आइसलँडमधील पर्यटनातील भोजनात समोर आलेलं आइसक्रीम जेव्हा थेट स्वामी विवेकानंदांच्या अंतिम भोजनापर्यंत नेते तेव्हा जन्माला येते एक कलाकृती, तिच्या घाट आणि घडणीसह. त्या अंतिम काळात स्वामीजी आणि शिष्या भगिनी निवेदिता यांच्यात नेमके काय संभाषण झाले असेल? गुरुशिष्य म्हणून… जवळचे सहकारी म्हणून. एकमेकांबद्दल निरतिशय आपुलकी असलेल्या दोन व्यक्ती म्हणून? या विचारातून कसा उलगडत गेला त्यांच्यातील भावबंध…
आइसलँड या दूरदेशामधल्या ‘व्हिक’ गावामधला ३० ऑक्टोबर २०२४ हा दिवस. या गावाची लोकसंख्या साडेसातशे, पण पर्यटक निवासासाठी उपलब्ध निवासव्यवस्था मात्र दीड हजार खोल्यांची. दुपारच्या जेवणाची वेळ झाली, खेड्यातल्या एका खानदानी खानावळीचा आश्रय घेतला. जवळच्या खिडकीतून गर्द निळे आकाश दिसत होते. समुद्रातल्या उंच खडकांच्या शिल्पाचे दर्शन होत होते. समोर आले आइसक्रीम… दोन व्हॅनीला तर एक चॉकलेट स्वादाचे घसघशीत लाडू!
‘‘तुला ठाऊक आहे का आइसक्रीम ही स्वामी विवेकानंदांची आवडती ‘स्वीट डिश’ होती…’’ आमचा सहप्रवासी मित्र, स्वप्निल कुंभोजकरला मी म्हणालो.
‘‘चॉकलेट आइसक्रीमला तर ते ‘निखालसपणे दैवी’ असे म्हणायचे.’’
‘‘स्वामीजी आणि आइसक्रीम?’’ त्याचा चेहरा प्रश्नार्थक झालेला.
‘‘पाककलेत प्रवीण होते ते. भाज्या चिरताचिरता गीताभाष्य करायचे. आपल्या परदेशी शिष्यांसाठी एकदा त्यांनी देशोदेशीचे पदार्थ असलेले जेवण तयार केले होते. भगिनी निवेदिता त्याला म्हणायच्या ‘भौगोलिक भोजन’ (Geographical lunch).’’ स्वप्निलच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे किरण उजळत होते. ‘‘स्वत:च्या निर्वाणाच्या आधी दोन दिवस म्हणजे, बुधवार २ जुलै १९०२ रोजी स्वामीजींनी निवेदितांना सायंभोजनासाठी(Supper) बोलवले होते… त्या दोघांची ही शेवटची प्रत्यक्ष भेट… त्या प्रसंगात स्वामीजी निवेदितांचे हात धुतात. त्या म्हणतात, ‘‘आम्ही शिष्यांनी हे तुमच्यासाठी करायचं…’’ त्यावर स्वामीजी म्हणतात, ‘‘येशूने तर त्याच्या शिष्यांचे पाय धुतले होते. मी फक्त हात स्वच्छ करतोय तुझे…’’ निवेदिता उद्गारतात, ‘‘ते तर येशू ख्रिास्तांचे ‘लास्ट सपर’ होते ना…’’ बोलता बोलता मी स्तब्ध झालो.‘‘नेमके काय संभाषण झाले असेल त्या दोघांचे? गुरुशिष्य म्हणून… जवळचे सहकारी म्हणून. एकमेकांबद्दल निरतिशय आपुलकी असलेल्या दोन व्यक्ती म्हणून.’’ माझे शब्द मलाच ऐकू येत होते. पुन्हा शांतता… ‘‘तुला सांगतो… हे नाटक आहे…’’ शब्द बाहेर आले तेव्हा स्थानिक वेळ होती दुपारचे तीन वाजून अठरा मिनिटे. शरीर आणि मनावर शिरशिरी आली. नवनिर्मितीची घटिका आणि घाट एकत्रितपणेच जन्माला आले होते.
