सुजाता दिलीप तांडेल

प्राणीप्रेमातून घरी आणलेलं मांजराचं पिल्लू कुटुंबातीलच एक अविभाज्य सदस्य बनतं, घरातल्या प्रत्येकाला त्याचा लळा लागतो, तीच जेव्हा परदेशी जायला निघते तेव्हा?

दहा वर्षं झाली त्या घटनेला. एक नुकतंच जन्मलेलं, जखमी, गोंडस माऊचं पिल्लू, आमची लेक मिनीच्या प्राणीप्रेमातून घरी आलं, ही पिक्सी. त्या काळी आम्ही पती-पत्नी नोकरी करत होतो. त्या अनुषंगाने आगंतुकच होती ती. ‘पिक्सी’च्या आगमनाने आमच्या घरी घड्याळाच्या काट्याबरहुकूम चालणाऱ्या दिनक्रमात वादळ येऊन थडकलं होतं म्हणा ना.

मी काही प्राणीप्रेमी नव्हते. तिचं अस्तित्व स्वीकारण्यापलीकडे आम्हाला ‘चॉईस’ नव्हता. ‘जगा आणि जगू द्या’ इतपतच माझी तरी झेप होती, हे मिनीलाही चांगलंच ठाऊक होतं. ती तेव्हा महाविद्यालयीन स्वप्नाळू मुलगी होती. पिक्सीच्या आगमनानंतर तिची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा वसा मिनीने जाहीर केला होता. यानंतर साहजिकच घरात खटके उडू लागले. कधी तरी मी आणि नवरा विरुद्ध मिनी. तर कधी नवरा आणि मिनी विरुद्ध मी, असे शाब्दिक द्वंद्व चालू असतं. नवऱ्याची कुतरओढच होत असे. लेक कलेजाचा तुकडा, तर बायको न टळणारी बला. वरताण म्हणजे पिक्सीविषयी काही अडचण आली की आमची लेक ‘गूगल’वर शोध घेत आलेला प्रसंग निस्तारित असे. याची आम्हाला फार गंमत वाटे. हे सगळं आमच्यासाठी त्या काळी नवीनच होतं. असो. अशी ‘पिक्सी’ नामक माऊ आमच्या कुटुंबातील एक अविभाज्य सदस्य झाली.

‘मान ना मान मैं तेरा मेहमान’ करत बाईसाहेब हक्काने माझ्या मांडीवर विराजमान होत. जबरदस्तीने डोळे किलकिले करीत मान वर करून कधी मानेखाली तर कधी कपाळावर गोंजारून घेत, तर कधी ब्रह्मानंदी टाळी लागल्यागत तल्लीन होत. कालचक्र फिरत राहिलं. मिनीचं उच्च शिक्षण, तिची नोकरी, तिचं लग्न ही आवर्तनं घडत गेली. आम्हीसुद्धा नोकरीतून निवृत्त झालो. आता खरं तर आमच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली होती. बाहेर मनसोक्त भटकंती करणं, निवांत शांत आयुष्य जगण्याचे दिवस उगवले होते. या सगळ्या धबगड्यात आमचे जावई आणि मिनी करियरसाठी परदेशस्थ झाले. आता पिक्सीची पूर्णवेळ जबाबदारी आमच्यावर येऊन पडली. आमच्या स्वच्छंदी आयुष्याला बराच लगाम लागला. अगदी काही दिवसांसाठीसुद्धा बाहेरगावी जायचं म्हटलं, तरी पिक्सीच्या दैनंदिनाची सोय केल्याशिवाय जाणं कठीण जात होतं. आमच्या गृहसेविका शैला आणि मंदा या प्राणीप्रेमापोटी, न कुरकुरता तिच्या जबाबदाऱ्या उचलत. पण हे सर्व कायमस्वरूपी राबवणं कठीण आहे हे आता मिनीने जाणलं. त्यामुळे अंतिम निर्णय झाला तो म्हणजे पिक्सीला तिच्या घरी, लंडनला नेणं. परदेशवारी करावी म्हटलं, तर काय सव्यापसव्य करावं लागतं हे सर्वांना ठाऊक आहे. मात्र पिक्सीचं हे प्रयाण म्हणजे कोणत्या फेऱ्यातून जावं लागणार याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. मिनी आली की तिच्याबरोबर पाठवून देऊ, असं आम्ही ठरवून टाकलं. आणि त्याचवेळी पिक्सीला नेण्यासाठी मी येणारच नाही, अशी गूगली मिनीने टाकली. आम्ही धास्तावलोच. पिक्सीच्या प्रयाणाचं सुकाणू मिनीच्या हातात होतं. तिचा एक मोठा ई-मेल आला. प्राणी निर्यातीचे नियम, ते सांभाळणारी एक ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी बक्कळ फी आकारून हे प्रयाण साकारणार होती. थोड्याच दिवसांत एक मोठा ‘IATA APPROVED’ पिंजरा घरात अवतरला. वरून आदेश आला की, आता पिक्सीला त्याची सवय करवून घ्या. एवढं धूड घरात येताच पिक्सीलाही गंमत वाटली. त्याच्या अवतीभवती फेऱ्या मारून हुंगून त्याच्या समोर बसली. नंतर दार किलकिलं करून तिला आत ढकलताच आमचा गनिमी कावा लक्षात येऊन जोरदार ‘म्यांव म्यांव’ची आरोळी ठोकत, पंजा मारत पिंजऱ्याचं दार खिळखिळं करण्याचा जीवतोड प्रयत्न ती करत राहिली. आम्हीच वरमलो आणि तिला बाहेर काढलं. त्यानंतर त्या पिंजऱ्याच्या आसपासही ती फिरकेनाशी झाली. यादरम्यान तिला तिच्या डॉक्टरकडे नेऊन तिच्या मानेत चिप बसवली गेली. त्या चिपमधे तिची जन्मकुंडली बंदिस्त झाली होती. तिला ‘ट्रायफलायन व्हॅक्सीन’ वगैरे सोपस्कार झाले. जेणेकरून परदेशी ती संसर्गमुक्त असेल. या सगळ्याला सहा महिन्यांचा काळ लागला.

