं असं नाही. किंबहुना या फोटोच्या वेळी मी किती आनंदात होतो, आणि आता नाहीये, आता ती माणसं नाहीयेत, तो काळ नाहीये, याची जाणीव होऊन दु:ख होणं, नैराश्य येणंही शक्य असतं. चुकून एखादा फोटो जुन्या खपल्याही काढतो. आपण काय बघतो याचा फार सूक्ष्म विचार करण्याची वेळ आली आहे. कारण त्याचा आपल्या मेंदूवर, विचारांवर शंभर टक्के परिणाम होतो. हल्ली समाजमाध्यमांवर भयानक फोटोही दिसतात, त्या प्रतिमा डोळ्यासमोरून काढून टाकणं मुश्कील असतं. नैसर्गिक आपत्ती, गुन्हे, गुन्हेगार, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या असंख्य गोष्टी कॅमेऱ्यात टिपल्या जातात, आपल्यासमोर आणल्या जातात. कधी कधी या सगळ्याचा इतका अतिरेक होतो की उबग येतो सगळ्याचा.

मानसशास्त्र सांगतं की, सतत फोटो काढण्याच्या सवयीमुळे ‘फोटो टेकिंग इम्पेअरमेंट इफेक्ट’ होतो. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवापेक्षा फोटो काढण्याची कृतीच अधिक लक्षात राहते. म्हणजे तो अनुभव आपण जगलेलेच नसतो. दुसरं म्हणजे छायाचित्र संपूर्ण सत्य सांगतच असं नाही. त्यात दिखावा असू शकतो. म्हणूनच समाजमाध्यमावरच्या फोटोंवर तर अजिबात विश्वास ठेवू नये. एक दिवस जग बुडणार असं म्हणतात, त्या वेळी आपले मोबाइल फोन आणि त्यातले फोटोसुद्धा बुडणार आहेत. तोपर्यंत निदान भर रस्त्यात खाली पडलेल्या व्यक्तीला उठण्यासाठी आधी मदत करू या आणि मग त्यांचे फोटो काढू या, काय?

godbolemugdha2@gmail.com