सगळ्याच कल्पक विचारांमध्ये एकसारखी ऊर्जा नसते. या सूत्रामध्ये मात्र इतकी ऊर्जा होती की तिने माझा संपूर्ण कब्जा घेतला. स्वामी विवेकानंदांची गोष्ट प्रथम वाचली, ऐकली तेव्हा मी सहा-सात वर्षांचा होतो. त्यानंतर ते खऱ्या अर्थाने ‘भेटले.’ अद्वैत वेदांताच्या अभ्यासाला सुरुवात झाली तेव्हा. इतिहासाची आवड असल्याने त्यांचे जीवनही अभ्यासायचा सतत योग येत गेला. स्वामीजी हे आपल्या जवळचे आहेत आणि आपण त्यांना ओळखतो असा माझा तोवरचा २७ वर्षांचा समज होता. पण या क्षणानंतर त्यांची माझी घट्ट भेट होऊ लागली असं म्हणता येईल.
स्वामीजींच्या निमित्ताने भगिनी निवेदितांची देखील ‘ओळख’ झाली होती. स्वामीजीं- ंसोबतच्या त्यांच्या आठवणींचे पुस्तक हा अभ्यासकांसाठी एक वेगळाच स्राोत आहे. ३०ऑक्टोबरच्या संध्याकाळी मला आइसलँड मध्येच दोन पुस्तकांच्या पीडीएफ इंटरनेटवर मिळाल्या. त्यातले एक होते १९०५ मध्ये प्रसिद्ध झालेले ‘ off Death and Loving’ हे निवेदितांचे पुस्तक. हा विलक्षण कृपाप्रसाद होता. स्वामीजींच्या वियोगानंतरची त्यांची गद्या-पद्या प्रतिभा त्या पुस्तकातून सामोरी येते. त्यात कविता तर आहेतच, पण The Beloved आणि The Soul(आत्मन) यांच्यातला संवादही लिहिलेला आहे. म्हणजे भगिनी निवेदितांनी नाट्य हा ‘घाट’ ( Form) त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी निवडला होता.
दिवसा आइसलँडमध्ये पर्यटन करायचे आणि रात्री इंटरनेटवरचा शोध आणि वाचन असे करता करता पुढच्या दोन दिवसांत मला नाटक ‘स्पष्टपणे’ दिसायला लागले. स्वामीजी आणि निवेदिता एकमेकांशी बोलताना ‘ऐकू’ यायला लागले. माझ्याकडे असली नसलेली कोरी पाने घेऊन त्यावर लिहिणे सुरू झाले. कधीमधी रेस्टॉरंटमध्ये दमदार कागदी रुमाल मिळाले तर ते बरोबर घेऊ लागलो.
आजवर केलेले नाट्यलेखन हे Linear म्हणजे एका दिशेने जाणाऱ्या रेषेसारखे केले होते. इथे मात्र असे ठरवले की लिहीत जायचे. त्याचा क्रम नंतर ठरवू. भारतात परत येतानाच्या प्रवासात नाटकाचा पहिला प्रवेश समोर आला. १९०४ मध्ये भगिनी निवेदितांनी भारताच्या ध्वजाची निर्मिती केली होती. पुढे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये तो फडकवला गेला. १९०२ मध्ये त्यांच्या मनात ही कल्पना नसेलच असे नाही. आणि आपली निर्मिती त्या प्रथम कोणाला दाखवतील. अर्थात् स्वामीजींना… प्रसंग मिळाला. राष्ट्राप्रति समर्पित अशा दोन व्यक्तींची अखेरची भेट आहे. तिथे निवेदितांनी हा ध्वज उलगडून दाखवणे आणि स्वामीजींना त्याच क्षणी त्याचे मर्म लक्षात येणे मस्त… लिहायला सुरुवात झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतलो आणि माझ्या खासगी ग्रंथालयातला विवेकानंदांच्या पुस्तकांचा खण टेबलावर ओतला. आता मुक्त लिखाणाला बहर आला. स्वामीजी आणि निवेदिता यांच्यामधला संपूर्ण पत्रव्यवहार मदतीला होता. माझे संवाद लिहून व्हायचे आणि त्यानंतर मी संदर्भ शोधून त्या दोघांचे शब्द तंतोतंत लिहिले आहेत ना हे पडताळून पाहायचो. नव्याने सुरू केलेल्या वाचनामुळे काही प्रसंग टोकदार झाले.