एके दिवशी तिचं स्पेशल विमानाचं तिकीट आलं. प्रयाणाची तारीख पक्की झाली आणि दिवसागणिक आम्ही तिच्याबाबत हळवे होत गेलो. त्या पिंजऱ्यात तिला ‘स्पेशल ट्रीट्स’ देऊ लागलो. खाण्याच्या निमित्तानं आता ती पिंजऱ्यात रुळू लागली होती. आपण तिला फसवतोय या जाणिवेनं आम्हाला अपराधी वाटे. आमच्याकडे निरागसपणे पाहताना तिचा किती विश्वास आहे आमच्यावर, हे जाणवत असे. मांजर जातकुळीला माणसांपेक्षाही घराशी बांधिलकी जास्त असते. आता तर तिचं विश्वच आम्ही उद्ध्वस्त करू बघत होतो. काही तरी वेगळं घडणार याची तिला चाहूल लागली होती. तिची भूक मंदावली होती. रात्र रात्र त्या पिंजऱ्यासमोर ध्यानस्थ बसून राहायची. प्रोटोकॉलप्रमाणे तिला परदेशात नेण्याआधी तिची सरकारी ‘प्राणी आयात-निर्यात केंद्रा’वर तपासणी आणि त्याचा दाखला घेणं गरजेचं होतं. त्या प्रवासात ती हुंदके देऊन बेजार झाली होती. खूप ढेपाळली होती. मिनीकडे पोहोचण्यासाठी तिला तब्बल ४० तासांचा प्रवास करावा लागणार होता. दुबई आणि लंडनमध्ये जवळजवळ आठ-आठ तासांचं लेओवर होतं. घराबाहेरचं जग न पाहिलेली आमची ‘मनी’ मोठा प्रवास करणार होती.

तिची फ्लाइट सकाळी आठ वाजता होती. त्या आधी काही दिवस तिची मन:स्थिती अस्थीर होती, घराच्या कुठल्या तरी सहज पोहोचू न शकणाऱ्या कोनाड्यात दिवस-रात्र पडून असायची. आमच्या मंदा, शैलादेखील हळव्या झाल्या होत्या. आमच्यावर तिला सुखरूप पाठवण्याची जबाबदारी होती. तिला घेऊन जाण्यासाठी खास कार आणि चालक आदल्या रात्री दोन वाजता आले. तिला बाबाचा जास्त लळा असल्यामुळे त्यांच्या सुचनेनुसार पिंजऱ्यात त्याचा घामाचा एक टी-शर्ट ठेवला होता. जेणेकरून तिचा प्रवासाचा ताण कमी होईल. तसंच तिच्यासाठी पाणी, ड्राय फूड पॅकेट्सही ठेवली होती. खूप शिताफीने त्याने पिक्सीला पकडून पिंजऱ्यात घातलं. आम्हा दोघांना तिला निरोप देताना हुंदके अनावर झाले. त्या चालकाच्या पाठोपाठ आम्ही ‘पिक्सी पिक्सी’ ओरडत धावत सुटलो. गाडी सुर्रकन निघून गेली आणि आम्ही ओक्याबोक्या झालेल्या घरात परतलो. मिनीलाही पिक्सी पोहचेपर्यंत काळजी वाटत होती. तिचा लंडनवरून फोन आला. आमचे हुंदकावलेले आवाज ऐकून ती आमची समजूत घालू लागली. ४० तासांच्या प्रवासात हिला काही झालं तर… या कल्पनेनेसुद्धा आम्ही हादरलो. मिनी आम्हाला समजावत होती, ‘‘आई, बाबा, या कंपन्या प्राण्यांची वाहतूक करण्यात माहीर आहेत. ते प्राणीप्रेमी आहेत. प्रत्येक आठ तासांच्या लेओवरमध्ये तिला बाहेर काढून पाय मोकळे करायला देतील. खाणं, पिणं, शी-शू सगळं बघतील.’’ ती आमच्या समाधानासाठी बोलत असली, तरी तिचाही आवाज गदगदत होता. अखेर ४० तासांचा प्रवास संपवून आमची पिक्सी मिनीच्या घरी सुखरूप पोहोचली. आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

तिला रुळायला काही दिवस लागणार होते. आमच्या आयुष्यात मात्र पोकळी निर्माण झाली. ती दूर करण्यासाठी आम्ही ‘इन्स्टा’वर मांजरींचे व्हिडीओ बघत राहातो. आणि पिक्सीच्या आठवणीत रमून जातो…