गेली २८ र्वष बँकेत नोकरी करताना आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक चांगले, वाईट अनुभव आले. आज मागे वळून पाहताना, कितीतरी गोष्टी गमावल्याचं दु:ख वाटतं, पण आताचं आयुष्य अनुभवताना खूप काही कमावलं हेही नक्की!
बँकेत रुजू होण्यासाठी जेव्हा मला पत्र मिळालं, तेव्हा मी नोकरी करूच शकणार नाही, असं वाटलं होतं. पुण्यापासून ८० कि.मी. असलेल्या दौंड शाखेत माझी नेमणूक झाली होती. मुलगा लहान होता. पण सासूबाई माझ्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी मुलांची जबाबदारी घेतली आणि रोज पुणे-दौंड असं माझं अप-डाऊन सुरू झालं. संसार आणि नोकरी अशी तारेवरची कसरत चालू होती. तब्बल ६ र्वष रोज सकाळी साडेसहाला घर सोडणं आणि रात्री उशिरा साडेदहा वाजता घरी येणं. मी सकाळी जाताना मुलं झोपलेली असत आणि घरी यायला उशीर होत असल्यामुळे तेव्हाही ती झोपलेली असत, हा अनुभव खरंच विदारक होता. पण पर्याय नव्हता.
पण या तडजोडी वाया गेल्या नाहीत. माझ्या नोकरीमुळे मुलं खूप लवकर स्वावलंबी झाली. समजूतदार झाली. नोकरीमुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. माझी स्वत:ची ओळख निर्माण झाली. घर, मुलाचं परदेशातील उच्चशिक्षण, मुलीचं लग्न या सगळय़ा गोष्टी नोकरीमुळे शक्य झाल्या. आणि सगळय़ात मोठा फायदा म्हणजे नोकरीमुळे मला माणसांची श्रीमंती खूप मिळाली. अनेक जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. अनेक माणसं जोडली गेली. वेगवेगळय़ा स्वभावाची, विचारांची माणसं भेटली आणि यातून माझा लेखनाचा, कविता करण्याचा छंद बहरू लागला.
आयुष्यात अनेकदा चढ-उतार, सुख-दु:खं येतच असतात. कधी कधी आपला निर्णय चूक की बरोबर अशी द्विधा मन:स्थिती होते. पण आत्मविश्वासाने आणि पूर्णपणे विचार करून घेतलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप होत नाही. कारण सुरुवातीच्या त्रासानंतर येणारा भविष्यकाळ नक्कीच सुखावह असतो.
गरिबी आणि श्रीमंतीही अनुभवली
छाया जोशी, ठाणे</strong>
आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे मी संसाराला थोडा हातभार लावावा या हेतूने एस.एस.सी नंतर मोठय़ा कष्टाने घर सांभाळून व एस.टी.सी. व पी.टी.सी. केलं. सगळय़ांशी जुळतं घेत, सगळय़ांच्या समाधानासाठी नोकरी करण्याचा ठोस निर्णय घेतला. मला शिक्षिकेची नोकरी मिळाली. मी ग्रँट रोडला जाऊ लागले. नंतर मला अंधेरी येथील शाळेत नोकरी मिळाली. प्रवासात फरफट होत होती. प्रकृती साथ देत नव्हती. नोकरी सोडून द्यावी, असे विचार मनात येऊ लागले. द्विधा मन:स्थितीत होते, पण माझे यजमान माझ्या पाठीशी होते, त्यांनी मला धीर दिला. कालांतराने मला एका चांगल्या शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. पण मुलाची आबाळ होऊ लागली. दिवसभर त्याला कोण सांभाळणार? कारण तो २-४ वर्षांचा होता. सासूबाईंचं वय झालं होतं. मनावर दगड ठेऊन मी तशीच कामावर जाऊ लागले. ठाणे ते अंधेरी प्रवास. शेजाऱ्यांनी खूप मदत केली. घरात नऊवारी नेसत होते, त्या पारंपरिक गोष्टीला फाटा दिला. सोवळे-ओवळे याला फाटा दिला. नवीन गोष्टी आत्मसात केल्या. मी स्वत:च्या पायावर उभी राहिले. संसाराला मदत करू लागले. धीट झाले. सर्व गोष्टींना धीराने तोंड देऊ लागले. नोकरीमुळे घरातले लोकही खूश झाले. मी घरातली मोठी सून म्हणून मान मिळू लागला. हे सर्व नोकरीमुळे. आता मी पूर्ण समाधानी आहे. परिस्थिती चांगली आहे. आता मला पहिल्यासारखे कष्ट उपसावे लागत नाहीत. पैसाही थोडा जमू लागला आहे ही जमेची बाजू.
पूर्वीचा काळ व आताचा काळ मी अनुभवलेला आहे. श्रीमंती, गरिबी अनुभवली आहे आणि म्हणूनच मी समाधानी आहे. संसारासाठी, घरातल्या माणसांसाठी जो काही त्याग, कष्ट सोसावे लागले त्याचं समाधान पूर्ण मिळालं आहे.