स्वामीजींच्या प्रथम दर्शनाने पूर्वाश्रमीची मार्गारेट नोबल भारावून गेली होती. स्वामीजींना मात्र ती दिसत होती, ‘स्त्रीशिक्षण’ या क्षेत्रात काम करणारी कार्यकर्ती म्हणून. पुढच्या सहा-सात वर्षांमध्ये या दोन असामान्य व्यक्तींच्या वैयक्तिक भावबंधामधले चढउतार होऊन २ जुलै १९०२ ला हे दोघे एकत्र समेवर येताना दिसले मला. या कॅनव्हासवर आता उद्दिष्टांची मांडणी कशी झाली असेल दोघांकडून?
स्वामीजींचे विधान आहे की मी चाळिशीपुढचे आयुष्य पाहणार नाही. त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती का? मृत्यूआधीचे काही दिवस ते आनंदी होते. ज्या दिवशी संध्याकाळी त्यांनी निवेदितांना बोलावले त्या दिवशी सकाळी त्यांनी सर्व शिष्यांनाही स्वहस्ते केलेले जेवण खिलवले होते. निवेदितांनासुद्धा ही वियोगाची हुरहुर असेल ना?… पण परिपक्व, आध्यात्मिक व्यक्ती कशा वागतील अशा वेळी? त्यात महत्त्वाचे म्हणजे स्वामीजींनी आपले ‘माणूसपण’ लख्खपणे स्वीकारलेले होते. या शरीर-मन-संवेदनांच्या चौकटीत असताना ‘मर्त्य’पणाचा न्यून किंवा अहं असा गंड न आणता जगणे सोपे नव्हे. चाळिशीचा उमदा माणूस तो आणि पस्तिशीची तरुण निवेदिता. तिला तर आत्मपरिवर्तनाचा किती मोठा वैचारिक-भावनिक लढा करायला लागला असणार… सर्वार्थाने भारतीय झालेल्या निवेदिता स्वामीजी गेल्यावरही १९११ पर्यंत या राष्ट्राच्या जीवनाशी संपूर्णपणे समरस झाल्या होत्या. वैयक्तिक प्रेमभावनेचे हे उन्नयन (Sublimation) विलक्षण नाही का…
माझ्या मनातल्या विचारांना स्वामीजी आणि निवेदिता आता दिशा आणि रूप द्यायला लागले होते. मानवी जीवनातले धर्माचे स्थान काय? उपासनाधर्म आणि विश्वधर्म यांचे नाते काय? राष्ट्राच्या उत्थानासाठी धर्माचे माध्यम वापरायचे तर कोणत्या चौकटीत? संकुचित, आक्रमक राष्ट्रवादाच्या बाजूने की भारतीय संस्कृती आणि मूळ अद्वैत वेदांताच्या एकात्मतेच्या भूमिकेच्या बाजूने? स्वार्थी आत्मकेंद्रितता आणि ‘स्व’रहित समर्पण ही निवड माणसे कशी करतात? परंपरा म्हणजे नेमके काय?
हे सारे प्रश्न आज तुमच्या आमच्या जीवनातही आहेतच की. महत्त्वाचे असे की या सर्वांवर स्वामीजींनी ठाम अशी भूमिका घेतली आहे. ‘ईशतत्त्वाचा सततचा शोध हे उद्दिष्ट भारतभू-ला अमरत्वाकडे नेईल. क्षुद्र स्वार्थी राजकारण आणि सामाजिक संघर्ष (Petty Politics and Social Conflict) या देशाला रसातळाला नेतील’ हे स्वामीजींचे उद्गार४ जुलै १९०२ चे आहेत. नवनिर्मिती करायची तर प्रस्थापिताशी लढा द्यावा लागणार हे सत्य स्वामीजी स्वानुभवातून शिकले होते. आणि तरीही त्यांच्या मनात लोकांविषयी कटुता नाही. त्यांची निवेदितांसोबतची ती संध्याकाळ म्हणजे एक वारसा पुढे देण्याची प्रक्रिया आहे. रामकृष्णांच्या अखेरच्या पर्वात त्यांनीही नोरेनला वारसा दिलाच होता.
ही सारी तत्त्वचर्चाही प्रभावी व्हायला हवी आणि तरीही नाटकाच्या संहितेला भावनिक प्रवाह हवा. छोटे-मोठे उत्कर्षबिंदू (Climaxes) हवेत. भाराभर पाने लिहून झाल्यावर हा सारा विचार मी जाणतेपणी करू लागलो. नाट्यतंत्र म्हणजे क्राफ्ट आता सजगपणे वापरून संवादांची साखळी रचत गेलो. काही ठिकाणी किंचित स्वातंत्र्य घेतले. मूळ प्रसंगामध्ये हात धुण्याची कृती जेवणानंतर घडते. इथे ती जेवणाआधी दाखवली आहे. कारण त्या टप्प्यावर पहिला अंक संपतो. स्वामीजी आणि निवेदिता यांच्या नात्याला असलेली खेळकर, नर्मविनोदी झालर मला त्या दोघांनीच दाखवली. दोन्ही व्यक्तिरेखा एकमेकांशी इंग्रजीत बोलायच्या म्हणून संहिता इंग्रजीत लिहिली गेली. साधारण दीड महिना या धुंदीत गेला. दिवसभर विविध कामे करायची आणि रात्री स्वत:ला स्वामीमय आणि भगिनीमय करायचे. दरम्यान, दिग्दर्शिका म्हणून प्रतिमा कुलकर्णीची एंट्री झाली होती. मला दिग्दर्शकाशिवाय संहिता पूर्णत्वाला नेता येत नाही. संपूर्ण नोव्हेंबर-डिसेंबर महिना मी लिहिलेले संवाद प्रतिमाला पाठवत होतो. चर्चा सुरू होत्या. १५ डिसेंबरच्या संध्याकाळी(त्या दिवशीच ठाण्याच्या ‘वेध’च्या पाच मुलाखती दिवसभर घेतल्यावर) मी संपूर्ण स्क्रिप्ट पहिल्यांदा मोठ्याने वाचले. प्रतिमाही आता या प्रवाहात बुडून सामील होतीच. चर्चा-सूचनांची मोठी यादी घेऊन पुन्हा कामाला बसलो. स्वत:च्या मनामध्ये मी ३१ डिसेंबरची रात्र हा भोज्या पकडला होता. वर्षाच्या शेवटच्या दिवसाची नऊ तासांची ‘ओपीडी’ आटपून संहितेमध्ये घुसलो. वारंवार वाचायचे, स्वत:साठीच मोठ्याने म्हणायचे, मन:चक्षुंसमोर पाहायचे असे करत करत ‘एन्ड ऑफ द अॅक्ट टू’ असे लिहिले तेव्हा रात्रीचे अकरा वाजून पन्नास मिनिटे झाली होती.
स्वत:मध्ये हरवलो… तरीही दूरस्थपणे ३० ऑक्टोबरपासूनचा प्रवास पुन:पुन्हा न्याहाळत राहिलो. दोन महिन्यांमध्ये एक संपूर्ण संहिता अवतरली होती. सभोवार पुस्तकरूपाने स्वामीजी आणि निवेदिता होतेच… मी ज्या टेबलावर बसून लिहीत होतो त्याच्याशेजारीच प्रसन्न मुद्रेने ते दोघेही होते.
‘‘तुझसे हमने दिलको लगाया, जो कुछ है सो तू ही है’’ हे भजन आहे बहादूरशहा जफर यांचे. रामकृष्णांना ते आवडायचे आणि स्वामीजींचा आवाज गोड होता. लहानपणी ते संगीत शिकलेही होते. नाटकाच्या दुसऱ्या अंकाची सुरुवातच या प्रसंगाने होते की स्वामीजी निवेदितासाठी हे भजन भोजनोत्तर म्हणत आहेत. मी गुणगुणायला लागलो… येशू ख्रिास्ताच्या जीवनात झाले ते ‘द लास्ट सपर’… स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता या दोन अनुकरणीय भारतीयांबद्दलचा हा प्रसंग आपण विस्मृतीच्या आणि अनुल्लेखाच्या काळोखात ठेवलाय आजवर… त्याच्यावर बोधाचा प्रकाश टाकणारे हे नाट्य असेल ‘द लॉस्ट सपर’! संशोधनातल्या एका मुक्कामावर आल्यावर प्रयोगशाळेतल्या शास्त्रज्ञाने ध्यानवृत्तीने त्या प्रयोगाकडे पाहावे तसा पाहत राहिलो. जुने वर्ष सरले होते. नवे पर्व सुरू झाले होते…